Pratibha Tarabadkar

Abstract

3  

Pratibha Tarabadkar

Abstract

स्थान महात्म्य

स्थान महात्म्य

2 mins
137


बाजारात जायला निघाले होते. नेहमीप्रमाणे जरा लवकरच... म्हणजे नंतर होणारी ती भयंकर गर्दी, रिक्षा,बसेस यांच्या मधून वाट काढत, त्यांनी ओकलेला धूर छातीत भरून घेणे टाळण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

आमचे जुनाट शहर आता कात टाकून चलाख शहर (smart city) बनते आहे त्यामुळे वाटेत भरपूर घडामोडी चाललेल्या दिसतात.वाचनालय बंद होऊन त्या जागी मोबाईल चं दुकान निघालंय, किराणा मालाच्या दुकानाजागी पिझ्झा,मोमोज वगैरे फास्ट फूडचे भपकेबाज आउटलेट निघाले आहे तर मुलांच्या खेळण्यांचं दुकान जाऊन तिथे सोन्याच्या अलंकारांची भव्य शोरूम झाली आहे.त्यामुळे आमच्या शहराची आता लवकरच smart city मध्ये गणना होणार यात शंकाच नाही!

तर मी रमत गमत बाजाराकडे चालले होते.समोरुन एक तरुण येत होता.कॅप, टीशर्ट,जीन्स आणि स्पोर्ट्स शूज घातलेला.माझ्यासमोर आला तेव्हा ओळखीचं हसला.माझा गोंधळ उडाला.या तरुणाला मी पुष्कळ वेळा पाहिलंय,पण कुठे? काही केल्या आठवेना.मी हसल्यासारखं करून पुढे सटकले.भाजी घेऊन घरी आले तरी तो तरुण काही डोक्यातून जाईना.कुठे बरं पाहिलंय याला?

बरं घरी सांगितलं तर लगेच माझं वय, वाढतं विस्मरण ते न्यूरॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट इथपर्यंत गाडी धावेल त्यापेक्षा नकोच ते म्हणून गप्प बसले.पण डोक्यातला भुंगा काही स्वस्थ बसेना...उसे कहीं देखा है l

दोन दिवसांनी कपड्यांचा गठ्ठा घेऊन इस्त्रीवाल्याकडे गेले.इस्त्रीवाला नेहमीप्रमाणे बनियन आणि बर्म्युडा मध्ये होता.मला पाहून हसला आणि म्हणाला,'कैसी हो आंटी?'आणि ताबडतोब माझी ट्यूब पेटली.दोन दिवसांपूर्वी बाजारात भेटलेला तो तरुण म्हणजे आपला इस्त्रीवाला होता तर!मग मी त्याला इतक्या वेळा भेटलेय तरी ओळखू का बरं शकले नाही?

कारण तो नेहमीच्या वेशात आणि नेहमीच्या जागी नव्हता म्हणून!

म्हणजे बघा हं,कायम साडीत असलेली,एका ठराविक ठिकाणी भाजी विकणारी भाजीवाली एक दिवस पंजाबी ड्रेस मध्ये ट्रेनमध्ये दिसली तर?आपला गोंधळ उडणारच ना! चेहरा तर ओळखीचा वाटतो पण नक्की कोण बरं....

किंवा एखादी डॉक्टर कायम पंजाबी ड्रेस,त्यावर पांढरा कोट, गळ्यात स्टेथोस्कोप वगैरे चढवून केबिनमध्ये बसलेली पाहिली असेल तर तीच डॉक्टर जरीची साडी,हातात ओटीचे ताट धरुन मंदिरात रांगेत भेटली तर आपल्याला सतत वाटेल ना...इसे कहीं देखा है!

याचाच अर्थ आपल्या मनात एखाद्या व्यक्तीची प्रतिमा फिट्ट बसलेली असते.तिची काम करायची जागा,तिचे कपडे इ.आणि त्या प्रतिमेहून वेगळी छबी दिसली तर आपल्या मनाचा गोंधळ उडतो!

बघा तुम्हाला पटतंय का!

असा अनुभव तुम्हाला आलाय का!



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract