सर्वोत्तम पुस्तक
सर्वोत्तम पुस्तक


बरीच पुस्तके वाचली आणि वाचत आहे. पण आजच्या युगात सर्वोत्तम पुस्तक म्हणजे "श्यामची आई", साने गुरुजींनी लिहिलेले.
पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना सर्व "साने गुरुजी" ह्या नावाने ओळखतात, त्याची आज जयंती. २४ डिसेंबर १८९९ साली त्यांचा जन्म झाला. त्यांची सगळीच पुस्तके छान आहेत. पण संस्कारांची शिदोरी असलेले त्यांचे पुस्तक म्हणजे "श्यायची आई".
"श्यामची आई " हे पुस्तक आज घराघरात असायला हवे. आपल्या आयुष्यात बालपणात संस्कार चांगले झाले, तरच आपण चांगले नागरिक होऊ. ह्या पुस्तकात आईची महत्त्वाची भूमिका आहे. आई जेवढी प्रेमळ तितकीच ती शिस्तीच्या बाबतीत कठोर वागते. आपल्या मुलावर संस्कार रुजवण्यात तिचा मोलाचा वाटा असतो. ह्या पुस्तकातल्या गोष्टी किंवा निदान त्यावर केलेला मराठी सिनेमा आजच्या मुलांना हमखास दाखवायला पाहिजे. निदान त्या पुस्तकातल्या गोष्टी लहान मुलांच्या कानावर घालायला पाहिजेत. आज आपण सर्वत्र पाहतो की मुलांच वागणं कसं बदलत चाललंय. आपण पाहतो की त्या काळची आणि आजची मुले यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण हा फरक का? आणि कोणी केला? आपण पालकच जबाबदार आहोत ह्या गोष्टीला. आपण जर संस्कारी असलो तर आपली मुले ही संस्कारी निपजतात. हे संस्कारांचे बीज बालपणातच रुजवायचं असतं. जो कोणी श्यामची आई पुस्तक वाचेल त्याच्या जीवनात बदल अवश्य होईल.
वडिलधाऱ्या माणसांशी कसे बोलावे, शब्दांमध्ये नम्रता कशी असावी, आपली रोजची नियोजित कामे, अभ्यास, खेळ, प्रार्थना हे सर्व स्वतः करावे ह्या सगळ्यांची शिकवण श्यामची आई पुस्तकातुन मिळेल. म्हणून मला हे आजच्या काळाला अत्यंत जरुरीचे पुस्तक वाटते आणि ते माझ्या वाचनात आलेले सर्वोत्तम पुस्तक आहे.