Prabhakar Pawar

Abstract Others

4  

Prabhakar Pawar

Abstract Others

सराई

सराई

3 mins
255


हळदीत माखलेलं पिवळं जर्द पिकं एखाद्या नवती वधू सारखे खाली मान घालून लाजले होते. गडी रांगडा उजवी मूठ मिशीवर फिरवून आठवत होता मनात. धोधो पावसाच्या पाण्यात काळ्या मातीचं लोणी बनवून खायला घातलं होतं हिरव्या लेकरांना. भाताची लोंगी शेतकर्‍याचे ऐकून मनात खुळली होती. .भिरभिरण्या पाखरांना 'आयच्यान मायच्यान' शिव्या हाडसायचा बेलेशक मग हळूच कारभारीन सांगायची. .

"धनी रावद्या, चार दाणं चोजवत्यात ती, तसबी शेतकर्‍याच्या दाैलतीला कमी हिस्सेदार कुठं असत्यात.." 

प्रेमाचा कटाक्ष टाकून तिच्याकडे बघून हसून 

निघायचा लगबगीनं. लोहारानी विळे पारजेलेत का बघायला. .


कारभारीन पदराचा कोचा दाताखाली दाबून मूक निरोप द्यायची त्याला. आणि वळून लाल भडक नाचणीचं बोंड नाजूक स्पर्शात कुरवाळायची. टिंबटिंब वरीच्या लोंबीला अनामिकेने हळवायची.

वरीच्या तपकिरी रंगाने डोळे चमकायचे तिचे. सराईने (सुगीने) तिची जणू अोटी भरलेली होती. कामाचं नि काजाचं वाढलेल्या गवताच्या बुंध्याला आडवा पाय देऊन निजवायची कायमची. आता कामचं नसलं तरी मागून भाजणीला कामाला असते ते. हळूच उडीदाची काळी शेंग 

दोन बोटात तडकन फोडून, चार दाणे चाखून बघायची. फुलून उठलेल्या तुरींना कुरवाळत मिरचीच्या अोट्याकडे (वाफा) निघायची. हिरव्या डरारलेल्या मिरच्यात एखाद दुसरी लालबुंद मिरची बघायची. जणू दहाबारा पोराच्या माईचे

एखाद मिसरूड फुटलेलं पोरंच. .


खळा चोपून शेणाने सारवून शेतातल्या दाैलतीच्या 

स्वागताला तयार असायचा. दुसर्‍या दिवशी वाकडा चंद्रकोरीच्या आकाराचा विळा घेऊन दोघे शेतात उतरायचे. कडक उन्हात नेमक्याच आॅक्टोबरच्या दाहक उष्णतेत हातात विज संचारली असायची चिंब घामाचे पूर अंगातून वाहयचे. पण पर्वा करतो कोण ?. शेतातलं खळ्यात येई पर्यंत धीर असतो कुणाला ?.भरगच्च दाण्यात त्याच लपलेलं सपान त्याला अधीर करायचे. खळ्यातले मळून पाखडून झाल्यावर. टपोरे दाण्याची सर्व दाैलत घरात येऊन पडायची. .


दुसर्‍या दिवशी सकाळीच आंघोळ करून वानगी पिशवीत भरून तो निघायचा. जसेकी उपवर झालेल्या लेकीला स्थळ पाहयला निघाला आहे. दिवाळसण खेटायला आलेला असायचा. बाजारतले आख्खे काटे धुंडाळायचा. कुठल्या तरी काट्यावर दोन पैसे वाढीव मिळावेत हाच उद्देश असायचा. भात खरेदीच्या काट्यावरचा शेठचा विशेष रूपात असायचे. पुरूषाहून उंच काट्याची मजबूत दांडी असायची. किरणा दुकानातल्या लहान तराजूचा बाप असल्या सारखा. दोन्ही बाजूला दोन भलीमोठी लोखंडी तागडी काळ्याकुट्ट रंगाची. आजूबाजूला भाताचे दाणे सांडले असायचे. मोकळ्या मैदानात गोणींची थप्पी असायची. अनेक माणसांची वर्दळ असायची. शेटच्या अोळखीचे गिर्‍हाईक शेठच्या शेजारच्या सतरंजीवर बसले असायचे. गादीवर पांढरी चादर टाकून पांढर्‍या लोडाला पांढर्‍या कपड्यातला शेठ, अोरडून नोकरांना सुचना करत असायचा. शेतकर्‍याच्या येण्याची दखल त्याने घेतली असायची. त्यालाही माहीत असायचे की हा अनेक काटे फिरून आला आहे. त्याला शेतकर्‍यांच्या भाताची गरज असायची. पण तो गरज दाखवायचा नाही. .


"रामराम शेठ. ."


शेरकरीच हातातल्या पिशवीसह शेठला नमस्कार करायचा. शेठ प्रतिसाद द्यायचा फक्त मान हलवून. हा वानगी पुढे करायचा वानगीची पुरचुंडी उघडून, शेठ दाणे हातावर घेऊन बघायचा

जवळच्या लाकडी पाट्यावर दाणे टाकून लाकडी वरवंट्याने रंधायचा. तो लाकडी पाटा वरवंटा 

खूप सुंदर दिसायचा. पाट्याला खाचे केले असायचे. मनासारखं रंधून झाले की दाण्यावर फुंकर मारून स्वच्छ तांदूळ तळहातावर घेऊन त्याचे मुल्य ठरवायचा. सर्व काटे फिरल्यानंतर शेतकर्‍याच्या लक्षात आले असायचे. व्यापार्‍यांनी संगनमत करून बाजारभाव ठरवून ठेवला आहे. मग जो बाजार योग्य वाटेल त्याला वायदा करून हा घरी परतायचा. मनातल्या मनात घरात असलेल्या धान्याचे किती पैसे येतील याचे गणित चालले असायचे. संध्याकाळी पोती टाचून दुसर्‍या दिवशी बैलगाडीत गोणी टाकून तो निघायचा. मेहनतीने पिकलेल्या दाण्यांचे योग्य दाम मिळावे. हाच एकमेव उद्देश ठेऊन, बैल पिटाळायचा. बैल सजलेले असायचे. मालक तर काय मनात अत्युच्च आनंदाने भरला असायचा. मिळालेल्या पैश्यात दिवाळसण साजरा व्हायचा. .


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract