उधळण रंगाची
उधळण रंगाची
त्याने आवाज दिला "अगं ये बाहेर ये. ."
तिने आवाज ऐकला. हसतहसत ओले हात पुसत ती बाहेर आली. तिच्या चेहरा खुळलेला पाहून, हा एकटक तिच्याकडे पहातच राहिला. आज ती खूप सुंदर दिसत होती. चेहर्यावर आनंदाने खुलला असेल तर अंगातील साध्या कपड्यांनी किंवा जवळ नसलेल्या दागिन्यांनी काही फरक पडत नाही. .
होळीचा दिवस होता, तो तिला रंगवायला आला होता. त्याने रंग तिच्या अंगावर फेकला. गुलाबी रंगात रंगल्यावर तोंडातून चमकणारे पांढरे शुभ्र दात. तिच्या साैंदर्याची आणखी शोभा वाढवत होते. तो अगोदरच बाहेरून रंगून आला होता. तरी तिने तिचा चेहरा त्याच्या गालावर घासून रंग लावण्याचा प्रयत्न केला. तिच्या जवळ रंग नव्हता. .नंतर तिने त्याला घट्ट मिठी मारली. दोन्ही गालावर चुंबन घेतले. आणि ती रडायला लागली. तिने मटकन सोफ्यावर बसून घेतले. अचानक बदलल्या वातावरणाने तो गोंधळला. .
निखिल आणि स्नेहाचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. प्रेम विवाह होता. आनंदाने संसार चाललेला. एक दिवस होळीच्या दिवशी पोलिसांनी त्याला घरी येऊन अटक केली. नक्की कारण तिला लगेच समजले नाही. नवीन लग्न झालेले. होळीची सर्व तयारी झाली होती. दोन वर्ष अगोदर म्हणजे लग्नापूर्वी एकमेकाला रंगवतांना. कुणी पहाणार नाही याची दक्षता घ्यावी लागायची. पण आता लग्न झाले होते. म्हणून ते ह्या वर्षी जगजाहीर होळी खेळणार होते. पाचसहा वर्षापासूनचे लपूनछपून केलेले प्रेम आज बिनधास्त करायचे होते. आता जगाची भीती नव्हती त्यांना. परंतु कुणाची तरी त्यांच्या सुखाला नजर लागली. एका खोट्या खुनाच्या गुन्हामध्ये त्याला फसवले. प्रेमविवाहाला विरोध असल्या कारणानं माहेरहून आणि सासरहून मदत मिळणे अशक्य होते. नवरा तिच्यासाठी सर्वस्व होता. त्याला त्याच्या
संकटात कुणी मदत करणारा नव्हता.
आता तिनेच स्वत: त्याला बाहेर काढण्यासाठी संघर्ष करायचा ठरवला. तिच्यासाठी हे सारे नवीन होते. अनेक चांगल्या वकीलांची ती शोधाशोध करू लागली. त्याला जेलमध्ये जाऊन भेटू लागली. नक्की काय आणि कसे तो या प्रकरणात गुरफटला याची माहीती, तिने घेतली. सासर आणि माहेर दोन्ही घरच्यांकडून मदत मागून पाहिली. "तुमचं काय आहे ते, तुम्हीच निस्तरा" घरातल्यांनी हात वर केले. प्रेमाचा साईड इफेक्ट काय असतो. याची स्नेहाला अनुभूती येऊ लागली. दोन्ही कडून स्पष्ट नकार मिळाला. हिला मायेच्या आधाराला कोण नव्हता. परंतु ही जराही डगमगली नाही. नोकरी करतांना न्यायालयात केस भांडत होती. पगार जास्त नव्हता. भाड्याच्या घरात राहून, उरलेल्या खर्चात ती त्याला सोडवायला खटाटोप करत होती. महिन्यात खूप दांड्या व्हायच्या. परंतु मालक तिला सांभाळून घ्यायचे. त्याबदल्यात सुटीच्या दिवसात, ती काही काम करायची. हे सर्व फक्त निखिलला सोडवण्याकरताच होते. त्याच्या कोर्ट कचेरीच्या कामात खर्च होत होता जरी, तरी तिला विश्वास होता. हा निर्दोष आहे. .
तिने शहरातला मोठ्यात मोठा वकील पाहिला. पण त्याची फी हिला परवडणारी नव्हती. तिने मित्रमंडळींकडून कर्ज घेतले. तिच्या हिंमत व तिच्या संघर्ष पाहून मित्रमंडळी तिला मदत करायला पुढे आले. असे केस भांडता भांडता आता तो जामिनावर बाहेर आला. केस होतीच सुरू, परंतु तो बाहेर आला. हे महत्वाचे होते. या वर्षीचा होळीचा आलाैकिक आनंद होता. त्याच्या रंगात ती रंगली. पण नकळत भूतकाळ डोळ्यासमोर तरळला. आता तिचे डोळे पुसताना त्यालापण भरून आले.
तो बोलला तिला, "आज भुतकाळ नको वर्तमान जगू. ."
ती पण हसली. त्याच्या हातात हात देऊन दोघे रंगात रंगली.