सोनी...
सोनी...


सोनी म्हणजे मुलखाची लाजरी , भित्री. या घरात लग्न होऊन आली. नव्याची नवलाई चार दिवस असते. लग्न होऊन दोन / चार महिने उलटले , वर्ष उलटले तरी हीचा बुजरेपणा , भित्रेपणा कमीच होईना.. सासू सांगेल तेव्हढीच कामे करायची. पण त्यात सुध्दा सतरा चुका.. मनात एव्हढी भिती दाटलेली असायची.. कीं सारखं तिला वाटत रहायचे कीं आपलं काहीतरी चुकणार... आणि मग ती आणखी चुकत रहायची. बाहेर दुकानातुन काही आणायला सांगितले.. तरी हीच्या चेहर्यावर एव्हढी भिती दाटून यायची , कीं सासू आपले शब्द गिळूनच टाकायची.. मग बाहेर भाजी विकायला जाणे तर दूरच.. पण सासू तरी किती हाकणार ना हा संसाराचा गाडा ! बरेच वेळा तीला सासूने समजावूनही सांगितले होते कीं " मांज्या मेलीचे आता असे किती दिस रवलेत , मी मसणात गेल्यावर तुलाच हां सारा संबालायचा हां. तुला ह्यां सगल्याची सवय करयाच होवी " पण असं म्हटल्यावर ती तर रडायलाच सुरवात करायची. हीच्यात कधी सुधारणा होणार असं सारखं सासूला वाटत रहायचे. मुला जवळ ती बोलून थकली. पण त्याला लक्ष द्यायलाही वेळ नसायचा.
मग सासूनेच तीला कुठे कुठे मांत्रिकांकडे , बुवांकडे नेऊन आणले. अंगारे धुपारे केले. पण सोनीच्यात फरक काय पडत नव्हंता.
सासूने एकदा रागाने मुलाला सांगितले देखिल कीं हिला तू बापाकडे नेऊन सोड.. आपण सोडचिठ्ठी घेऊ. हे ऐकुन ती बिच्चारी रडू लागली. सासूलाही तीची दया आली. आणि मुलाला हे मान्य नव्हंते. त्याचे बायकोवर खूप प्रेम होते. त्याला आशा होती , कधीतरी ही नक्कीच सुधारेल. त्याच्या मित्रांनीही त्याला सांगितले होते कीं तू तीला डाॅक्टरांकडे घेऊन जा.. त्याला ते पटत होतं , पण कामाच्या रगाड्यात त्यालाही जमतच नव्हंत. आणि माघारी सोडायचं नाही , हे तर त्याने मनाशी पक्कच केलं होतं.
आणि बापाकडे तरी सोडणारं कसं ? बाप तर एकटाच होता. तीची माय कधीच गेली होती. बापही आता म्हाताराच झाला होता.. तोच कुठंतरी पडून असायचा.. तो हिला काय संभाळणार ! आणि कायमची तीला दूर करणे त्याला मान्यच नव्हंते. त्याला तीच्या भितीचे कारण माहिती होते. तीच्या लहानपणी तीचा आज्या तीला भुताखेतांच्या गोष्टी सांगायचा. त्यामुळे भुता खेतांवर तीचा विश्वास होता. तसेच वातावरणात अगम्य , अर्तक्य काहीतरी घडत असतं , याची तीला खात्री होती. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीलाच घाबरून असायची..
आजचा दिवस काही वेगळाच उगवला. सासू सकाळ पासूनच कावलेली होती. आज तीने वेगळाच अवतार धारण केला होता. ती सोनीच्या समोर दांणका घेऊनच उभी राहिली , व म्हणाली जा रानात जाऊन लाकडे घेऊन ये.. आज तूच ती आणायची आहेस. हा अवतार पाहून आधीच , कायमच गर्भगळीत असणारी सोनी थरथर कापत घराच्या बाहेर पडली.
रडत रडतच ती रानात पोचली. लाकडे गोळा करायचे सोडून एका दगडावर जाऊन बसली. अंगाचे मुटकुळे करून तशीच थरथरत तिथे बसूनच राहिली. एकीकडे आज्याने सांगातलेल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या.
अचानक गार वारा तीच्या अंगावर आला. आणि हळूच तीने समोर पाहिले. समोरचे झाड मोठ्या डोलात डोलत होते. कुणीतरी एकेक फांदी हलविल्या सारख्या सगळ्या फांद्या हलत होत्या. आता सोसाट्याचा वारा वाहू लागला. झाडाच्या फांद्या गदागदा हलू लागल्या.... तीला आठवलं , आज्याने सांगितले होते कीं झाडावर भूते रहातात. आता तीला प्रत्येक फांदीवर एकेक भूत दिसू लागले. सगळी भूते तीला पाहून फांदीवरून खाली उतरली. हळूहळू तीच्या जवळ आली. तीच्या गोल गोल फिरू लागली. नाचू लागली. तीच्या अंगावरून हात फिरवू लागली. हे कोवळं कोवळं मांस खायला मिळणार , या आनंदात तीच्या अंगाशी झोंबू लागली.
ती जोराजोरात किंचाळत होती. सोडा सोडा म्हणून ओरडत होती. देवाचा धावा करीत होती. नवर्याच्या नावाने हाका मारीत होती.. पण कोणाला ऐकू , आणि कसं जाणार !!
संध्याकाळ टळू लागली तरी सूनेचा पत्ता नव्हंता. आधी घुश्यात असलेल्या सासूला , आता मात्र काळजी वाटू लागली. सासूही मनात पार घाबरून गेली. उगाच हीला रानात पाठवले याची बोच मनाला लागली.
आता मुलगाही घरी आला. सासूने भितभीतच मुलाला घडलेली हकीगत सांगितली. हे ऐकुन तो ही मनात हबकला. आता आईला बोल लावण्यात किंवा जास्त विचार करण्यात काहींच अर्थ नव्हता.. तो काही न बोलताच तडक रानाकडे चालू लागला.
सगळं रान पालथे घातले .. पण तीचा कुठेच पत्ता नव्हता. आपली माय कुठे कुठे लाकडे गोळा करते , ते त्याला माहिती होते. त्या त्या ठीकाणी तो जाऊन आला. सोनी कुठेच सापडत नव्हती.
आता त्याचाही धीर सुटत चालला होता. तो मटक्कन एका झाडाखाली बसला. पण असं धीर सोडूनही चालणार नव्हंत. सोनीवर त्याच मनापासून प्रेम होतं. ती सापडे पर्यंत त्याच्या जीवात जीव येणार नव्हता.
डाॅक्टरांकडे तीला नेण्यास आपण खूप उशीर केला आहे , याची बोच त्याच्या मनाला जाणवू लागली. पण त्याचा काहींच इलाज नव्हता. एकट्याने संसाराचा गाडा ओढणे त्याला कठीण होत होते. तरी बरं घरचं सारं माय बघत होती. मित्रांनी डाॅक्टरांची नावे सांगुनही अजुन तो त्यांच्या पर्यंत पोचला नाही .. पण आता मात्र वेळ काढायचा नाही , हे त्यांनी मनाशी पक्क केलं..
पण ती सापडेल तेंव्हा ना !! परत एक भितीची लहर त्याच्या अगांगावर फिरली.
आता काळोखही जास्तच गडद होत चालला होता. रानात पुन्हा पुन्हा सारे भाग तो पालथे घालीत होता. त्याचा धीर क्षणाक्षणाला सुटत होता !
आणि अचानक त्याला रडण्याचा आवाज एका दगडा मागुन आला. आवाजाच्या दिशेने तो पुढे पुढे सरकत होता. त्या काळोखातही ती त्याला दिसली. गच्च डोळे मिटलेले. आणि जोराजोरात रडत ओरडत होती. मला सोडा , मला सोडा.. तीला पाहून त्याचे अश्रू दाटून आले. ह्रदय पिळवटून निघाले. तो तीच्या जवळ गेला. थंडगार पडत चाललेला तिचा देह आपल्या कवेत लपेटून घेतला. व तीच्या डोक्यावरून तो हात फिरवू लागला , तीचे मुके घेऊ लागला. तोंडाने तीला एकीकडे समजावीत होता.. " नको गे बाय असे करूस , अशी रडू नकोस , घाबरू नकोस. मी आलोय ना आता , तुला कोणी काहीही करणार नाही.
नवर्याचा बलदंड स्पर्श होताच ती भानावर आली. तीने नवर्याला गच्च मिठी मारली. तिचा नवरा म्हणजे तिचा आधार होता. त्याच्या मिठीतच फक्त तिला सुरक्षित वाटत असे.. तो जवळ असतांना आपलं कोणीच काही वाकडं करू शकणार नाही याची तिला खात्री होती.
आता मात्र त्याने अजिबात वेळ काढला नाही. तीचं ते मुटकुळं उचललं , आणि रानाच्या बाहेर येऊन त्याने तडक डाॅक्टरांचे घर गाठले....