Manisha Patwardhan

Tragedy

3  

Manisha Patwardhan

Tragedy

देवाला जेव्हा जाग येते

देवाला जेव्हा जाग येते

3 mins
185


    दुपार टळून गेली . पांडू सुन्नपणे बसून होता. काय ठरवलं होत... आणि काय झालं ... त्याच त्यालाही कळत नव्हतं.. दुःख सांगायला कारभारीणही राहिली नाही..पोराची थेरं पाहून ती कवाच देवाघरी निघून गेली. पण तरीही पांडूने हार मानली नव्हती. पोरगं सुधारेल म्हणून तो वाट पहात होता. पण..... नशिब काही वेगळंच घडवित होतं.


      देवा .... मोठ्या हौसेने पोराचं नाव देवा ठेवलं होत. नवसा सायासाने झालेल्या या पोराला, कुठं ठेवू आणि कुठं नको.. असं पांडूला झालं होत. देवाच्या आधीच्या, पांडूला दोन पोरी होत्या. पण त्यांच्याकडे पांडूच लक्षच नसायचं. वय व्हायच्या आधीच पांडूने त्यांच लग्न लावून दिल होत. त्या कशा रहातात, काय करतात .. हे ही पांडूने कधी पाहिलं नाही. त्याच एकमेव लक्ष म्हणजे देवा....


      त्याने मनात ठरवूनच टाकल होतं. काही झालं तरी देवाला काहीही कमी पडू द्यायचं नाही. अगदी लहान असल्या पासूनच देवाला लाडाकोडात वाढवायला सुरवात केली होती. खरंतर पांडूची एवढी परिस्थितीही नव्हती... पण वेळी स्वतः उपाशी राहून देवाचे हट्ट पुरे करीत असे. देवा म्हणजे त्याच स्वप्न होतं.... त्याने आपल्यासारखे राहू नये. चांगले शिक्षण घ्यावे, शाळेत जावे.... चार बुकं शिकला कीं त्याला चांगली नोकरी लागेल... आपल्या सारखी कोणाची तरी चाकरी करून, कींवा गरिबीत दिवस काढावे लागू नयेतम्हणून... कष्टाची भाकरी आता बास झाली.. आपण मातीत काम केलं, शेतात काम केलं.. आणि ते सुध्दा दुसर्‍याच्या.. मालकाची वाट्टेल ती कामे केली.. वेळी बुटंसुध्दा पुसून दिली. ते देवाला करायला लागू नये, यासाठी पांडू झटत होता. स्वतः भरपुर काम करीत होता, दिवस रात्र कष्ट उपशीत होता.


         पण..... नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.. देवाला शाळेत घातलं होत खरं, पण त्याच लक्षच नसायचं शिकण्याकडे.... तो शाळेत जायला म्हणून निघायचा.. पण महिन्यातले चार दिवससुध्दा शाळेत जायचा नाही. आणि जायचा त्या दिवशी भरपुर तक्रारी घेऊन यायचा. पण पांडूला वाटायचं कीं मास्तर उगाचच देवाच्या तक्रारी सांगतात... " माजा देवा तसा नायच, मोट्ट गुणाचं पोरगं हाय, त्याला का वरडतात मास्तर " ... 


ते पांडूला कळतच नव्हत. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूपच उशीर झाला होता. जेंव्हा देवा आठवीत तीन वेळा नापास झाला तेंव्हा त्याला

शाळेतुन काढून आलं... सातवीपर्यंत कुणालाही नापास न करण्याच्या सरकारी नियमाप्रमाणे वरवर चढत गेला...पण नंतर...


      घरी बसल्यावर देवा जास्तच त्रास देऊ लागला. वाईट मुलांच्या संगतीत राहून, त्याला वाईट सवयी लागल्या. विड्या, गुटखा, एवढ्यावरच गाडी थांबली नाही. अधुन मधुन दारूही पिऊ लागला. दारू प्यायला प्रथम घरात चोरी...., नंतर बाहेरही करू लागला. या सार्‍याचा पांडूच्या बायकोने धसका घेतला.. ती आजारी पडली. आजारपणात खर्च करायला पांडूकडे दमडीही नव्हती....रोज मरत मरत एक दिवस खरंच देवाकडे गेली..


      आई गेल्याचही देवाला काहीच वाटलं नाही. आपलं कोड कौतुक पुरवायला बाप होताच कीं.... अशीच देवाची भुमिका असावी..


      आज पांडूला मात्र याची जाणीव झाली कीं आपलं चुकलं.... सगळे आपल्याला सांगत होते... पांडू तुझा पोरगा बिघडत चाललाय. मालक पण सांगत होते ... " अरे पांडू जरा लक्ष दे पोराकडे " ... पांडूला ते कधीच पटले नाही. खरंतर मालकांचा मुलगा देवा एवढाच होता.... आज तो मोठ्या आॅफीसात ... एवढ्या लहान वयात, चांगल्या पदावर, गलेलठ्ठ पगाराची नोकरी करीत होता... मालकाने स्वतःकडे पैसे असूनदेखील मुलाचे कधी फाजील लाड पुरवले नाहीत. हे खरंतर पांडूने पाहिलेच होते. आणि म्हणूनच आपलं काय आणि किती चुकलं याची पांडूला जाणीव झाली.... पण आता फारच उशीर झाला होता.


  आता या गोष्टींचा विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता. देवाच्यात काहीही सुधारणा होणारच नव्हती, पांडूच्यात तेवढे त्राणही उरले नव्हतेच.. मनाने आणि शरीराने तो पार खचून गेला होता. काही दिवसापुर्वी त्याला कुणीतरी व्यसनमुक्ती केंद्राची माहिती व पत्ता दिला होता... पण तो ही प्रयत्न फसलाच. चार लोकांना बोलावून बांधुन घालून, देवाला त्याने तिथे नेले होते.. पण तेथुनही तो पळून आला.


    अशा तर्‍हेने सर्व मार्ग संपले होते. आता पांडू स्वतः संपण्याची वाट पहात होता. देवाची सर्व थेरं पांडूला पहावत नव्हती.. आता देवाच्या हट्टाकरीता पांडूकडे काहीच नव्हत.. कारभारणीने तीच्या हौसेने, तिच्या कुवतीने, मालकाने काहीबाही दिलेलं जपून ठेवून संसार संभाळला होता. पण तो ही देवाने

विकून खाल्ला होता.


    गेल्या कित्येक दिवसात पांडूच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. दिवसें दिवस तो कृश होत चालला होता. उभे रहाण्याची ताकदही नव्हती त्याच्या अंगात...देवाच्या विचाराने त्याचा मेंदूही काम करीत नव्हता.


    आजही तेच विचार घेऊन तो सुन्न बसला होता. तेव्हढ्यात भेलकांड्या जात असलेल्या स्थितीत देवा येतांना दिसला. पांडूच्या हृदयात, त्याला आजही तसेच पाहून ... एक जोराची कळ उठली. आणि तो बसल्या जागीच उताणा पडला... कधीही न उठण्यासाठी....  देवाची दारू खाडकन उतरली.... त्याने हंबरडा फोडला. पण..... आता फारच उशीर झाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy