Manisha Patwardhan

Tragedy

3  

Manisha Patwardhan

Tragedy

जगावेगळं प्रेम

जगावेगळं प्रेम

6 mins
291


    उमेश त्या धक्क्यातून तीन / चार महिने उलटून गेले तरी अजुन सावरतच नव्हता... हे सगळं बुध्दीच्या पलीकडले असे , कसे घडले हे त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडले होते. विचार करून करून उमेशचे मस्तक मात्र सून्न होऊन जात असे...

    खरंतर भाऊसाहेब व त्यांची पत्नी निलांबरी ही दोघं त्याच्यावर आई वडिलांप्रमाणे प्रेम करायची. तो ही त्यांच्याकडे त्याच आदरयुक्त प्रेमाने पहायचा. त्यांची भेट होऊन तसे काही खूप दिवस झाले नव्हंते. परंतू अगदी कमी वेळातच त्यांचे दृढ संबंध निर्माण झाले. 

    त्याचे असे झाले कीं उमेश व त्याची पत्नी एकदा असेच फिरत फिरत एका बागेत जाऊन बसले होते. तेथेच या दोघांची भेट झाली. ओळखीचे रूपांतर घनिष्ठ संबंधात कधी झाले ते दोघांनाही कळलेच नाही. तो त्यांच्या घरी नेहमी जाऊ लागला. उमेशला सुट्टी असली कीं त्यांच्या घरी फेरी असायचीच. ते ही त्याचे स्वागत जोरदार करायचे. अगदी मुलाप्रमाणेच, तो गेला की त्याचे कोडकौतुक व्हायचे. खूपवेळ गप्पाटप्पा खानपान होऊनच तो घरी परतायचा.. मग बायकोही त्याला गंमतीने म्हणायची कीं आज माहेरी गेला होतात वाटतं?  

    ते रहात होते ती जागा तशी लहान होती. पैशाची वानवा तर नव्हंतीच.. ते मोठी जागा घ्यायच्या गोष्टी करायचे. आणि नेमकी याच्या बिल्डिंग मधली जागा रिकामी झाली. ती जागा घेण्याचा उमेशने त्यांना आग्रह केला. दोघंही आता निवृत्तीचे आयुष्य जगत होती. कोणीतरी आधार म्हणून जवळ हवेच ना ! म्हणून उमेशने त्यांना सुचवले, आणि ते ही तयार झाले. 

    उमेशने खास रजा घेऊन त्यांना घर बदलायला मदत केली. त्याच्या बायकोनेही घर लावायलाही मदत केली. थोडे दिवस अशी त्यांची एकमेकांच्या घरी येजा चालू होती. परंतु उमेश आणि त्याची बायको आपल्या संसारात, व्यापात गुंतलेले होते. दोघांच्याही नोकर्‍या चालू होत्या. मुलांची शाळा.. यातून ते शेजारी आले तरी रोज काही जाणे शक्यच नव्हते. 

    असेच काही दिवस गेल्यावर, त्याच्या कानावर शेजार्‍यांकडून तक्रारी ऐकू येऊ लागल्या. त्यांच्या भिंतीला भिंत लागलेला शेजारी एक दिवस त्याच्याकडे खास भेटायला आला व उमेशला सांगू लागला, काय तुम्ही ही माणसे आमच्या शेजारी आणून ठेवलीत. रोजचा आमच्या डोक्याला ताप आहे. मुलांचे अभ्यास होत नाहीत. मुलगी माझी दहावीला आहे. उमेशने जरा त्यांची समजुत काढून पाठवून दिले. पण रोजच्याच या तक्रारी वाढतच चालल्या. 

    तो मात्र कधीही त्यांच्याकडे गेला की त्याचे छान स्वागत व्हायचे. लोक ज्या तक्रारी करीत तसा मागमुसही त्याला कधी त्यांच्या घरात दिसायचा नाही. त्यामुळे शेजार्‍यांच्या बोलण्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण सारख्याच तक्रारी येऊ लागल्यावर त्याच्या मनात विचार आला कीं ते जिथे आधी रहात होते ,त्यांच्याकडे जाऊन थोडी माहिती काढावी. कारण तेथुन येतांना एका शेजार्‍याचे बोलणे उमेशला आठवले. तो म्हणाला होता की "बरें झाले ही आमच्या मागची ब्याद घेऊन जाताय ते ठीकच आहे" पण ते तेव्हा उमेशने ऐकून न ऐकल्यासारखे केले होते. कारण सगळेच दोस्त कसे असतील, कुणीतरी दुश्मन असणारच ना !!

    पण तेथे त्यांची जी माहिती शेजार्‍यांनी दिली ते ऐकुन तो हतबुध्दच होऊन गेला. काका काकू असे काही वागू शकतील, हे त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडले होते. स्वप्नातही हे त्याला शक्य वाटत नव्हते.

    काका काकूंचा प्रेमविवाह होता. दोघंही एकमेकावर जीवापाड प्रेम करीत होते आणि आजही ते प्रेम वेळोवेळी दिसतही असे. काका तसे दिसायला यथातथाच होते. पण काकू मात्र अतिशय रूपवान होत्या. त्या सिनेमा, नाटकात काम करायच्या. पण काकूंचे वागणे मात्र कधीही वावगे नव्हते. पण काकांच्या मनात मात्र कायम संशय असायचा. दोघही घरी आली कीं त्यांची जोरदार भांडणे चालायची आणि नुसती भांडणेच नाहीत तर जोडीला दारूचा ग्लास असायचा, त्यामुळे दोघंही धिंगाणाच घालायचे. पण काका बाहेर गेलेले असतील तर काकू सारख्या फोन करायच्या आणि काकू घरी नसतील तर काका आत बाहेर सारख्या फेर्‍या मारीत बसायचे.. म्हणजे हे असेच झाले ना !! की " तुझं माझं जमेना व तुझ्या वाचून करमेना "...दोघांनी निवृत्ती स्वीकारल्यावर तर .. दिवसभर भांडभांड भांडायचे, पण रात्री पेग घेऊन एकत्र बसायचे... असं जगावेगळं प्रेम होतं त्यांच..

    आणखी एक नवीन माहिती उमेशला मिळाली ती म्हणजे त्यांना एक मुलगाही आहे. पण यांची अशी ही भांडणे ऐकून तो स्वतःहुनच हाॅस्टेलमध्ये रहायला गेला. फक्त पैशापुरताच त्याने संबंध ठेवला होता. नंतर तर त्याला शिष्यवत्ती मिळाली आणि तो परदेशात निघून गेला, तो परत घराकडे फिरकलाच नाही. तिकडेच लग्न करून, तिकडेच स्थाईक झाला. 

    ही सारी माहिती काकांनी आपल्यापासून कां बरं लपवली असेल.. हे ही त्याला पडलेले कोडेच होते.

    आणि एक दिवस त्यालाही तोच अनुभव आला. उमेश व त्याची बायको असेच गप्पा मारीत बसले होते आणि अचानक जोराजोराने भांडणाचे आवाज येऊ लागले. त्याचबरोबर भांड्यांचेही आवाज येऊ लागले. जोरजोरात आदळ आपट चालू होती. तो स्वतः ऐकुन त्यांच्या खोली बाहेर गेलाही होता. पण मग बायकोने त्याला घरात आणले व आपण नवरा बायकोच्या भांडणात पडणे बरोबर नाही अशी समजुत घातली. असा हा स्वतःच अनुभव घेतल्यानंतर मात्र उमेशने हळूहळू त्यांच्याकडे जाणे कमी केले.. पण त्यांच्याबरोबर घडलेल्या काही चांगल्या आठवणीही उमेशच्या सोबत होत्या. त्या या सगळ्या लोकांच्या तक्रारी ऐकुन मनाला बेचैनी आणत होत्या.

    त्यानंतर जो प्रकार घडला, तो तर महा भयानकच म्हणावा लागेल. गेले आठ / दहा दिवसात काकांचे दारच उघडे दिसले नाही. आता तो फारसा त्यांच्याकडे जायचा नाही आणि काका एक दोन वेळा मद्याच्या दुकानात उभे असलेले उमेशने पाहिले होते. ते नेहमीच कागदात गुंडाळून बाटली घेऊन येत असत. त्यामुळे दार बंदच असते हे त्याच्या लक्षातही आले नव्हंते. 

     उमेशने आणखी आसपासच्याही माणसांकडे चौकशी केली. पण त्यांनीही काकांचे दार उघडलेले पाहिले नव्हंते. आणखी सखोल चौकशी केल्यावर त्यांच्या दाराजवळून गेलं की सेंटचा किंवा उदबत्यांचा जोरदार वास येतोय असेही एका शेजार्‍याने सांगितले.

    पण तो दिवस वेगळाच उगवला. काकांच्या दारावरून कोणीतरी गेले, त्याला घाणीचा दर्प आला.. त्याने सर्वांना गोळा केले. तेथे उभे रहाणार्‍यांना उलटी होईल की काय असेच वाटत होते. सगळे नाकावर रूमाल दाबून धरून, केवळ उत्सुकतेपोटी तेथे उभे होते. दारावरची बेल वाजवून झाली, दारावरती जोराजोरात थापा मारून झाल्या.. तरी दार उघडण्याचे नावच नव्हंते. शेवटी पोलीसांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही हाका मारून, दार वाजवून प्रयत्न केला. पण तो ही फोलच ठरला.

    शेवटी पोलीसांनी दार तोडले.. समोरचे दृष्य फारच भयानक होते. ते पाहून सारे तर आवाक झालेच.. परंतु उमेशने ते दृष्य पाहिल्यावर त्याला भोवळ येते आहे कीं काय असेच वाटले. त्याने आपले डोळे गच्च मिटूनच घेतले. एका शेजार्‍याने त्याला वेळीच सावरले म्हणून.. नाहीतर तो खाली पडलाच असता.. इतकी त्याची अवस्था ते भयानक दृष्य पाहून झाली.

     बाथरूमच्या दारात अर्ध्या आत व अर्ध्या बाहेर अशा काकू अस्ताव्यस्त स्थितीत पडल्या होत्या आणि त्या देहाजवळच काका दारूचा ग्लास घेऊन बसले होते. काकूंचा ग्लासही भरलेला होता. काकांना एवढी दारू चढली होती की घाणीचा दर्प त्यांच्यापर्यंत पोचतच नव्हता. सगळीकडे सेंटच्या रिकाम्या बाटल्या, उदबत्यांची राख व विझलेल्या काड्या पडल्या होत्या. आज त्यांना दारू एवढी चढली होती की त्यांनी सेंटही फवारले नव्हते, उदबत्त्याही लावल्या नव्हत्या.. आणि म्हणूनच घाण वास बाहेरपर्यंत पोचला.

    दार तोडून पोलीस आत शिरल्यावर मात्र काका लटपटत, पण ताडकन उभे राहिले आणि पोलीसांच्या अंगावर जोराजोरात ओरडू लागले, की तुम्ही तिला कोठेही न्यायचे नाही. ती माझी आहे व माझ्याजवळच रहाणार. हे बोलतांना काकांच्या डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहू लागल्या. ऐकून सारेच स्तंभित झाले, चक्रावून गेले. पोलीसांनाही मिनिटभर काय करावे ते कळत नव्हते. शेवटी जोरजबरदस्ती करून, काकांना बाजुला करून काकूंचा देह घेऊन गेले व काकांनाही पोलीस स्टेशनला पकडून घेऊन गेले. 

    नशिबाने पोस्टमाॅर्टममध्ये काकूंना हार्ट अटॅक आल्याचे सिध्द झाले. आठ दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

    उमेश जरा त्यांच्या जवळचा म्हणून त्याला पोलीसांनी पोलीस स्टेशनला बोलावले व उमेशने त्यांना, त्याला जी माहिती होती ती पोलीसांना सांगितली. मग पोलीसांनी त्यांच्या मुलाचा नंबर काकांच्या घरातून शोधून काढला. आणखी कोणत्याही नातेवाईकाचा फोन नंबर त्यांच्या घरात सापडला नाही. मुलाला फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली.

    मुलगा आता मात्र तातडीने आला. आईला अग्नी देवून, बापाची वृध्दाश्रमात रवानगी केली. बापाच्या सह्या सर्व पाहिजेत त्या फार्मवर घेऊन, जागा विकून टाकली, बॅन्क बॅलन्स रिकामा केला व आल्या पावली तो चालता झाला. 

    या गोष्टीला दोन / तीन महिने झाले आणि एकदिवस वृध्दाश्रमातून उमेशला फोन आला. काकाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने गेले. वृध्दाश्रमवाल्यांनी त्यांच्या मुलालाही फोन लावला होता, परंतु तो आलाच नाही आणि मला वेळ नाही, तुम्हीच अग्नी देऊन टाका. पाहिजेत तेवढे पैसे मी पाठवतो, असेही सांगितले. 

    मग उमेशनेच देह ताब्यात घेतला. काकांचे वागणे नंतर बदलले असले तरी काही काळ त्यांनी त्याला आपल्या मुलाच्या जागी पाहिले होते. याची जाणीव ठेवून उमेशने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले व पुढचे कार्यही यथासांग पार पडले.

    पण या सगळ्या आठवणीतून, घडलेल्या घटनांमधून उमेश अजुनही पुरा बाहेर पडतच नाही.. सार्‍या घटना त्याच्या डोळ्यासमोर सतत दिसत होत्या. त्या विचारातून तो बाहेरच पडत नव्हता. उमेशच्या पत्नीनेही हरतर्‍हेचे प्रयत्न केले. मुद्दाम काहीतरी विनोदी बोलायचे, त्याला मुद्दामच घराबाहेर काहीतरी आणायला पाठवायचे.. एकदा तर तिने सिनेमाची तिकिटेही काढून आणली पण तेवढ्यापुरताच तो सगळ्यांच्यात असायचा.. पण परत आजच्यासारखा असाच दिवस उगवतो व त्याची मनःस्थिती अशीच होते व तो असाच सुन्न बसून रहातो. सैरभैर होतो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy