मुक्ती
मुक्ती
नेहमीपेक्षा लवकरच आज जान्हवीला जाग आली. ती लगेच उठली. नवरा बाजुला झोपलाय कीं नाही हे ही तिने पाहिलं नाही.. आणि ती लगेच वाॅशरूमकडे वळली. ब्रश करून, वाॅश घेऊन ती स्वयंपाकघरात गेली. चहाचे आधण ठेवले. दुध तापवले..
चहा घेऊन ती सासू सासर्यांच्या खोलीत गेली. तिने त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला.. पण दोघंही तिच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत दिसले नाहीत.. या उलट त्यांनी तिच्याकडे लक्षच दिलं नाही.. असंही तिच्या निदर्शनास आलं.. त्यांचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते.. तिने तसं म्हटलंही.. पण बराच वेळ थांबूनही तिच्याकडे दोघांनीही लक्ष दिलं नाहींच.. यांच आज काय बिघडलयं असं म्हणतच ...शेवटी ती खोलीतुन बाहेर पडली. कारण तिलाही फारसा वेळ नव्हंताच.. सगळ्यांचे डबे करायचे होते.. म्हणून ती लगेच बाहेर पडली.
आश्चर्य म्हणजे मुलगा व सून यांच्या खोलीचे दार कधी नव्हे ते लवकर उघडलं होतं.. पण ती दोघंही खोलीत नव्हती. नातू मात्र गाढ झोपलेला दिसला.. दोघं बहुदा माॅर्निंग वाॅकला गेली असावीत.. असा विचार करून ती स्वयंपाक घरात शिरली.
ऑफीसमधुन निवृत्त झाली असली तरी स्वयंपाक घरातुन ती अजुन निवृत्त झाली नव्हती. मुलाचा डबा , सूनेचा डबा .. सासू सासर्यांच्या पथ्याचे , नवर्याच्या आवडीचे सगळंच तिला पहायचे होते.. दिवसभर नातवाला संभाळायचे होते.. त्याच्यापुढे दुसर्या कोणत्याही कामाला तिला नंतर वेळच मिळत नसे.
आत्ताही लगेच तिने स्वयंपाकाला सुरवात केली . भराभर स्वयंपाक करायचा म्हटला , तरी तिचे दोन तास गेलेच. अजुन सारी उठली कशी नाहींत.. आत कोणी आलं कसं नाहीं.. असं तिच्या मनात आलं.. नाही म्हणायला सून अर्चना घरात येऊन गेली.. पण तिचं हीच्याकडे लक्षही गेलं नाही. पाणी प्यायली आणि गेली... पण हीच्याकडे पाहिलंही नाही.. पण हीचे मात्र तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेलेच.. ते रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते.. हीने अर्चनाला विचारलेही.. " अग काय झालं ? काहीं होतयं कां तुला ? पण तिने काही लक्षच दिलं नाही. मग हीला वाटलं.. बहुदा ही माझ्यावरच रागावली आहे.. पण मी तर हीचे काहींच केले नाही.. कसला वादविवादही झाला नाही.. पण मग असे झाले तरी काय ? बहुदा सारंगशीच भांडण झाले असेल.. जाऊदे बघतील त्यांच ते.. असं मनात म्हणून ती आपल्या पुढच्या कामाला लागली.
स्वतःचे सर्व आंघोळ , वेणीफणी आटपून ती मार्केटला जायला निघाली.. सहाजिकच ती हाॅलमध्ये आली. तर हाॅलमध्ये ही गर्दी जमलेली.. शेजारचे पाजारचे , नातेवाईक ..सगळे जमलेले.. तिने विचारलेही एक दोघांना कीं " आज सकाळी सकाळी कसा काय दौरा काढलात ? " पण त्यांनीही काहींच लक्ष दिले नाही. समोरच अर्चना शेजारच्या जोशी काकूंशी बोलत होती. तिथे जाऊन ही ऐकू लागली.. जोशी काकू विचारत होत्या .. " काय ग झाले अचानक ? " त्यावर अर्चना रडत रडत म्हणाली.. " काहींच नाहीं हो.. सगळं अचानकच झालं. रात्री झोपतांना बर्या होत्या.. त्यांनीच सगळं स्वयंपाकपाणी केलं.. पण रात्री कधीतरी त्यांच्या छातीत कळ आली बहुदा.. त्या जोरात ओरडल्या. मग आम्ही धावत सगळे खोलीत गेलो.. पण.. बहुदा त्याच वेळी सारं संपलं होतं. , डाॅक्टरना बोलावलं .. पण काहींही उपयोग नव्हंता.. " आणि अर्चना पुन्हा हमसाहमसी रडू लागली..
जान्हवीला वाटलं सासूबाईंनाच काहीं झालं कीं काय .. पण मग विचार आला , कीं नाही सकाळी आपण त्यांच्या खोलीत चहा द्यायला गेलो होतो.
हाॅलमध्ये ती इकडे तिकडे पाहू लागली.. तर कोपर्यात कुणाचा तरी देह ठेवला होता.. बाजुला उदबत्त्या लावल्या होत्या.. ती आणखी जवळ गेली.. त्या देहाचं शरीर पूर्ण झाकलं होतं.. पण ... चेहरा तर उघडा होता !! तिने हळूच चेहर
्याकडे पाहिलं. क्षणभर तिला आरशात पाहिल्यासारख वाटलं..
पण क्षणात तिच्या लक्षात आलं.. अरे हा तर आपलाच देह.. मग आपला आत्माच सकाळपासून घरात वावरत होता तर !! तरीच कोणी आपल्याकडे लक्ष देत नव्हंत ..
बिल्डिंगच्या खाली तिने हळूच पाहिले.. सगळी तयारी झालीच होती.. तिचा देह हळूच उचलला गेला.. श्रीराम जयराम जय जय राम चा गजर ऐकू आला. घरात मात्र एकच हलकल्लोळ माजला.
लेक जावई आले होते.. मुलीची माया काही औरच !! आल्या आल्या तिने जान्हवीच्या देहाला घट्ट मिठी मारली होती.. कुणीतरी अती कष्टानेच तिला बाजुला केले. अनघा तिची लेक , लाडाकोडात वाढलेली.. धाय मोकलून रडत होती. आजीला घट्ट मिठी मारून विचारत होती.. " काय झालं आईला.. अशी मला न सांगता सवरता ती निघून कशी काय गेली ? डोळ्यातलं पाणी खळतच नव्हंत. आजी , आजोबा सारेच तिची समजुत काढण्याचा प्रयत्न करीत होते.. पण त्यांचच दुःख त्यांना सहन होत नव्हंत.. तर ते तिची काय समजुत काढणार ! जान्हवी विझलेल्या डोळ्याने सारं पहात होती..तिने हळूच अनघाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. जावयाला सांगितलं " संभाळा माझ्या लेकीला " पण अर्थातच ते त्याला ऐकू गेलंच नाही..
थोरला मुलगा मडकं धरून पुढे चालू लागला.. कोणाच्याही डोळ्यातले पाणी आटतच नव्हंत.. सासूबाई व सासरेही जोराजोरात आक्रोश करीत होते... " अरे आम्हाला उचलायचं होतस ना !! आता या वयात कोण करणार आहे आमचं .. रडता रडता सासूबाई तिथेच बेशुध्द होऊन पडल्या... एक क्षण ती मागे वळलीही होती.. तिचे पाय तिथेच अडखळत होते.. बाहेर पडायलाच तयार नव्हंते. केवढं सार्यांच प्रेम आहे आपल्यावर ..मन स्वतःचा मृत्यु मानायलाच तयार नव्हंत. सार्यांच्या प्रेमातुन बाहेर पडायलाच तयार नव्हंत.. पण तिने स्वतःला सावरलं... या माया मोहापासून दूर जायलाच पाहिजे.. स्वतःलाच समजावलं..आता आपलं जग वेगळं... वाईट वाटून घ्यायचच नाही.. आणि उपयोगही नाही.. अस म्हणून तिने सासूसासर्यांना नमस्कार केला.. मग नवर्याच्या समोर आली.. त्याचा चेहरा तर बघवतचं नव्हंता.. पुरूषाने रडायचे नसते.. पण अडवलेले अश्रू शर्टावर सांडतच होते.. मनात विचार आला... किती भांडायचो आपण.. तुम्ही मला किती बोलायचात.. राग यायचा मला .. पण आज तुमच्या चेहर्याकडे पाहून .. कळतयंं .. किती होतं तुमच प्रेम !! सांभाळा स्वतःला.. साता जन्माच नात आपलं.... संपायचं नाही असं !! मी वाट पाहीन तुमची.. त्यांच्याही पायाला हात लाऊन तिने नमस्कार केला. ती तशीच पुढे त्या लोकां बरोबर चालू लागली.. पण तिला आठवण झालीच.. ती धावतच मुलाच्या खोलीत गेली.. नातू शांत झोपला होता.. हळूच त्याच्या गालावरून हात फिरवला..प्रेमभरा एक पापा घेतला.. शेवटचाच.. आणि पुन्हा ती त्या लोकांसमवेत चालू लागली.. आता सारे पाश संपले होते...
मग तिचं सारं लक्ष आपल्या सजवलेल्या देहाकडे लागलं.. शेवटचं तिने त्याकडे पाहून घेतलं.. नवीकोरी हिरवी साडी .. हिरव्या बांगड्या.. कपाळावर मोठ्ठ कुंकू रेखलेलं...पदरात ओटी बांधलेली..संपूर्ण देहावर फुलं , हार गुलाल पसरलेला... मुखावर सोनं मोती ठेवलेले..तिच तिच्या देहाकडे मोठ्या कौतुकाने पहात होती... चेहरा शांत आनंदी दिसत होता.. याच तिलाही फार बरं वाटलं... कोणतीही आशा , आकस चेहर्यावर दिसत नव्हता... फक्त समाधान दिसत होतं.
देह लाकडावर ठेवला गेला.. गुरूजींनी मंत्र चालू केले.. मुलाने अग्नी दिला.. तिने त्याच्याकडे डोळे भरून शेवटच पाहून घेतलं. त्या ज्वाळा आपल्याला लपेटल्या आहेत.. बिलगून बसल्या आहेत.. असं वाटून तिने प्रेमाने डोळे मिटून घेतले..तिला शांत पिसासारखं हलकं हलकं , मोकळं मोकळं वाटू लागलं.. अज्ञाताच्या दिशेने एक वेगळा प्रवास सुरू झाला...