अंजन
अंजन
सानिका धाड धाड आवाजात जिना चढून आली. हातात भली मोठ्ठी बॅग होती , जी भरून तिला सासरी धाडले होते, तिच बॅग !! तिला तशी येतांना बघूनच शर्मिलाला धडकी भरली. सानिका कधीतरी हे करणारच याची शर्मिलाने कल्पना केलीच होती. परंतु हे एव्हढ्या लवकर घडेल असे मात्र शर्मिलाला वाटले नव्हते.
तशी शर्मिला स्वतः मोठ्ठी शिस्तिची होती. परंतु मुलांच्या बाबतीत मात्र तिची शिस्तिची गणिते जरा चुकलीच होती. त्यात मुलगा मुळातच समंजस होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत असे प्रश्न कधी उद्भवले नाहीत. त्याचे आणि सुनबाईचे छान गुळपीठ जमले होते. आणि सुनबाईही त्याच्या तोडीसतोड होती. कुठेही त्या जोडीकडे बोट दाखवायलाही जागाच नव्हती. पण सानिकाच्या बाबतीत ती पहिल्या पासूनच थोडी हळवी होती. त्यामुळे तिला कोणी ओरडायचे नाही. असा शर्मिलाचाच खाक्या होता. सानिका दिसायलाही गोरी गोरी पान , नाजुक .. चाफेकळी नाक , लांबसडक केस .. अशीच होती. कोणीही लाडकोड करावेत अशीच..
लग्न करतांनाही , खूप स्थळे पाहिली. अगदी तावून सुलाखून पाहिलेले होते हे स्थळ.. मुलगाही छान होता. माणसे छान होती. सासूही हौशी होती. घरची श्रीमंती होती. आणि तशीही सानिकाला नोकरी करायचीच नव्हतीच.. त्यामुळे तो ही प्रश्न नव्हता..
पण तरिही लग्न करतांनाच शर्मिलाला ही भिती मनाला सतावित होतीच. पण जेंव्हा लग्न झाले त्याच वेळेला शर्मिलाने व तिच्या नवर्याने ठरवलेच होते कीं आता तिचे आयुष्य त्या घराशी जोडले गेले आहे , तेंव्हा आता तिने तिथल्या पध्दती अंगी बाणावल्या पाहिजेत. कोणत्याही आलतू फालतू कारणावरून आपण तिला पाठिशी घालायचे नाहीच. त्याच बरोबर कोणते संकट त्यांच्यावर आले. किंवा कोणी आजारी असेल , तर गरजेच्यावेळी नक्कीच मदत करायचीच..
सानिका फणफणत जीना चढून आली. तेंव्हा शर्मिलाने तिला एका शब्दानेही त्याबद्दल विचारलेच नाही. आणि शर्मिलाच्या नशिबाने नेमके त्याचवेळी बाहेरचे पाहुणे घरात आले व सहजगत्या तो विषय तिला टाळता आला. सानिका रूम मध्ये जाऊन अंथरूणावर पडून जरावेळ धुमसत होती व नंतर तिला झोप लागली.
आलेले पाहुणे लगेचच गेले. शर्मिलाने सुनबाईला हाक मा
रली. आणि तिला सांगितले मी थोडे दिवस तुझ्याशी वाईट वागणार आहे. पण तू त्याचे वाईट मात्र वाटून घेऊ नको. तसेच आता सानिकाचेही कोडकौतुक करणे तर सोडच पण शक्यतो तिच्यावर दुर्लक्षच करायचे.. तिला " आपण स्वतःच सगळ्यांशी वाईट वागतो आणि दुसर्याला कसा तोरा दाखवतो " याची जाणीव झालीच पाहिजे. तिची सासू स्वभावाने खूप छान आहे, प्रेमळ आहे. ती हिच्याशी वाईट निश्चितपणेच वागत नाही. मी कधी पासून त्या बाईला ओळखते. आणि त्यांची मोठी सून तर आपल्या नात्यातलीच आहे. तिनेही सासूचे गुणगान माझ्याकडे केले आहे. तेंव्हा आता आपल्याच मुलीला आपण धडा शिकवला पाहिजे.
सानिका आली आणि पाठोपाठ तिच्या सासूचा फोनही आला. शर्मिलाने विहिणीला आश्वासन दिले कीं " तुम्ही काही काळजी करू नका, ती जशी इकडे आली तशीच ती परत येईल ही माझी हमी आहे.. आणि तुम्ही तिला फोनही करू नका. नाहींतर ती आणखी तुमच्या डोक्यावर बसेल.."
असे घरातल्या सर्वांनीच ठरवून टाकले. सानिका उठली तरी तिला तिच्या येण्या बद्दल कोणीच काही प्रश्न विचारले नाहीत. चार दिवस ती आल्यासारखे कौतुक केले.
आणि ही सासू सुनेची जोडी मात्र थोडक्या कारणांवरून सानिका समोर कडाकडा भांडत होत्या. ती माहेरी आल्याचे कुणालाच काही सोयरसुतक नव्हंते.. असेच सर्व मंडळी भासवित होती.
सानिकाच्या आता हळूहळू लक्षात येऊ लागले होते कीं अरे इथेतर वेगळेच चित्र दिसत आहे. ही आपलीच आई आहे ना ! ही वहिनीशी एव्हढी वाईट कशी वागू शकते ! आणि वहिनीही हे सगळे आईचे ऐकुन ऐकुन उद्या आपल्याशी वाईट वागणार नाही कशावरून !! आणि आपल्याला तर नोकरी धंदा काहींच करायचे नाही.. मग इथे आपण आलो ते चुकलं कां आपलं .. आईपेक्षा आपली सासू खरंच खूपच प्रेमळ आहे. त्यांनीही थोडक्या दिवसात आपले भरपुर लाड केलेत. आणि नवरा... असा नवरा मिळाला हे माझे खरंच भाग्य आहे !! सासरेही देव माणूस आहेत. दिर जाऊ चांगले आहेत.. आणि आपण मात्र हे काय केले !!
परिस्थितीचे भान येऊन सानिकाने लवकरच माहेराहुन काढता पाय घेतला.
या सासू सुनेने मात्र एकमेकींच्या हातावर टाळी दिली...