भिती
भिती
आज संध्याकाळ पासूनच तीला खूप अस्वस्थ वाटत होत. पण कशामुळे , ते मात्र लक्षात येत नव्हत.आणि....... तशातच ती बातमी त्यांच्या पर्यंत येऊन पोचली. तीच्या नवर्याचा, विकासचा जीवा भावाचा मित्र निवर्तला होता. विकासला जरी तीने धीर दिला असला .... तरी तीच्या बेचैनीत वाढच झाली .
तशात आज घरातही कोणी नव्हतं. मुलगा कामासाठी बाहेर गावी गेला होता. व सूनही नातवाला घेऊन माहेरी गेली होती. आणि विकासला तर कसही करून मित्राच्या अंत्ययात्रेला जायलाच हवं होत. मित्राच्या मुलाचे , मुलीचे सात्वन करायचे होते , आधार द्यायचा होता. बिचार्यांना आई , वडिल कोणीच उरल नव्हत. मित्राची बायको त्याला सोडून आधीच गेली होती. मुल जरी तशी मोठी असली तरी त्यांना अजुन आधाराची गरज होतीच. कारण मुलाला नोकरी लागायची होती , मुलगी लग्नाला आलेली होती. आणि आता तस जवळच त्यांना कोणीच नव्हत. त्यामुळे सगळे पुढे प्रश्नच होते. पण ते पुढचे प्रश्न... आत्ता तर धावत जाणे गरजेचच होतं . खरतर तीलाही जाणे आवश्यक होते. पण घर बंद करून जाणे शक्य नव्हते.
विकास घराबाहेर पडला. जातांना तो सांगुन गेला होता , कीं मी लवकर येतो. लवकरच नेणार आहेत. त्यामुळे मला जास्त वेळ लागणार नाही, तू एकटी रहाशिल ना ? का बोलवुया कुणाला तरी. ती मनाविरूध्दच नको म्हणाली. राहिन मी एकटी.
तो बाहेर पडला . तीने दार लावुन घेतले. नवर्याला बळेबळेच चार घास खायला घातले होते. ती पण बळेबळेच जेवायला बसली. पण तीच्या घशाखाली घास उतरत नव्हता. एकतर एकटीने जेवायची तीच्यावर कधी वेळच आली नव्हती. आणि त्यात असा हा गंभीर प्रसंग....
कसेतरी तीने चार घास पोटात ढकलले. आणि सगळी आवरा सावर करून ती बाहेरच्या खोलीत आली.
थोडावेळ टीव्ही पहावा म्हणून तीने टीव्ही लावला. नेहमीची सिरियलही तीला कळत नव्हती. कारण डोक्यात वेगळेच विचार चालू होते.
तशी ती गावच्या घरात अजुन रूळली नव्हती. आयुष्यभर मुंबई सारख्या शहरात राहिल्या नंतर अशा गावात येऊन रहाणे किती कठीण आहे हे तीला पावलो पावली जाणवत होत. खरतर तीचे बालपण गावाला गेल होत. पण पुढची एकोणपन्नास वर्षे मुंबईत गेली होती. त्यामुळे बालपणाच्या सवयी केंव्हाच नाहीशा झाल्या होत्या.
मुंबईत जवळपास रहाणारे शेजारी , पाजारी होते. वेळेला कधीही कुणीही धावत यायचे. शिवाय मैत्रिणीही भरपुर होत्या. इथे मात्र तस काहीच नव्हतं. एवढच कशाला तीला एखादी वस्तू हवी असली तरी कुणाला तरी सांगावे लागे. मुंबईत मात्र ती स्वयंसिध्दा होती.
आत्ता तीला मुंबईची प्रकर्षाने आठवण झाली. आज ती घरी एकटी आहे म्हटल्यावर दोघी तिघी सहज आल्या असत्या सोबतीला.
विचारात थोडा वेळ निघून गेला. आणि अचानक तीचे लक्ष घड्याळाकडे गेल. साडेदहाच्या पुढेच काटा गेला होता. अजुनही विकास घरी आला नव्हता. हळूहळू तीचे मन काळजीने व भितीने ग्रासू लागले. एवढा का वेळ लागला असेल ? आणि तो येणार कसा ? वाहन तर इथे कोणत मिळण्याची शक्यता नाही. असे सगळे प्रश्न समोर नाचू लागले.
तीने हळूच खिडकीच्या बाहेर पाहिलं .बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. तीला पहिल्या पासुनच काळोखाची फार भिती वाटत असे. आणि त्यात हे काळजीचे वातावरण....
ती अंथरूणावर जाऊन पडली . पण झोप लागणे शक्यच नव्हतं . सारखी उठून बसायची , परत आडवी व्हायची. असं बराच वेळ चालले होते.
तशात बाहेर पडवीवरचा पत्रा वार्याने जोराजोरात वाजत होता. तशी तीची भिती आणखीच वाढत होती.
बाहेर एक लूत भरलेल कूत्र भेसूर रडत होतं. रस्त्यावर दोन बोके जोरात भांडत होते. त्यांचाही आवाज काळजाचा थरकाप उडवीत होता.
अचानक तीच लक्ष खिडकीकडे गेलं. खाडकीच्या काचेवर झाडाच्या सावल्या नाचतांना दिसत होत्या. तीचा धीर सुटत चालला होता. एवढ्यात बाहेरचं कूत्र जोरात केकाटलं आणि गप्पकन त्याचा आवाज बंद झाला. झाडावरचे पक्षीसुध्दा अवेळी भयाणपणे ओरडत होते. म्हणजे नक्कीच बाहेर बिबट्या आला असणार.
हळूहळू बारा वाजले तरीही विकासचा पत्ताच नव्हता. तेवढ्यात तीला दार वाजतयं असा भास झाला . तीने हळूच दार किलकील करून पाहिलं.... पण बाहेर कोणीच नव्हतं.
क्षणा क्षणाला तीची भिती वाढत होती. थंडीचा सिझन असुनही ती घामाने चिंब भिजून गेली होती.
देवावर तीचा खूप विश्वास होता असही नाही. आणि नव्हता असही नाही. लहानपणी म्हटलेली रामरक्षा , मारूती स्तोत्र सगळं तोडक , मोडक म्हणून झालं. पण काही केल्या तीची भिती मात्र कमी होत नव्हती. मग झोप लागण्याची तर सुतराम शक्यता नव्हती.
घामाने शरीर भिजलच होतं , पण आता डोळ्यातुनही अश्रूधारा वाहू लागल्या.
भितीने गांगरून गेलेल्या तीला दारावरच्या थापाही ऐकू येत नव्हत्या. शेवटी विकासने हाकांचा सपाटा लावला. व बर्याच वेळाने तो तीच्या कानावर गेला.
थरथरत हळूहळू कसेतरी तीने दार उघडले. विकासला पाहून तीचा तोल पुरा ढळला..... आणि काही कळायच्या आतच ती विकासच्या बाहूपाशात उभी कोसळली......
