Manisha Patwardhan

Drama Thriller Others

3  

Manisha Patwardhan

Drama Thriller Others

पुनर्जन्म

पुनर्जन्म

4 mins
89


ती त्याच्या सोबतीने, त्याला बिलगुनच हाॅटेलमध्ये शिरली. दरवाजातून शिरतानाच सुगंधी फवार्‍याचा तो मंद मंद सुगंध तिच्या घ्राणेंद्रीयाला सुखावून गेला. कॅन्डल लाईटची मजा नेत्रांना शांत करीत होती. अशा सुंदर वातावरणात... त्याची सोबत... त्याचा स्पर्श... जगातली सर्व सुखं आपल्याच पायाशी लोळण घेतायत की काय... असंच तिला वाटत होतं.

 

अगोदर आरक्षित केलेल्या जागेवर ती दोघं बिलगुन बसली. लग्न झाल्याचा आज चौथा/पाचवाच दिवस असेल. घरचे सर्व रितीरिवाज पार पडल्यावर ती आज पहिल्यांदाच बाहेर पडली होती. दोघंही खूप आनंदात होती.


वेटर ऑर्डर घेऊन गेला. त्याने काय ऑर्डर दिली ते काही तिला कळलं नाही. बहुदा वेलकम ड्रिंक असावं असं तिला वाटलं.


लवकरच वेटरने दोन ग्लास टेबलावर आणून ठेवले. या ग्लासमधूनही कोल्ड्रींक पिता येतच की... असं तिच्या मनात येऊन गेलं. पण मनातून ती थोडी बावरली होती एवढं खरं... कारण तिच्या घरी तिने हे कधीच पाहिलं नव्हतं... खूप शांत सोज्वळ घरातच तिचे माहेर होते. 


ते छान, प्रेमभर्‍या गप्पा गुलूगुलू करीत होते. एवढ्यातच वेटर शॅम्पेनची बाॅटल घेऊन आला. आणि तिकडे म्युझिकही सुरू झालं... गिटार, झांजा... गाणाराही आपल्या सुरेल आवाजात गात होता... नृत्यांगनाही त्याच तालावर नृत्य करीत होती. सर्व वातावरण उत्साहाने भरून गेलं होतं...


शॅम्पेनची बाटली उघडली गेली... अन् त्याच क्षणी ती ताडक्कन उठून उभी राहिली... आणि तत्क्षणी ती खाली कोसळली... क्षणभर त्याला काहीच कळलं नाही... पण लगेचच तो भानावर आला व तिला हाका मारू लागला. पण ती बेशुद्धच पडली होती.


काय करावं त्याला काहीच कळेना... तिच्या तोंडावर त्याने पाणी मारलं... ती थोडी सावध झाल्यासारखी वाटली... तो म्हणाला, चल घरी जाऊया... त्याने न प्यायलेल्या शॅम्पेनचे बिल चुकते केले व तो ती घेऊन हळूहळू हाॅटेलच्या बाहेर पडला. वाटेत तिने एक अवाक्षरही तोंडातून काढले नाही. त्याच्या चेहर्‍यावर मात्र रंगाचा बेरंग झाल्याचा भाव होताच... पण थोडीशी तिची काळजीही वाटत होती.


घरी गेल्यागेल्या ती झोपून गेली... तो मात्र तिच्या निरागस चेहर्‍याकडे बराच वेळ पाहात बसला होता. तिला काय झालं असावं याचा त्याला अंदाजच येत नव्हता... बरं ताबडतोब तिला दवाखान्यात न्यावं... अशीही तिची स्थिती वाटत नव्हती.


सकाळी त्याला जरा लवकरच जाग आली... त्याने हळूच तिला जवळ ओढले... ती लहान मुलीसारखी काहीतरी बोलली... त्याला वाटलं ती लाडाने आपल्याला काहीतरी बोलत असावी...


पण नंतर तिचा नूर काही वेगळाच दिसू लागला... ती दहा/बारा वर्षाच्या मुलीप्रमाणे काहीतरीच बरळत होती.


घरातली सगळी मंडळी उठली. त्याने घडलेला प्रसंग सगळ्यांना सांगितला. सगळेच बुचकळ्यात पडलेले दिसत होते. सगळ्यांशी आत्ताही ती तशीच बोलत होती... वेगवेगळी नावे घेत होती.


आमच्या घरी असं नाहीये... तुम्ही मला इथे कशाला आणलंय... आणि मुख्य म्हणजे घरातील कोणालाही ती ओळखत नव्हती. तुम्ही माझ्या जवळ येऊ नका... मला माझ्या आईकडे जायचंय... माझ्या आईला बोलवा. ती मला घेऊन जाईल.


आता मात्र सर्वच जण घाबरले. त्यांनी डाॅक्टरांनाही घरी बोलवले. डाॅक्टर म्हणाले की, हिच्या डोक्यावर कसलातरी ताण आलेला आहे. मी गोळ्या देतो. त्या तिला द्या. तिला झोप लागेल...

 

प्रथम गोळ्या तर तिने फेकूनच दिल्या. पण मग बळेबळे त्या तिला घ्यायला लावल्या. थोडावेळ तिला झोप लागली खरी... पण पुन्हा उठल्यावर तेच पालूपद सुरू झाले.


माझ्या आईला बोलवा...


शेवटी फोन करून आईला बोलवून घेतले. आई आल्यावर... ही कोण बाई आलेय, असे म्हणाली.


आई तिच्याशी बोलू लागली. पण ही काहीतरी वेगळंच बोलत होती... ती मान्य करायलाच तयार नव्हती की ही तिची आई आहे म्हणून...


शेवटी तिच्या आईच्या काहीतरी मनात चलबिचल झाली. तिने जावयाला बाजूला बोलावले आणि सांगितले की खरंतर ही आमची मुलगी नाहीये. आम्ही तिला दत्तक घेतली आहे. हे ऐकून तो मनात थोडासा चिडलाच... पण आता चिडण्याची ती वेळ नव्हती... फक्त एवढंच म्हणाला, तुम्ही हे आम्हाला आधीच सांगायला हवं होतं...


कुठून दत्तक घेतली वगैरे चौकशी केली... शेवटी तिकडे जायचं ठरलं. तिला घेऊन तो निघाला. बरोबर त्याचे वडीलही आले. गाव तसं लांब होतं. प्रथम एसटीने व नंतर रिक्षाने ते तेथे पोहोचले. तिने बरोब्बर ते घर दाखविले.


घरात एक म्हातारी बाई राहात होती... तिची अवस्था फारच वाईट होती. तिने कसंतरी लटपटत येऊन दार उघडलं... त्या बाईला त्याने सर्व हकीकत विचारली. ही तुमची मुलगी आहे का? पण तिला एकतर नीट दिसतही नव्हतं... तिने फक्त एवढंच सांगितलं की, मला दोन मुली होत्या... पण...


पुढे जी कथा तिने सांगितली ती फारच भयंकर होती. ती म्हणाली की, माझा नवरा दारूडा होता. घरी दारू पिऊन यायचा, मला मारायचा, मुलींना पण मारायचा. त्यातल्या त्यात ही जरा लहान म्हणून हिला तसा मार कमी मिळाला असेल...


पण एक दिवस महाभयंकर प्रसंग घडला. रात्री नवरा दारू पिऊन आला. आणि मारहाण करू लागला... माझी ती थोरली पोरगी जागी होती, अन् ही झोपलेली होती. ती आमच्या दोघांच्या मध्ये पडली... पण तिथेच सगळा घात झाला... त्याने जवळचा वरवंटा घेऊन पोरीच्या डोक्यात घातला... तिथल्या तिथेच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली... ते बघून माझाही तोल सुटला... तोच वरवंटा मी त्याच्या डोक्यात घातला... मग मला पोलीस येऊन घेऊन गेले... ही माणसं भली म्हणून या पोरीला घेऊन गेली... म्हणून तिचे सोने झाले. तुमच्यासारख्यांचे घर तिला मिळाले. मी मुद्दामच तिच्या समोर कधी आले नाही. नाही म्हणायला मीही एक खुनीच ठरले होते ना!! 


पण मला एक आश्चर्य वाटतंय... की ही पोरगी तुम्हाला इथे कशी काय घेऊन आली.. कारण तेव्हा ती दोनेक वर्षांचीच असेल... तिला घराचा रस्तासुद्धा ओळखीचा नसेल...


सांगतानाच म्हातारी थरथरत होती... डोळ्यातून अश्रूंची जणू नदीच वाहात होती.


ऐकून तो सून्न झाला. त्याचा जणू पुतळाच झाला होता... पण खरंच तिने आपल्याला इथे कसं बरं आणलं असेल... हा मोठ्ठा प्रश्न त्यालाही पडला होता.


आणि एवढ्यात ती ताडक्कन उठली. आणि त्याची मान तिने जोरात आवळली... तो तर कोलमडलाच... जोरात त्याच्या अंगावर ओरडली...


बघ माझ्या बहिणीला त्रास दिलास तर आणि दारूच्या थेंबाला स्पर्शही करायचा नाही... नाहीतर माझ्याशी गाठ आहे... 


तो अवाक् होवून तिच्याकडे पाहातच राहिला... पण तेवढ्यातच ती पुन्हा खाली कोसळली...


तो क्षणातच भानावर आला. सर्व परिस्थितीची त्याला जाणीव झाली. त्याने तिच्या तोंडावर पाणी मारले... ती शुद्धीवर आली... व नवर्‍याला विचारू लागली... आपण कुठे आलोय? आणि या बाई कोण आहेत? आपण हाॅटेलमध्ये गेलो होतो ना?


तिला काय उत्तर द्यावं त्याला सुचतच नव्हतं... अजुनही तो या सगळ्या धक्क्यातून बाहेर आलाच नव्हता... तो वेड्यासारखा तिच्याकडे पाहात राहिला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama