मुंबई
मुंबई
व्हाॅट्सऍपवरून आलेला एक मेसेज... एका छोट्या बातमीवरील साहित्य.. मलाही थोडं आव्हानात्मक वाटलं आणि आपणही थोडा प्रयत्न करून पाहाण्याची इच्छा झाली. कितपत जमलाय ते सांगा बरंका...
तोच धागा... वडा पाव...
गजबजलेला दादर स्टेशन समोरचा रस्ता... जो तो घाई गडबडीत इकडून तिकडे जणू काही धावतच होता. कुणाला कामावर जायची घाई, तर कुणाला घरी जायची घाई. त्यात टॅक्सी, बस, हातगाड्या यांनीही रस्ता भरलेला. त्यातूनच वाट काढीत लोकं चाललेले.
जवळच फूल बाजार असल्यामुळे मधुनच फुलांचा गोड गंध येत होता. तर कधी लोकांच्या पायदळी येऊन कुसलेल्या पाना-फुलांचा दर्प नाकाला स्पर्शून गेल्यामुळे नाकावर रूमाल धरला जात होता. अकस्मात कोणीतरी सिगरेट ओढत पुढे जायचा, तोही दर्प नाकाला त्रासच देत होता. कधी बाजुनी कोणी छानसे सेंट लावून जायचा तर कधी एखाद्या उग्र वासाच्या सेंटने, डोके दुखल्याचाही भास व्हायचा.
पण... या सगळ्या वासांकडे दुर्लक्ष करून लोक पुढे पुढे जातच होते. पण त्याची गाडी ओलांडून मात्र तुरळक लोकच पुढे जाताना दिसत होते. बाकी प्रत्येक माणूस तळलेल्या वड्याच्या खमंग वासाने आकर्षित होऊन तेथे थांबत होते व वडा-पाववर ताव मारून, तृप्त ढेकर देऊनच पुढे जात होते.
हे पाहात तो मात्र आशाळभुतासारखा बसला होता. वडा-पाव खाण्याएवढे पैसेही त्याच्याकडे नव्हते आणि आज सकाळपासून कुणी दाताही त्याच्याकडे फिरकला नव्हता.
पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. भुकेचे सगळेच कावळे त्याच्याच पोटात शिरल्यासारखे त्याला वाटत होते. आणि त्यातच फाटके, तुटके, मळके कपडे आणि गरीबीने ग्रासलेला चेहरा आणखीनच दीनवाणा, बापुडवाणा दिसत होता. तळल्या जाणार्या
वड्याच्या वासाने आणखी बेचैनी वाढत होती.
क्षणभर त्याच्या मनात चोरीचासुद्धा विचार येऊन गेला. पण लोकांकडून पडणार्या माराचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच, शिवाय पुन्हा आपण असे करणार नाही, असा दिलेला कबुली जबाबही त्याच्या चांगलाच लक्षात होता. त्यामुळे समोर कुणीतरी पैसे फेकेल व मी वडा-पाव खाईन, याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नव्हता. तो तसाच चुळबुळत राहिला.
इकडे वडेवाल्याचा धंदा मात्र जोरात सुरू होता. इकडे तिकडे बघण्यासाठी त्याला वेळच नव्हता. पण तरीही त्याच्या मनाविरूद्ध का होईना, पण त्याचं लक्ष त्या भिकार्याकडे जातच होतं. आणि त्याच्यातली माणुसकी त्याला बेचैनी आणत होती. स्वतःकरीता, किंवा कुटूंबाकरीता तो जरी एवढी मेहनत घेऊन पैसे कमवित होता. तरी सामाजिक बांधिलकीचं भान त्याला नक्कीच होतं. आणि त्याचा स्वभावही प्रेमळ, दयाळू असाच होता.
त्याने आता धंदा आवरता घेतला. पण त्या आधी दोन वडे गिर्हाईकाला न देता शिल्लक ठेवले व त्या भिकार्याला आणून दिले. व तो घरी निघून गेला.
इकडे तो मात्र खूपच खुश झाला, आनंदी झाला. वड्याच्या वासाने वेडापिसा होऊन, त्याची लाळही गळू लागली असावी. शेवटी त्याची इच्छा पुर्ण झाली. तृप्त मनाने तो वडा-पावचा आस्वाद घेऊ लागला...
आमुची मुंबई नगरी
त्याची ऐट भारी न्यारी
तिथे वड्याला आहे भाव
घ्या जन हो घ्या, वडा-पाव
कुणी उत्तरप्रदेशी आला
कुणी तामिळ, मद्रासी आला
साता समुद्री, वड्याची हाव
घ्या, जन हो घ्या, वडा-पाव
दरवळतो याचा वास
न्याराच याचा स्वाद
मन घेई पाहूनी धाव
घ्या, जन हो घ्या, वडापाव