Manisha Patwardhan

Tragedy

3  

Manisha Patwardhan

Tragedy

नशिबाचे भोग

नशिबाचे भोग

8 mins
256


गौरीचं डोकं आज ताळ्यावर नव्हतं. दिवासोंदिवस वाढत चालेला ताण तिच्या सहनशक्तीची परीक्षा घेत होता. जगणं एक कला आहे असं तिने कुठेसं ऐकलेलं पण अमलात आणणं फारच कठीण आहे हे तिला कळून चुकलं होतं. बोलणाऱ्याची जीभ पण जेव्हा सुखात असते तेव्हा असं चार चौघाना प्रवचन देणं सोपं असतं.. पण स्वतःवर बेतल्यावरच सगळं किती वरवरच आहे हे लक्षात येतं. असे विचार करतच ती भांडी घासू लागली. आज नकळतच सगळा राग, त्रागा त्या निर्जीव भांड्यावर निघत होता. बाहेर दीड वर्षाची लेकीचं घायमोकलून रडणही तिच्या कानावर पडलं नाही. डोळ्यासमोर भूतकाळ नाचत होता आणि भविष्य वाकुल्या दाखवत होतं. एका राजकुमारीला सूख बोचलं बहुतेक अशी बोच तिला स्वतःला खूप लागून राहिली होती. नियतीच्या समोर आपण सगळे काठपुतळ्या जरी असलो तरिही त्याच नियतीने आपल्याला सदसदविवेक बुद्धी दिली आहे हे पण तेवढंच सत्य आहे. आपण ऐनवेळेस बुद्धीच गहाण ठेवली यात आपलीच चूक आहे हे तिला कळून चुकलं होतं. खात्यापित्या घरची लेक आपल्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय चुकावा हे दुर्दैवच आपलं. भांड्यांचा ढीग समोर असतानाही ती मात्र भूतकाळात वावरत होती.


गौरी म्हणजे तिच्या आईवडिलांचं घरचं दैवत. गौरी म्हणजे तिच्या बाबाची शेंडेफळ. भावाची लाडाची बहीण. मोठ्या भावाच्या पाठची गौरी नेमकी भाद्रपद अष्टमीला जन्माला आली म्हणुन तिचं नाव गौरी. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, मनमिळावू गौरीचं दुसरं रूप म्हणजे धम्माल. एकदम बिनधास्त.. पण आपली हद्द जाणणारी.. त्यामुळे उथळपणा तिच्यात कधीच आला नाही. आयुष्य कायम चढ उताराचं असावं असं म्हणतात. सरळ रेषेतलं आयुष्य कंटाळवाणच. पण जोपर्यंत आयुष्य आपल्या हातात असतं तोपर्यंत रस्ताही सपय असतो. पण जेव्हा आयुष्य आपल्याला हातात घेतं तेव्हा तोच रस्ता खाच खळग्यांनी भरून जातो.


दहावी बारावीपर्यंत प्रचंड हुशार ... बारावीला कॉलेजमधून पहिली आली वडिलांनी मोबाईल घेऊन दिला. कीती ते कौतुक !!  तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं आई-वडिलांना झालं होतं !! पण मोबाईल घेऊन दिला हे चुकलं का आपलं... पण असं तरी कसं म्हणता येईल आज जगात मोबाईलला अतिशय महत्त्व आलेलं होतं. सगळी माहिती मिळते अभ्यासाची , इतर उपयुक्त माहितीही मिळते. समाजात , देशात , अगदी जगातही काय चाललंय ते ही कळत.. सगळ्या मुलांकडे मोबाईल असतात , मग आपल्या मुलीकडे का बरं नसावा , तिने का बरं मागे राहावे. असा विचार करून मुलीला मोबाईल घेऊन दिला. पण... सर्वात पुढे असलेली मुलगी पुढे अभ्यासात लक्ष देईनाशी झाली. तेव्हां तिचे आईवडील सतर्क झाले. तेरावीच्या पहिल्या सेमिस्टर ला गौरी नापास झाली.


"अगं.. काय हे गौरी? चक्क नापास?" तिच्या मैत्रिणीना आश्चर्याचा धक्काच बसला.

     आणि पुढे आयुष्याची सगळीच गणिते चुकत गेली. 

     

आई वडीलांनी कौतुकाने घेतलेला मोबाईल हाती आला. आणि ती समाज माध्यमांशी जोडली गेली. मोबाईलचं सगळं जग तिने पालथ घातलं. फोटो व्हिडिओ काहीही बाकी ठेवलं नाही. व्हाट्सअप फोटो पाहून अनेक लोक तिच्या संपर्कात येत होते. तेच लोक तिच्याशी मैत्री करू इच्छित होते. होतीच ती खूप सुंदर.. अगदी दृष्ट लागावी अशी.. पण खरंच दृष्ट लागेल अशी तिच्या आई वडिलांनाही कल्पनाच आली नाही... 

     हरतर्‍हेचे लोक तीच्या संपर्कात आले... पण तिने दुर्लक्ष केलं. प्रकाशच्या अस्तित्वाने मात्र ती पार बदलून गेली.. सारख्या त्याच्याच पोस्ट वाचू लागली.. ध्यानी मनी , स्वप्नी सारखा त्याचाच फोटो समोर दिसू लागला.. त्याच्या फोटो ने तिला इतका नाद लावला कि ती स्वतःला हरवूनच बसली. तहानभूक सारं काही विसरून गेली. डोळ्यासमोर सारखा प्रकाश चा फोटो दिसत असायचा... खरंतर तीच्या अगदी विरूध्द व्यक्तीमत्व होतं त्याचं... रंगाने काळा कभिन्न , रूपही तसं यथा तथाच... फक्त तो सुंदर फोटोग्राफी करायचा.. पण अर्थात मोबाईल मधुनच... ते काही पोट भरण्याचे साधन नव्हें... सारखे ती त्याने पोस्ट केलेले फोटो.., आणि त्याचा फोटो डोळे भरून पहात रहायची.. त्यातच रमुन जायची... जणू काही त्याचा ध्यासच लागला होता तीला...ध्यानी मनी स्वप्नी तोच दिसायचा तिला..

       आणि अशात एक दिवस त्याची फेसबुकवर फ्रेन्डरिक्वेस्ट आली... तीचा आनंद गगनात मावेनासा झाला... काय करू आणि काय नको असं तीला होवून गेलं....

 मग मेसेंजरवर गप्पा सुरू झाल्या... हळूहळू फोन नंबरची देवाण घेवाण झाली.. मग भेटही ठरली.. पहिल्याच भेटीत दोघं खूपच जवळ आली... अशा अनेक भेटी झाल्या. लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या. पण त्याने घरी एकदाही तीला नेले नाही.. किंवा स्वतः ही कधी घरी आला नाही. तिची माहिती मात्र त्याने बरीच काढली होती. वडील किती श्रीमंत आहेत. त्यांची किती प्रॉपर्टी आहे. आई नोकरी करते .. तिच्याकडे बक्कळ पैसा आहे. सगळंच तर त्याला माहिती होत.. आणि तो तिच्याकडून सगळी माहिती काढूनही घेत असे. अर्थात त्याला हे कळले नाही की उद्या आपल्याला हे एक छदामही देणार नाहीत , किंवा दारात उभेही करणार नाहीत. पण त्याचे प्रयत्न मात्र चालूच होते... तिला गोड गोड.. सुंदर स्वप्ने दाखवीण्याचे. ती त्याच्या या भूल थापांना भुलत होती.. तिच्या लक्षातही कधी आलं नाही कि तो आपल्याला फसवतो आहे. इतकी ती त्याच्यात बुडाली होती , तिला सत्याची जाणीवही कधीच झाली नाही. तिचे विश्र्वच तो झाला होता.रोज त्याला भेटल्या शिवाय तिचा दिवस जात नव्हता. कधी तिने स्वत:ला त्याच्या स्वाधीन केले तिलाही कळले नाही. जणू ती त्याच्या स्वप्नात हरवली होती. रममाण झाली होती. त्याच्यात विरघळून गेली होती. तिच्या बुध्दीवरही जणू तो अधिराज्य गाजवीत होता.

         आई वडिलांना प्रश्न पडला होता कीं ती अशी कां वागत आहे.. घरातही असून नसल्या सारखी असायची. अभ्यासावरील तीचे उडालेले लक्ष त्यांच्या ध्यानात आले नव्हते असे नाही. काही होतयं कां तुला ? या प्रश्नाचेही उत्तर तीने दिलेच नाही.. आणि बारावी पर्यंत पहिल्या नंबरवर असणारी मुलगी जेंव्हा तेरावीला नापास झाली , तेंव्हा मात्र ती दोघंही काळजीने हबकुनच गेली.... आणि पाठोपाठ तीने त्यांच्यावर आणखी एक बाॅम्ब टाकला. तो म्हणजे , असा असा एक मुलगा आहे , आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे , आणि ते ही पुढच्याच आठवड्यात..

हे ऐकल्या नंतर दोघांच्याही पाया खालची जमिन सरकली.. त्यांनी त्या मुलाची योग्य ठीकाणाहुन माहीती काढली.. आणि त्यांची मनस्थिती आणखीच बिघडली..

कारण तो एक झोपडपट्टीत रहाणारा गुंड मुलगा होता. त्याला दारूचे व्यसन होते.. जातीतला एकवेळ नसला तरी चालेल , पण चांगला शिकलेला सुसंस्कृत मुलगा असता तर गोष्ट वेगळी.. आणि पैशाचाही काही प्रश्न नव्हता... कारण ज्याच्यात धमक आहे , तो कसाही पोट भरू शकतो. आणि जोडीला शिक्षण असेल तर मग काही प्रश्नच नाही.. असे त्यांचे मत होते. पण हा मुलगा म्हणजे तर.. स्वतः कंगाल , भणंग भिकारी , तरीही मग्रूर मस्तवाल गुंड होता. कायम खिशात सुरा घेऊनच फिरायचा.. अशी त्याची ख्याती होती.

         

           पण गौरी काहीही ऐकुन घेण्याच्याही मनःस्थितीत नव्हती. हरतर्‍हेने समजाऊन सुध्दा तीने ऐकले नाही. व एक दिवस दोघं लग्न करून घरी आली. आई वडिलांना नमस्कार करायला गौरी व तो घरी आली.. आता मात्र आई वडिलांनी डोळ्यातले पाणी मागे सारले.. ते जेव्हढे प्रेम तिच्यावर करायचे तेव्हढेच ते कठोरही होते. मुले सज्ञान झाल्यावर त्यांचे विचार त्यांना लखलाभ.. आपण जेव्हढी समजूत तिची काढायची , तेव्हढी तर काढून झाली होती. आता ती व तिचे नशीब... असा विचार करून व काळजावर दगड ठेवून तीला घरात घेतले तर नाहीच.. पण तुझा आमचा आता काहीही संबंध नाही. तू सज्ञान आहेस. समर्थ आहेस.. तेंव्हा आता तू येथून जा... आम्हाला एक मुलगाच आहे असे आम्ही समजतो. आणि एव्हढंच नाही तर माझी जी संपत्ती आहे , ती स्व कष्टार्जीत आहे.ती कुणाला द्यायची हा माझा प्रश्न आहे. पण तुझा मात्र त्यावर काहीही अधिकार नाही. जशी आलीस तशी तू आपल्या मार्गाने निघून जा...

    तिला माहिती होते , कळत होत कीं हे सांगतांना आई वडिलांना किती क्लेष झाले असतील... पण त्याच बरोबर वडिलांचा निश्चयी स्वभावही तिला चांगलाच माहिती होता.. पण त्याक्षणी ती प्रकाशच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती त्यामुळे ह्या गोष्टीकडे तीने दुर्लक्षच केले.... 

    ती त्याच्या झोपडी वजा घरात शिरली... तेंव्हा क्षणभर तिला दारिद्र्याची , घरात असलेल्या घाणीची जाणीव झाली.. पण ती क्षणभरच.. घरात आई वडील भावंडे कोणीच नव्हते. तेंव्हा तिला काहीतरी खटकले.. पण सारे विचार त्याच्या मिठीत विरघळून गेले.. तिचे भान हरपले.. नव्या नवलाईचे सुख उपभोगायला ती उत्सुक , उतावळी झाली होती. जो पर्यंत शरीराचे आकर्षण होते .. तो पर्यंतचे दिवस बरे चालले होते. पण... लगेचच तीला दिवस राहिले. आणि... तिथेच सारं संपलं.. पुढे पोरगी झाली... आणि तिचे ग्रह आणखीच कडक झाले.

    आता प्रकाशचे खरे रंग दिसू लागले. पोरगी झाली म्हणून तो चिडला. तिला मारहाण करायला तेव्हांच सुरवात झाली.

    लवकरच आपण पार बुडालो याची जाणीव तिला झाली.. त्याने तिच्या वडिलांच्या पैशावर डोळा ठेवूनच लग्न केले होते.. ते साध्य झालेच नाही. रोज दारू पिऊन येऊन तिला मारहाण करू लागला.. सिगारेटच्या चटक्यांचे डाग शरीरावर अनेक ठिकाणी पडले होते. अगदी नको त्या ठिकाणीही.. ती कळवळली की त्याला मजा यायची बघायला.. मग अजूनच तो चेकाळायचा.. आणि तिचा चोळामोळा करायचा.. आणि स्वतः घोरत पडायचा.. ती मात्र स्वतः रात्रभर आपल्या जखमा कुरवाळत जागीच असायची. आता त्याचा स्पर्शही तिला नको असं वाटायचं.. रात्र झाली की भीतीने तिचा थरकाप व्हायचा.. पण तिला त्या गोष्टीला सामोरं जायला लागायचं. अगदी पोरगीने टाहो फोडलेला असला तरी...

    एक दिवस तिने पळून जायचा प्रयत्न केला. व आई वडिलांकडे गेली . पण त्यांनी तिला घरात घेतलेच नाही. आमचे न ऐकता गेलीस ना... आता भोग आपल्या कर्माची फळे.. तू आणि तुझी नशीब.. आणि ती तशीच परत फिरली.. तिला याचीही जाणीव होती की हे बोलतांना दोघांचेही डोळे पाण्याने भरलेले होते. पण शेवटी आपलीच चूक आहे , हे ही तिला माहिती होते. ती तशीच मागे फिरली.

     घरी परत आल्यावर नवर्‍याने झोडपले ते तर नेहमी प्रमाणेच... पण वर सिगरेटचे चटकेही दिले.. व स्वतःची एव्हढी दहशत निर्माण केली कीं परत बाहेर पडायचे धारीष्ट होणार नाही..

    असेच रोजचे मरणे ती जगत होती. शरीरावर होणारे अत्याचारही सहन करीत होती. आणि त्यातच पुन्हा दिवस गेले... 

    तीच्या आईकडे असलेली मोलकरीण तीला कधीमधी पैसे आणून देत असे.. म्हणून जेवायला चार घास मिळत होते.. अर्थात तिला हे ही माहिती होते कीं हे पेसे आईकडूनच येतात. पण म्हणून ती पोरांच्या तोंडात अन्नतरी घालू शकत होती..

          पण आज मात्र तिची जगण्याची उमेदच संपली होती.. स्वतःलाच दोष देत होती. कारण किती सुंदर अयुष्य जगत होतो आपण.. ते आपणच उधळून लावलं याची पावला पावलावर जाणीव होत होती..        आज कां कोण जाणे.. पण सारा इतिहास डोळ्यासमोर फिरत होता.. आणि स्वतः वरचा संताप भांड्यांवर काढत होती.. बाजूलाच दोन्ही पोरांनी भोकाड पसरलं होत.

पोरांचा व भांड्यांचा आवाज ऐकुन नवरा बाहेर आला. नेहमी प्रमाणेच तीला घाणेरड्या घाणेरड्या शिव्या घालू लागला.. व बेदम मारू लागला... ( तिला मात्र आज खूप राग आला होता नवऱ्याचा.. तिला कुठून जोर आला माहिती नाही , पण ती एकदम त्याच्या अंगावर ओरडली. "तू माझ्या आयुष्याचे वाटोळे केलेस. " मग त्याला चेव चढला. तो आणखी जोरात तिला लाथा बुक्क्यांनी तुडवू लागला. व तोंडाने तिच्याशी वाद घालू लागला. " आलीस कशाला माझ्या मागे , एक काम धड करीत नाहीस. त्या बापासाकडून एक फुटकी कवडीही आणली नाहीस.. पोरांना आणि तुला गिळायला तेव्हढे हवे.. कुठून पैसा आणि मी.. चालती हो माझ्या घरातून.. तुझी मला अजिबात गरज नाही.. मेलीस तरी चालेल.. त्या तुझी कार्टी आहेत ना त्यांना घेऊनच मर... म्हणजे माझ्या मागची ब्याद तरी टळेल.. " आणि हातही त्याचा चालूच होता. त्यांनी जवळ जवळ तिची चामडी लोळवली... )

      शेवटी ती कंटाळली आणि निपचित पडून मार खाऊ लागली.. व यातच आपल्याला मरण येईल ... याची वाट पहात राहिली....



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy