शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
"थांब भित्र्या,गवळ्या कृष्णा थांब. पळतोस काय असा भिऊन ? हिम्मत असेल तर उभा रहा तिथेच आणि सामना कर ह्या शुर विराचा. हा शेशिरायण पुत्र कालयवन तुला युद्धाच आमंत्रण देतो आहे." असे मोठमोठ्याने ओरडत गगनभेदी आवाज करत कालवयन श्रीकृष्णाच्या मागे धावत होता.
उंच,धष्टपुष्ठ,आक्राळ विक्राळ, आणि धिप्पाड, क्षणाचाही विलंब न लावता क्षत्रुच्या नरड्याचा घोट घेणारा हा शेशिरायण ऋषींचा पुत्र ब्राम्हण कुळात जन्मलेला परंतू असुरी वृत्तीचा कालयवन होता. शेशिरायण ऋषी हे त्रिगद राज्याचे कुलगुरू होते. अनेक वर्ष अघोर तपश्चर्या करून त्यांनी भगवान शिव शंकराला प्रसन्न करून घेतले होते. आणि त्यांच्या कडून एका अजेय ( युद्धात कधीच न हरणारा) पुत्र प्राप्तीचे वरदान मिळवून घेतले होते. शंकराने त्याला वरदान दिले कि " तुझ्या पुत्राला कुठल्याच शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही आणि कुठलाही चंद्रवंशी किंवा सूर्यवंशी राजाकडून त्याचा युद्धात पराभव होणार नाही ". पुढे त्या ऋषीला रंभेकडून एका पुत्र रत्नाची प्राप्ती होते. त्याच पुत्राचे नाव कालयवन.
श्रीकृष्ण मात्र कसलाही राग येऊ न देता चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन वन्य झाडींमधून वाट शोधून पुढेच चालत होता. कालयवन मागे तर राहिला नाही ना? हे बघण्या करता मागे वळून बघत होता.कालयवणाच्या अनेक शिव्यांचा मारा शांतपणे सहन करत पुढील मार्ग शोधत होता. काही दिवस चालल्या नंतर ते निर्भिड जंगल संपले होते. आणि कठिण पहाडी रस्ता सुरू झाला होता. कश्याचीही परवा न करता कालयवन अजूनही श्रीकृष्णाचा पाठलाग करत होता. पायांत प्राण आणून जोरजोरात पळत होता. श्रीकृष्ण काही थांबण्यास तयार नव्हता आणि कालयवन पाठलाग करण्याचे सोडत नव्हता. बराच कालावधी लोटल्यानंतर आता दोघेही डोंगराच्या टोकापर्यंत पोहचले होते. आताच अगदी जवळ असलेला श्रीकृण अचानक नजरेआड झाला होता. कालयवनाचा पारा आता खूपच वाढला होता. कालयवनाची नजर त्या डेंगराभोवती फिरू लागली. त्याची गरुडा सारखी भिरभिरणारी नजर एका ठिकाणी येऊन अचानक स्थिरावली. तिथे एक गुहा होती. हा भित्रा गवळ्याचा मुलगा नक्की त्यातच लपला असेल असे वाटून कालयवनाने त्या गुहेकडे प्रस्थान केले.
त्या गुहेमध्ये जाऊन तो कृष्णाला शोधू लागला. त्याची भिरभिरती ती तिक्ष्ण नजर गुहेमध्ये गरगर भिरु लागली. आशांचे अनेक किरणे घेऊन आलेली ती नजर निराशांचे काळोख घेऊन बाहेर पडणार तितक्यात त्याला एका कोपऱ्यात पिवळ्या रंगाचे कापड दिसले. त्याचे ते भलेमोठे पाय त्या चमकणाऱ्या कापडाच्या दिशेने पडू लागले. जसजसे तो कापडाच्या जवळ जाऊ लागला तसतसे त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसू लागली. ते पिवळे कापड एक पितांबर होता. आतापर्यंत चालत असलेला, भिवून पळालेला पळकुटा गवळ्याचा मुलगा थकून इथे झोपलाय काय? असा विचार करून त्या कालयवनाने पितांबरा खाली झोपलेल्या मनुष्यास एक जोरदार लाथ मारली. तसे त्या पितांबराखाली झोपलेल्या माणसाची झोप मोड होऊन त्यास खाडकन जाग आली. तोंडावरील पितांबर रागानेच त्याने दुर केला. त्याची ति काळजात धस्स करणारी धारधार नजर काही काळ समोर उभ्या असलेल्या काळयवनावर पडली. त्याची नजर त्या असूराच्या शरिरावर पडताच त्याचे शरिर उष्ण होऊ लागले. चेहऱ्यावरील असूरी कपटी हस्य कमी होऊन त्याचे निस्तेज चेहऱ्यात रूपांतर होऊ लागले. गळा दाबण्यासाठी समोर आलेले त्याचे हात त्याने अता स्वतःच्याच काणावर ठेवले. शरिराला सहन न होणाऱ्या भयंकर त्रासामुळे ग्रस्त होऊन एका जोरदार आक्रोशासाठी तोंड उघडणार तेवढ्यात त्याच्या संपूर्ण शरिराची जळून राख झाली. काळयवनाचा काळाने क्षणात फडशा पाडला होता. शस्त्राने किंवा अस्त्राने न मरणारा, चंद्रवंशी किंवा सूर्यवंशी राजाकडून कधीच पराभुत न होणारा काळयवन त्या पितांबराखाली झोपलेल्या मनुष्याच्या एका नजरेतच जळून खाक झाला होता.
फार वर्षापूर्वी देवांचे आणि दैत्यांचे तुंबळ युद्ध जुंपले होते. दैत्यांनी अनेक देवांना पराभूत करून रणांगणातून पळविले होते. देवांना पूर्णपणे त्रस्त करून सोडले होते. तेव्हा युद्धात पारंगत असलेला काळालाही पळवून लावणारा विर योद्धा माधांताचा मुलगा मुचकुंद राजा देवांच्या मदतीसाठी स्वर्गात गेला. अनेक दिवस दैत्यांशी लढा देऊन त्याने सर्व दैत्यांचा पराभव केला. त्यामुळे देव त्याच्यावर खूप खूश झाले आणि त्यांनी मुचकुंद राजाला वर मागण्यास सांगितले. मुचकुंद गेली अनेक वर्ष पृथ्वीवर गेला नव्हता त्यामुळे त्याला त्याच्या भावडांची आणि आईची खूप आठवण येऊ लागली होती. त्यामुळे त्याने देवांकडे वर मागितला कि, मला पृथ्वीवर माझ्या आईकडे आणि भावंडानकडे जाऊद्या. देव म्हणाले की मुंचकूंदा तुला स्वर्गात येऊन बरेच दिवस झाली. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील दिवसांचे अंतर फार वेगळे आहे. तु इथे आल्यापासून पृथ्वीवर काही वर्ष उलटून गेली आहेत. त्यामुळे तुझ्या आई आणि भांवडांचे आस्तित्व पृथ्वीवर केव्हाच संपलेले आहे. हे ऐकून मुचकुंदाला खूप वाईट वाटते. आणि तो देवाकडे दुसरा वर मागतो कि देवा मला पृथ्वीवर पाठव पूर्ण कलीयुग संपेपर्यंत मला निद्रा येऊ दे. आणि जो माझी निद्रा मोडेल तो तत्काळ भस्म होऊ दे. देवांनी तथास्तू म्हणून मुचकुंदाला वरदान देऊन टाकले. तेव्हापासून मुचकुंद पृथ्वीवर येऊन ह्या डोंगरावरील गुहेत निद्रावस्त झालेला होता.
कठिणातल्या कठीण प्रसंगाचे पूर्वालोकन असलेल्या, कुठलीही परिस्थिती सावकाश आणि चोखपणे हताळणाऱ्या श्रीकृष्णाने अगदी चालाखीने स्वतःच्या अंगावरील पितांबर गुहेमध्ये निद्राधीन असलेल्या मुचकूंद राजाच्या अंगावर टाकला होता आणि गुहेतील मोठ्या शिळेमागे लपून बसून गुहेत घडलेला प्रसंग आपल्या डोळ्यांनी टिपत होता. रागात आलेल्या काळयवनाने पितांबराखाली कृष्ण झोपलेला आहे असे समजून जोरात लाथ मारली. पितांबराखाली झोपलेल्या मुचकंदाची निद्रा भंग झाली आणि काही क्षणांत बघता बघता कालयवनाची राख झाली.
शंकराकडून काळयवनाला मिळालेला वर श्रीकृष्णाला माहित होता. त्यामुळे त्याच्याशी युद्ध करूनही काहीच फायदा होणार नव्हता. कालयवन आपल्याकडून मरणार नाही हे कृष्णाला माहित असूनही त्याच्या चेहऱ्यावरील स्मित हस्य कमी झाले नव्हते. हिमतीचा कणा जरासाही वाकू न देता परिस्थिती पुढे न झुकता श्रीकृष्णाने आलेल्या संकटाचा चालाखीने सामना केला होता.
श्रीकृष्णाप्रमाणेच आपल्या आयुष्यात देखील कालयवन रूपी संकटे येऊ शकतात. परंतू त्या संकटाना घाबरून न जाता त्यांचे पूर्वालोकन करून योग्य नियोजनाच्या आधारे आपण त्यांचा सामना करू शकतो. कधी कधी तर खूपच भेडसवणारी संकटेही आयुष्यात येऊ शकतात. त्या वेळेस कदाचित आपल्याला वाटेलही की ही परिस्थिती संभाळने आणि संकटाला सामोरे जाणे आपल्या अवाक्याबाहेरील गोष्ट आहे. आता कुठलाही मार्ग दिसेनासा झालेला आहे. काळाच्या आणि संकटांच्या विळख्यात आपण सापडलो आहे. त्या वेळेस त्या काळ रूपी विळख्यातून सावकाश पणे वाट काढत पुढे चालत राहा. संकटारूपी कालयवन जरी डोक्यावर थैयथैय नाचत असेल प्रतिकूल परिस्थिती जरी आपल्याला शिव्या देत असेल आणि प्रात्रता नसलेले लोक जरी नको ते बोलत असेल तरीही आयुष्याच्या प्रवास संकटाना बघून न थांबवता पुढे चालू ठेवा. लोकांच्या शिव्या ऐकून आणि परिस्थितीला घाबरून चेहऱ्यावरील स्मित कमी होऊ देऊ नका. योग्य नियोजन चालाखीने केल्यास मुचकुंदरूपी संकटातून मुक्त करणारा मार्ग आपल्याला नक्की मिळेल आणि कालयवन रूपी संकटातून आपली निश्चितच सुटका होईल.
श्रीकृष्णार्पणमस्तू
