आठवण आजीबाईची
आठवण आजीबाईची


" ये गोविंद्या बाळा कितीदा सांगायच रे तुला? बाहेर पाऊस पडतोय. आत ये बघु."
रिमझीम पावसात उड्या मारत भिजणाऱ्या गोविंदाला आजीबाई आत बोलवत म्हणाली.
" थांब ना आज्जे. येतो मी थोड्यावेळाने. आमच्याकडे असे मनसोक्त भिजायला नाही मिळत. एवढेसे ओले झाले कि मम्मी मारायला चालु करते."
" अरे पण आता एक घटका होवून गेलायं तरी सुद्धा तु पाऊसातच भिजतोय. अश्यान पडसे नाही का रे येणार तुला."
आजीच्या तोंडातून काही नवीन शब्द ऐकुन गोविंदाला त्याचे नवल वाटले आणि ते जाणून घेण्याच्या उद्देशाने तो आत मध्ये गेला.
" आज्जे घटका म्हणजे काय गं? "
लुगड्याचा पदराने नातवाचं ओले डोकं पुसत आजीबाई म्हणाली,
" अगोदर हे ओले कपडे काढुन दुसरे सदरा आणि चड्डी घाल. मग सांगेन तुला."
प्रश्नार्थक चेहरा करून गोंविदाने विचारले,
" हे सदरा आणि चड्डी काय गं आज्जे?"
खुदकन हसत हाताने कपाळावर मारत आजी म्हणाली,
" काय बाबा तुम्ही शहरातली पोरं. एवढे कसे अडाणी आहात? सदरा आणि चड्डी म्हणजे अंगावर घालायची कापडं. एवढ पण माहित नाही का तुला?"
" अस्स होय. अग आज्जे त्याला शर्ट पॅन्ट म्हणतात."
" हो घे तो शर्ट का बिर्ट इकडे मी घालून देते."
अंगावरचे ओले कपडे काढून झोपडीच्या खुंटीला अडकवलेले कपडे आजीकडे देत गोविंदा म्हणला,
" आज्जे इकडे येतो का गं पिझ्झा वाला ? पाऊस पडु लागला की मम्मी मस्तपैकी पिझ्झा मागवते. मला खुप आवडतो पिझ्झा."
" अरे बाळा गोविंदया इथे पावसात लाईट गेल्यास वायरमॅनला बोलावल्यावर तो एक महिण्याने येतो. तर तुझा पिझ्झा का फिज्जा वाला कधी येणार इकडे? त्या कोपऱ्यातून दोन तीन कांदे आण. मी आपल्याला मस्तपैकी छान छान कांदा भजी बनवते."
" कांदा भजी?"
" हो खाऊन तर बघ. तसला पिझ्झा का फिज्जा खाण्याचं विसरून जाशील."
" हो का आज्जे. बनव मग."
म्हणत कोपऱ्यातील कांद्याच्या पाटीतून दोन तीन कांदे घेवून आला. त्याच्याकडून कांदे घेवुन आजीबाई कांदे कापु लागली. काहीसे आठवून गोविंदाने आजीला परत विचारले.
" घटका म्हणजे काय गं आज्जे? तु सांगितलेच नाही."
गालातच हसत आजी म्हणाली.
" अरे हा. ते तर विसरलेच मी. घटका म्हणजे बराच वेळ."
" असे कसे ग बराच वेळ? काहीतरी मिनिटे किंवा तास तर असतील ना?"
" मला अडाणीला कसले कळतात बाळा ते मिनटं का बिनटं. पण अडीच घटका झाल्या की एक तास होतो.
" डावा हात समोर करून उजव्या हाताने डाव्या हाताची बोटे पकडून गोविंदा काहीतरी मोजु लागला.
" हो एक घटका म्हणजे ट्वेन्टी फोर मिनिटे."
" म्हणजे किती रे इंग्रजाच्या पिल्ला?"
" एवढं सोप्पे माहिती नाही का आज्जे तुला?"
एका हाताचे दोन आणि दुसऱ्या हाताचे चार बोटे आजी कडे दाखवुन
" हे बघ हे टु आणि हे फोर"
गोविंदा म्हणाला.
" अच्छा म्हणजे चोईस व्हय?"
आजीबाईने हसतच विचारले.
" हो ढ आजी. मला इंग्रजाचं पिल्लु का म्हंटलीस?"
थोडेसे रागवतच गोविंदाने विचारले.
" मग इंग्रजी बोलणाऱ्याला इंग्रजांचं पिल्लु नाहीतर काय म्हणायचं?"
" हो असुदे आणि ते पडसे होईल म्हणजे काय?"
" अरे म्हणजे शेबंडा होशील तु."
गोविंदा हसतच म्हणाला,
" अच्छा सर्दी होय? "
" हा शेंबडाच."
खळखळून हसत आजी म्हणाली. एव्हाना आजीचे कांदे देखील कापुन झाले होते. आजीच्या पदराला डोळे पुसत गोविंदाने विचारले,
" आज्जे ह्या कांद्यामुळे माझ्या डोळ्यांत एवढे पाणी आले. तुझ्या डोळ्यांत का नाही आले गं?"
" बाळा वर्षानुवर्ष काबाडकष्ट करून दुखाच्या विखाऱ्यावर पडलेले आशेच्या विझुन गेलेल्या नेत्रांतुन कसे बाहेर येतील. ते आतल्या आतच जळुन जातात लेकरा."
आजीच्या किंचीतशा गंभीर झालेल्या चेहऱ्याकडे बघुन त्याने त्यामागील आशय न उमगल्याने आजीला विचारले,
" म्हणजे काय गं आज्जे?"
विचांराच्या तंद्रीतून बाहेर पडत चेहऱ्यावर हसु आणत आजी म्हणाली,
" म्हतारं झालं की अश्रु देखील संपुण जातात. चल मी आता भजी बनवते."
झोपडीतील वाळलेली एक दोन लाकडे मोडुन आजींनी चुल्ह्यात घातली. थोडाफार वाळलेला पालापाचोळा त्या लाकडांच्या खाली एका कडेने घातला आणि भितींवरील दिवा जरासा तिरका करून आजीने त्या पाचोळ्यावर घासलेट ओतले. काडी पेटवुन चुल्ह्यात आग लावली. हे सर्व तेथे शेजारीच उभा असलेला गोविंदा नवलाने बघत होता.
" आज्जे किती ग वेळ लागला हे पेटवण्यास. आमच्याकडे एक मिनीट देखील लागत नाही गॅस पेटवण्यास. तु का ग नाही घेत गॅस?"
" अरे गोविंदा तुझी आजी अडाणी आहे रे. तिला नाही जमणार बाबा तसले गॅस बिस आणि चुलीवर बनविलेल्या भाजी भाकरीला वेगळीच रुचकर चव असते. ती गॅस वरील भाजीत चार पाच प्रकारचे चविष्ठ मसाले टाकून सुद्धा येत नाही. त्यामुळेच तर शहरातील लोक मोठ मोठ्या हाटेलात जावुन देखील चुलीवरील भाजी भाकरी मिळेल का याची चौकशी करतात."
" हो ग आज्जे. तु म्हणतेस ते खरे आहे. आम्ही देखील हॉटेलमध्ये गेल्यावर झुणका भाकर आवडीने खातो."
" आता कळाले ना तुला मी चुलीवरच का स्वयंपाक करते ते?"
गोविंदाने हसतच होकारदर्शी मान हलवली.
आजीने भजे बनविण्यास सुरुवात केली. पावसाने सुद्धा बराचसा जोर धरला होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. छोटे मोठे नाले ओसंडुन वाहु लागले होते. आजीबाई सारखीच झोपडी सुद्धा बऱ्याच वर्षांचा उन वारा पाऊस खाऊन काही ठिकाणी जिर्ण झाली होती. त्यामुळे तेथुन टिप टिप पाणी गळु लागले होते. व्यवस्थितपणे मांडून ठेवलेल्या भाड्यांकडे लक्ष वेधत आजीबाई गोविंदला निर्देश दिला,
" गोविंदा तेथुन एक परात घेवुन त्या खांबाच्या जवळ पाणी गळतय त्या खाली ठेव."
तो त्या भांड्याजवळ गेला परंतु तेथे जावून त्याला काहीच न उमगल्याने त्याने विचारले,
" कोणती परात ग आणि कुठे आहे ती यात? "
" तुझ्या समोरच आहे ना बाळा भांडे. घे त्यातून कोणते पण."
" अच्छा म्हणजे प्लेट घेवु का?"
"हो रे माझ्या राजा."
" मग प्लेट म्हण ना. हे परात काय? आणि तुला माहिती का आज्जे पप्पांना असले गावंढळ बोलने अजीबात आवडत नाही."
" हो रे बाळा. हाटेलमधील सुशोभित सजवलेल्या प्लेंटमधील पिझ्झा चमच्याने खाणाऱ्या तुझ्या बापाला ह्या असलेल्या चमटलेल्या परातीतील ठेचा भाकरी मायेने भरवलेले कसे आवडेल आता ? नाहीच आवडणार हं बाळा. तु आपले सुशिक्षीत ते तुझं पिलेट का बिलेटच म्हणत जा. आणि ठेव पटकन ती पिलेट गळतंय तेथे. पाणी होईल घरात."
जेथे जेथे पाणी गळत होते तेथे गोविंदाने प्लेट ठेवल्या होत्या. आजीबाईंचे देखील भजे बनवून झाले होते. चुल्हातील जळत असलेले लाकडे मागे ओढुन आजीबाईंनी ती पाणी शिपंडुन विझवली. प्लेट मधे भजी घेवून आजी बाई दरवाजातुन येणाऱ्या जराशा उजेडात जावून बसली.
" चल बाळा खाऊन घे."
म्हणत आजीने नाताला जवळ बसण्याचा इशारा केला. गोविंदा आजीजवळ जावुन बसला. आजीबाई नातवाला भजी खाऊ घालु लागली.
" आज्जे तहान लागलीय पाणी दे ना."
" हा आणते हं "
म्हणत आजी उठली आणि खांबाचा आधार घेत टेकुन उभ्या राहिलेल्या रांजनातून ताब्यांत पाणी घेवून आली. पाणी पिवुन झाल्यावर गोविंदाने पुन्हा भज्यांवर ताव मारला. आणि समोर बाहेर कोसळत असलेल्या पावसाकडे बघत आजीला विचारले,
" आज्जे हा पाऊस का पडतो गं?"
" आता तुला तहान लागल्यावर तु कसे माझ्याकडे पाणी मागितलेस? तसेच बाळा जेव्हा धरणीमातेला तहान लागते. तिच्या पिल्लांना म्हणजेच मनुष्य, झाडे झुडुपे, वेली , यांना तहान लागते तेव्हा धरणीमाता देवाकडे पाणी मागते आणि ह्या सर्वांची तहान भागवण्यासाठी देव वरून पाणी टाकतो. म्हणून पाऊस पडतो. कळाले का आता?"
" हो आजी."
हसतच होकार्थी मान हलवत गोंविदा म्हणाला.
भजे खावुन झाल्यानंतर तो तेथेच आजीच्या मांडिवर डोके ठेवून लोळत म्हणाला,
" आज्जे खरचं भजे खुप छान बनवले होतेस तु. मला खुपच आवडले."
चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर स्मित करून आजीने विचारले,
" मग दोन्हींतून जास्त काय आवडले तुला? शहरातील पिझ्झा कि आजीचे भजी?"
" आजीचे भजीच आवडले मला. पिझ्झ्यापेक्षा खुपच छान होते."
" तुला म्हणलं होत ना माझ्या हातचे भजी खाल्ले की तुझा शहरातील पिझ्झा विसरून जाशील."
" हो आज्जे. नक्कीच विसरलोय मी पिझ्झा."
एव्हाना आजीसोबत गप्पा मारता मारता गोविंदाला झोप येवु लागली होती. आजीबाई नातवाला थोपटत सुमधुर आवाजात अंगाई गीत गात होती, "लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही ?
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसाच्या वेलीवरती झोपल्या ग जाई-जुई
मिट पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही?
लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई"
थोड्याच वेळात गोविंदा निद्राधीन झाला होता. तसे आजीचे थोपटने देखील मंदावले होते. तासंतास पावसात बागडणारे नातवाचे मन आजीच्या मांडीवर शांतपणे स्थिरावले होते.
𝕯𝕾