Dr.Surendra Labhade

Children Stories Inspirational Others

2  

Dr.Surendra Labhade

Children Stories Inspirational Others

ओघळलेले क्षण.

ओघळलेले क्षण.

4 mins
52


"रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता कार्यक्रम "हैलो एफएम" आणि त्यासोबतच वाजणारे 'आंखी योसे गोली मारे' या सुप्रसिद्ध गाण्याचे इंस्ट्रूमेंटल संगीत आजही जसेच्या तसे आठवते. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जेवढा आनंददायी होता त्याउलट तो सुरु करणे एवढे सोपे नव्हते बरं का. यासाठी बराचसा खटाटोप असायचा आणि याची तयारी जेमतेम साडेसात वाजेपासूनच सुरू व्हायची. एफएमचा एंटीना घराच्या छतावरती तारेने बांधलेला असायचा. एंटिना म्हणजे ॲल्युमिनियमच्या आडव्यातिडव्या पोकळ नळ्यांचा दुकानात मिळतो तो नव्हे बरं का. आमचा एंटिना म्हणजे निरुपयोगी झालेली सायकलची जुनी पुरानी रिंग. अल्युमिनियमच्या वायरचे एक टोक त्या रिंगेला लावून दुसरे टोक एफ एम ला जोडायचे. हा एफएम लाईटचा करंट सोसु शकणारा नसायचा त्यामुळे त्याला सुरू करण्यासाठी गरज असायची ती लो होल्ट करंटची. ह्या करंटची पूर्तता व्हायची ती घरात लाईट नसल्यास उपयोगात आणणाऱ्या टॉर्च मधून. त्याकाळात फार वेळ लाईट नसायची. केव्हा केव्हा तर आठवडाभर सुद्धा लाईट डुंकून बघत नव्हती. अशावेळेस उपयोगात यायची ती घरात चार्ज करून ठेवलेली टॉर्च. टॉर्चच्या मागील भागात बॅटरी बसवलेली असायची त्या बॅटरीतुन करंटचा स्त्रोत घेवुन एफ एमला चालु करावा लागायचे. एवढ्यावरतीच पुरे होत होते का? तर मुळीच नाही. हा तर खटाटोपांचा नुसता ट्रेलर होता. पिक्चर तर अजून बाकीच असायचा. एफ एम सुरू झाला की त्याला कफ झालेला असायचा. त्याचा खरखर आवाज जोराने सुरू होत असे. यावर उपाय म्हणून त्याला सिग्नल नावाची गोळी द्यावा लागायची. हा उपाय फारच जालीम होता. यासाठी प्रथमता घराच्या छतावरती चढून वरती बसवलेली रिंग एम एमचा कफ जावेतोपर्यंत फिरवत बसावा लागायची आणि त्यासाठी एफ एम जवळ एक जिज्ञासु व्यक्ती उभी करावा लागायची. ते पाच सेकंदानी सतत सिग्नल आलेत का हे सांगण्यासाठी. एवढे सारे करेपर्यंत आपल्या आवडतीचा कार्यक्रम निम्मा अर्धा संपलेला असायचा. परंतू उरलेला दहा पंधरा मिनिटांचा कार्यक्रम ऐकुन युद्ध जिंकल्याचा आनंद वाटायचा. 

   शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसांचे वेळापत्रक तर टिव्ही वरील आवडते कार्यक्रम बघण्यासाठी तयार असायचे.

"नही है राजा,नही है रानी, 

है ये अजब कहानी जी, 

जब जब पाप बढेगा सुनलो 

आयेगा जूनियर-जी" 

ह्या मनमोहक आणि हव्याशा वाटणाऱ्या गाण्याने सुरुवात व्हायची ती 'जूनियर-जी' ह्या मालिकेची. ह्यात हिरोचे काम करणारा गौरव आज देखील आम्हा सर्वांच्या मनात आजही जसेच्या तसे आठवणीत आहे. छोट्यां पासून वृद्धापर्यंत मनावर अधिराज्य करणारी मालिका म्हणजेच 'शक्तिमान'. ही सुप्रसिद्ध मालिका दर रविवारी दुरदर्शन चॅनलवर प्रसारित होत असायची. हातातील कामधंदा सोडून सर्वच जण ही मालिका बघण्यासाठी उत्सुक असायचे. त्या काळात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी एकतर शक्तिमान व्हाव किंवा किमान मला एकदातरी शक्तिमान भेटावा ही तिव्र इच्छा असायची. अद्भूत आणि अंचबित करणाऱ्या ह्या शक्तिच्या विळख्यातून सोडवण्यासाठी विनोदाचे शस्त्र घेवून काही साहसी पुरुष एकापाठोपाठ एक असे धडकायचे ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे. हे त्रिकुट काहीसे वेगळेच होते. विनोदवीर दादा कोंडकेनंतर सिनेमासृष्टित प्रत्येकाच्या मनावर थाप पाडणारं कुणी असेल तर हे त्रिकुट होते. 

   बालपणातील दोन दिवस ह्या सर्व कलाकारांसाठी आम्ही राखून ठेवलेले होते. यांच्याएवढा आनंद देणाऱ्या गोष्टी आमच्या बालपणात फक्त दोनच होत्या त्या म्हणजे दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या. मामाच्या गावाला जायचं हे एकमेव उदिष्ठ ह्या सुट्यांमागे दडलेलं असायचं. त्या वेळेस मला गाणी म्हणण्याचा फार छंद होता. 'परदेशी परदेशी' पासून 'सात समंदर' पर्यंत आणि ' जिवाशिवाची बैडजोडी' पासुन 'कोंबडी पळाली' पर्यंत सर्वच गाणी माझ्या तोंडपाठ होती. आता ही गाणी पाठ करावयाची म्हंटल्यास एकतर वारंवार ऐकावी लागणार किंवा वाचावी तरी लागणार. वारंवार ऐकायची म्हंटल्यास तेच गाणे रेडिओवर पुन्हा केव्हा लागेल याची काही शाश्वती नसायची. त्यामुळे आवडणारे गाणे रेडिओवर सुरू असतानाच मी ते जेवढे शक्य असेल तेवढे कागदावरती नोंद करण्याचा प्रयत्न करत असायचो आणि वेळ मिळेल तसा ते वाचून पाठ देखील करायचो. 

   त्यावेळी देखील घरी मनोरंजनासाठी बाबांनी टेप आणलेला होता. त्यात कॅसेट टाकल्यास रेकॉर्डेड गाणी ऐकवयास मिळायची. एका कॅसेटला दोन बाजु असायच्या. एक A बाजु आणि दुसरी B बाजु. प्रत्येक बाजुला पाच गाणी याप्रमाणे दोन्ही बाजुंना एकंदरीत दहा गाणी असायची. तेच तेच गाणी ऐकुन कंटाळा आल्यास किंवा आवडते दुसरी गाणी ऐकावयाची झाल्यास त्या गाण्यांची यादी बनावायची आणि ती गाणी तालुक्याच्या ठिकाणी जावुन तेथून ती दुकानदाराकडून दहा रुपायाला एक गाणे याप्रमाणे शंभरूयास दहा गाणी एका कॅसेट मधे रेकोर्ड करून आणायची. असे काही त्यावेळेसचा खटाटोप असायचा. परंतु त्यावेळची गाणी देखील अगदी सुमधूर आवाजातील अर्थपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी होती. हजार वेळेस जरी ऐकली तरी मधाप्रमाणे त्यांचा गोडवा कमी होत नव्हता. जसे दिवस सरत गेले तसे लोक आणि गाणी बदलत गेली. हल्ली उदित नारायणच्या 'मे निकला गड्डी लेके' मधे गड्डी परत येताना अरजीत बसुन आला. अलकाचे 'टिप टिप बरसणारे पानी' सध्या ' यो यो' करीत हनीच्या 'चार बोटल ओडका' मध्ये धो धो पडु लागले. सुलोचना चव्हाणच्या 'ऊसाला' केव्हा बादशाहचा 'कोल्हा' लागला कळलेच नाही. बदलत्या काळासोबत आणि वेळेप्रमाणे बदलणे हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्या त्या काळातील 'ओघळते क्षण ' जतन करून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. 


Rate this content
Log in