परि गमते उदास..
परि गमते उदास..
मी आतल्या खोलीतून पुढल्या खोलीत आलो. आतली खोली माझी स्वायत्त होती. तिथं फक्त माझं राज्य होतं. एकांगी होतं, तरीही आत कुठंतरी कोंडलं होतं. पुढली स्वयंपाकघराची खोली. त्या खोलीत आल्यावर अचानक तुझं नसलेलं अस्तित्व धावून अंगावर आलं माझ्या...
तिथल्या फरशी-फरशीवर सांडलं होतं, तुझं तुटलेलं आणि माझ्यामुळे दुखावलेलं मन..
तिथल्या पळी-पात्रांच्या गोलाईवर अजूनही रेंगाळत होता; कधीकाळी तू त्यांना केलेला आनंदी स्पर्श...
फडताळा-फडताळांत दडून बसल्या होत्या आपल्या कृष्णमेघ आठवणी...
कोपऱ्या-कोपऱ्यातून तुझी निर्भीड पण होरपळलेली नजर रोखली होती माझ्यावर...
भिंती-भिंतीवरून ओघळत होता तुझ्या भंगलेल्या अपेक्षांचा अंधार आणि मी तुझी केलेली निर्लज्ज उपेक्षा...
उंबरयावर लहानपणीचा दुडूदुडू धावणारा तू होतास;
ओट्यापाशी माझ्यासाठी चहा करणारा तू होतास;
अंथरूणा वर, रात्रवेळी काम करून पहाटे दमून झोपलेला तू होतास... सगळीकडे तू होतास पण तरीही त्यात "तू" मात्र कुठेच नव्हतास...!!!
अचानक खोली पाण्यानं भिजली.. कळेना मला चट्कन काय होतंय.. नंतर कळलं की, पाणी माझ्याच डोळ्यांत आलं होतं..!
नळापाशी गेले... ओंजळीत पाणी घेतलं... आता खरंतर 'कवि-कल्पने'प्रमाणे, ओंजळीतल्या पाण्यातसुद्धा मला तुझीच प्रतिमा दिसायला हवी होती पण...
पण तसं काहीच झालं नाही..!
ते पाणी खूप विरक्त होतं.. अगदी स्थितप्रज्ञ..!
आकर्षित झाले मी त्याच्या या स्थितप्रज्ञतेनं..! कारण आत्ता तरी मला अशीच स्थितप्रज्ञता हवी होती..
कारण इथून पुढे जे काही होणार आहे, तो कदाचित फक्त संघर्ष असेल, किंवा नुसतंच संवादशून्य अवकाश..
किमान काही दिवसांपुरतं तरी...
ज्योत मावळण्याआधी इतकी मोठी का होते;
हे मला आत्ता कळलं होतं...