प्लास्टिक बंदी
प्लास्टिक बंदी
पर्यावरणाशी आपले अतूट नाते
सभोवतालचा निसर्ग आपला खरा मित्र आणि सोबती
जणू हिरवा गालिचा पसरला भूमीवरती डुलतो जसा अलगत वाऱ्यावरती ...
निसर्गाची ही किमया न्यारी मनाला वाटते समाधान भारी
आहे मनुष्य बुद्धिमान आणि प्रगतिशील प्राणी
परंतु मानवाच्या गैरवर्तनाने बिघडला आहे पर्यावरणाचा तोल प्रश्न पडला त्या विधात्याला कधी कळणार मानवाला निसर्गाचे मोल....? नाही राहिली निसर्गपूजा नाही राहिला वनदेवतेला मान आपण आहो जबाबदार घालवण्यास वसुंधरेची शान.... आपल्या दैनंदिन जीवनात एक गोष्ट आपल्या बरोबर निःशब्दपणे वावरत होती.. प्रसंग कुठलाही, काहीही असो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली ती गोष्ट म्हणजे "प्लास्टिक "..
कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. जागतिकीकरणानंतर आलेल्या नवअर्थकारणामुळे आणि बाजाराधिष्टित अर्थव्यवस्थेमुळे "वापरा आणि टाका" ही संस्कृती आपल्या देशात वेगाने पसरत गेली. तात्पुरतेच गरज भागवण्याची सवय जडू लागली प्लास्टिकच्या कॅरीबॅग हे त्याचेच एक निदर्शक म्हणता येईल पण हे निदर्शक आपल्या पर्यावरणाला घातक ठरत आहे... लोक स्वतः चा त्रास कमी करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करतात जीवसृष्टीवर याचा परिणाम काय होईल..? याचा विचारही कुठे केला जात नाही.. हे अत्यंत दुर्देवी आहे. त्याच्यामुळेच प्लास्टिक बंदी गरजेची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2ऑक्टोबर 2019 पासून प्लास्टिक कचरा मुक्त मोहिमेअंतर्गत एकल वापर प्लास्टिक पिशव्या कप,प्लेट इ.वर बंदी घालण्याची घोषणा केली.
काही लोकांचे व्यवसाय प्लास्टिक आणि त्यासंदर्भात आहे त्यांना थोडीफार झळ बसणार वास्तविक या बंदीची चर्चा बरेच महिने चालू होती पर्यावरण संवर्धन, संरक्षण यासाठी हा निर्णय दूरदर्शी ठरणार आहे असे मला वाटते आणि टप्प्याटप्प्याने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय जो घेतला,तर हा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण प्लास्टिक सुमारे शंभर वर्षापासून अधिक वर्ष टिकते प्लास्टिकचा अनेक वर्ष टिकण्याचा गुणधर्मच पर्यावरण नाशाला कारणीभूत ठरत आहे. घनकचरा हाताळणे दिवसेंदिवस कठीण होत जात आहे महानगरपालिकेचा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आर्थिक खर्चाचा भार वाढत आहे. त्याचा परिणाम पूर्ण पर्यावरणावर दिसून येतो प्लास्टिक बंदी एक महत्त्वाचं पाऊल... बंदी करायची एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्लास्टिकचे दिवसेंदिवस दैनंदिन जीवनातील वाढते प्रमाण प्लास्टिक हे अविघटनशील असल्यामुळे पाणी निचरण मार्गात जमा होऊन त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होतात,गटारे तुबंतात, त्या भागात पूर स्थिती तयार होते,लोकांचे आरोग्य धोक्यात येते. पुराचा परिणाम फक्त वन्य आणि मानवी जीवनावर नाहीतर जैवविविधतेवर सुद्धा होतो .
आपल्याकडे नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना ते प्लास्टिकच्या पिशवीत टाकले जाते प्लास्टिक कचरा टाकल्यामुळे जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे त्याच प्रमाणे प्लास्टिक पिशवी मध्ये नको असलेले खाद्यपदार्थ घालून त्या पिशव्या कचराकुंडी टाकल्या जातात हे खाद्यपदार्थ जनावरे खातात नंतर त्यांचे विघटन न झाल्याने प्लास्टिक त्यांच्या पोटात तसच राहते परिणामी त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक मुळात वाईट नाहीये परंतु ते विघटनशील नसल्यामुळे तसेच आपल्याकडची वाढती लोकसंख्या आणि प्लास्टिकचा बेसुमार वापर व बेशिस्तपणा यामुळे निसर्गाची अधिक हानी झालेली आहे. प्लास्टिकची सवय लागलेल्या नागरिकांना त्याच्या वापरापासून थेट प्रवृत्त करणे गरजेचे होते यासाठी प्लास्टिक बंदी करावी लागली.
प्लास्टिक बंदी झाली आणि बरेच काही ऐकु यायला लागलं... वारे जनता...? नक्की घाबरता कशाला, दंडाला कि बदलाला..?
प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा वापर होतो शंभर गोष्टींत ऐंशी गोष्टी प्लास्टिकच्या या असतातच.. या इतक्या घातक आहे की जगभरातील देशांना प्रश्न पडला की पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे करायचं काय..? प्लास्टिकचे वापराला विनाकारण बंदी का आणेल कुणी..? कापड कागद यावर बंदी आहे का हो...? नाही ना.. विघटनशील आहे नष्ट होऊ शकते. प्लास्टिक तसेच जमिनीत गाडले तरी कित्येक वर्षं तसंच राहत यामुळे पर्यावरणाचे नुकसान किती होतं ते माहिती आहे का कुणाला.... बदलाव म्हटलं की, थट्टा मस्करी सुचते आपल्याला... इथे कोणतीही गोष्ट आपण गंभीरपणे स्वीकारत नाही.. सुपीक जमीन नापीक झाली. नद्या-नाले तुबंले वासरांच्या इतर जनावरांच्या पोटात किलोने प्लास्टिक सापडलं बोलता का कोणी कधी तरी....
मुक्या प्राण्यांचा विचार करायला हवा ,आतातरी वेळ गेली नाही प्लास्टिकचा वापर थांबायला हवा.. प्रत्येक शहरातल्या कचरा विघटन करणाऱ्या जागेत जाऊन बघा तिकडे अवस्था काय आहे ते.. प्लास्टिक इतक सोयीच स्वस्त आहे म्हणूनच त्याचा अतिरेक झाला ना त्यामुळे झालेली दुरवस्था दिसतेच आपल्याला... देशाचा नागरिक म्हणून आपले काही कत॔व्य आहे प्रत्येकाने ते समजून घ्यायला हवे प्रत्येक गोष्टीत स्वतः प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा.. प्लास्टिक बंदी मुळे...अनेक फायदे झाले. ओला सुका कचरा वेगळा होणे शक्य झाले. खरकटे प्लास्टिक पिशव्यामध्ये घट्ट गाठ मारून कचऱ्यात टाकणे थांबले. रोजचा अति वापर कमी झाला सगळ्यात भारी पर्याय कापडी पिशव्या सर्वांना मिळाला. फारसे काही अडले नाही प्लास्टिक मुळे . कायद्याची सक्ती करण्यापेक्षा लोकसहभाग महत्त्वाचा ना.. प्लास्टिकच्या पुनर्प्रक्रियासाठी संशोधन होणे ही गरजेच आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करताना प्लास्टिक कचरा त्यात वापरायाचा एक पर्याय आहे. काही लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून भिंती बांधल्या आहे बागेत बसायला सिमेंटच्या बाकड्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केलेला दिसून येते
थोडी जागरूकता आणि शिस्तीचे पालन केले तर ही प्लास्टिक बंदी आपल्याला नक्कीच सोपी जाईल..पण... निसर्गाच्या उदारतेची जाणीव नाही हीच आहे खंत का कुणास ठाऊक कळत नाही की कोपला जर तो होईल सर्वांचा अंत.. अजूनही पर्वत आहे शांत, सागर आहे संत रे माणसा नको पाहू अंत,प्रलय येतील अनंत म्हणूनच म्हणावेसे वाटते...
आली आली प्लास्टिक बंदी
स्वच्छतेची एक मिळाली आपल्याला नवी संधी
मनी रुजू महत्त्व या प्लास्टिक बंदीचे वापरात आणू पेपर रद्दीचे
भाग्य आपले या जन्मीचे
रहिवाशी आपण या भारत भूमीचे बनवू स्वच्छ-सुंदर ओजस्वी भारत
ध्येय आपले उद्देशपूर्तीचे...
