पुस्तकासारखा मित्र न दुसरा..
पुस्तकासारखा मित्र न दुसरा..
पुस्तकासारखा मित्र न दुसरा
संकटात पुस्तकेच देती आसरा.... पुस्तक म्हणजे माहितीचा खजाना.... पुस्तक वाचल्यामुळे नवनवीन गोष्टींची माहिती मिळते व आपले ज्ञान वाढण्यास मदत होते व्यक्तीचे चरित्र, प्रवास वर्णने, कथासंग्रह, कादंबऱ्या, ऐतिहासिक ,वैज्ञानिक अशी अनेक पुस्तके ... आपल्याला प्रेरणा देणारे, उत्साहित करणारे हे पुस्तकचं सांगतात आपल्याला गोष्ट ...
वाहून गेलेल्या दिवसांची , युगायुगांची, विश्वाची, माणसांची, आजची ,कालची, उद्याची, एका एका क्षणाची ...
जेव्हा कोणी नसते सोबती ,तेव्हा माझी पुस्तकेच होतात बोलकी....
"तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार "
मी वाचलेले एक पुस्तक
लेखक -सद्गुरु श्री वामनराव पै .
प्रकाशक -जीवनविद्या मिशन
या संपूर्ण पुस्तकातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास साधल्यास जीवन किती प्रभावी होऊ शकते याचे दर्शन मानवाला जीवनविद्येचे हे शास्त्र घडवते... ' तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार 'या पुस्तकात लेखकाने म्हटल्याप्रमाणे खरंच आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत, हे समजण्यास मदत होते परंतु या सिद्धांताची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते... असमाधानकडून समाधानाकडे, दुःखाकडून सुखाकडे, अतृप्तीतून तृप्तीकडे नेणारया विद्येला जीवनविद्या म्हणावे असा नाविन्यपूर्ण प्रत्यय हे पुस्तक वाचल्यावर आपणास येतो..
जगातील मान्यवर विचारवंतांनी मानवी जीवनाचा सखोल अभ्यास केला त्यांनी जीवनावर आपल्या आपल्या परीने जिवनभाष्य लिहिली परंतु जीवनाचे कोडे कोणीच उलगडू शकले नाहीत, जीवनाचे गणित, कोडे सहज उलघडून दाखवणारा ग्रंथराज म्हणजे हे पुस्तक आहे..
हे पुस्तक किंवा हा ग्रंथ वाचून जीवनाकडे पाहण्याची नवीन जीवनदृष्टी आपल्याला मिळते. जीवनाचे विविध पैलू सिद्धांत रुपाने जीवनाशी कसे निगडित आहे हे लेखक यामधून सांगितले आहे.
यातील पहिला प्रकरण 'यशस्वी जीवन '
जगात जगतात सर्वच पण जगतात कसे? यालाच जीवनात खऱ्या अर्थाने महत्त्व आहे. खरं तर स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचे ज्यांनी अविरतपणे प्रयत्न केले तेच खऱ्या अर्थाने जगले व त्याचे जीवन यशस्वी जीवन असे यातून कळते, यावरून असे सांगावेसे वाटते कि ,
आपल सुखं,आपल्या इच्छा ,आपल्या प्रेरणा याशिवाय आपण जगलोच आहोत कुठे?बरोबर ना.
झाड हिरव्या पानांनी सळसळावं, अशा सुखाची,प्रत्येक माणसाच्या यशस्वी जीवनाची,
हे पुस्तक सांगतायं गोष्ट...
त्यानंतर जीवन संगीताचे स्वर सप्तक.. जन्ममरण यांच्यामध्ये जे असते ते जीवन.. जीवन जगत असताना माणसाला एकच असते ते म्हणजे जीवनात दुःख क्षणभर सुद्धां नसावे व ते अखंड आनंदाने फुलत असावे, जीवन कधी न संपणारी असंख्य रंगाची मालिका जशी आकाशातले उंच तारका याप्रमाणे असावे, सुखाची आस बाळगणार्या व दुःख टाळण्याचा अट्टहास करणारा या मानवाला सुख दुःखाच्या प्रमाणांचा जो अनुभव येतो तो हा की, सुखाचे आसू आहेत कणभर, दुःखाचे आसू आहेत मनभर याचे कारण एकच जीवन जगणे एक उत्कृष्ट कला आहे याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते..
निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारखी दुःखाची, वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगीत फुलांची,
हे पुस्तक सांगतायं गोष्ट....
संगीतातल्या एकंदर सात स्वरा प्रमाणे जीवनात कुटुंब, शरीर, इंद्रिये ,बहिमन व अंतर्मन, परमात्मा से सात सूर किंवा घटक आहेत व आपल्या जीवनात अनन्यसाधारण त्याचे महत्त्व आहे याची कल्पना यांच्या सविस्तर वाचनातून येते... त्याचप्रमाणे आपले कुटुंब ,शरीर प्रकृती जीवनात किती महत्त्वाचे आहे ? उत्तम शरीर प्रकृती ही माणसाची खरी श्रीमंती आहे कारण पैशाची श्रीमंती असून जर शरीर प्रकृती खराब असेल तर त्या श्रीमंतीला काही अर्थ उरत नाही, " लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी हजार पटीने बरी" असे म्हणतात, खरंच आहे.. शरीर प्रकृती जर उत्तम असेल तर जगण्यात 'राम' आहे नाहीतर लवकर 'राम 'म्हणणे बरे असे वाटू लागते... वास्तविक पाहिले तर मानवी शरीर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे जरा सूक्ष्म दृष्टीने मानवी शरीराकडे पाहिलं तर मती गुंग होते व बुद्धी कुंठीत होते..
Habit is second nature.. सवयीतून स्वभाव तयार होतो व स्वभावातून नशीब साकार कसे करता येईल याचा प्रत्यय यात दिलेल्या अनेक उदाहरणारे व्दारे आपल्याला येतो..
As you think so you become.
'जसे विचार त्याचप्रमाणे जीवनाला आकार '..
'चिंतन हा चिंतामणी आहे' तुम्ही ज्याचे चिंतन कराल ते तुम्हाला प्राप्त होईल जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करायचे सामर्थ्य आपल्या चिंतनात आहे तसेच ज्याप्रमाणे कोळी व रेशमी किडा दोन्ही वेगवेगळ्या प्रमाणे धागे विणतात आपण सुद्धा रंगीबिरंगी धागे निर्माण करून संसाराचे जाळे तयार करीत असतो, विचार व विकार, संकल्प विकल्प ,कल्पना व भावना इत्यादी मधून...
स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यात रेशमी किडयासारखे स्वतः अडकायचे त्याउलट जाळ्यात कोळ्या सारखं सुखाने विहार व व्यवहार करायचा हे आपल्यालाच ठरवावं लागतं ... तसेच
As you sow so you reap..
(आपण जसे कर्म करतो त्याचे फळ ठरलेले असते )
'पापाची परिणीती म्हणजे ताप व पुण्याची परिणती म्हणजे समाधान'... पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख हा निसर्गाचा त्रिकालबाधित सिद्धांत आपण लक्षात घेतला पाहिजे...
पुस्तकात दिलेल्या अनेक उदाहरणाद्वारे आणि पुस्तक पूर्ण वाचल्यावर जीवनाचा खरा आनंद आपणास मिळतो आणि खरच आपल्याला आपल्या मधला शिल्पकार कळतो...
शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे,
शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने ..
हे पुस्तक तसेच काही सांगू इच्छिते,
आपल्या सावलीत आपल्यालाच रंगू इच्छिते ..
पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे, हे मानवा 'तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार' सर्वे संतु निरामय ही विज्ञानाची हाक आहे..
हे पुस्तक सांगतयं गोष्ट मानवाच्या सुखी जीवनाची, आजची, उद्याची, जीवन कसे जगावे त्या एका एका क्षणाची....
