मोरपंखी आठवणींचा पिसारा
मोरपंखी आठवणींचा पिसारा
शहरात नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर वास्तव्यास असल्यामुळे शाळेला उन्हाळ्याची अथवा सणानिमित्त सुट्टी मिळाल्यावर टू व्हिलरवर १०० किलो मीटर प्रवास करत गाव गाठण्याचा आनंद निराळाच.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेलं,शिवजन्मभूमी पासून २० किलोमीटरच्या अंतरावर असणारे, मांडवी तिरावर असणारे पूर्वीच्या उत्तमापूर या नावाने परंतु,आता ओतूर या नावाने संबोधले जाणारे छोटेसं गाव.
पहाटे उठून गावी जाण्याची धडपड, गावी जाताना भामची प्रसिद्ध मिसळ खाण्याचा आस्वाद तर खिसा भरुन चाॅकलेट घेत गाडीवर पुढे बसून चाॅकलेट खात डोळ्याला गाॅगल लावून आपल्याला गाडी चालवता येते या आत्मविश्वासात गाडीचे हॅण्डलवर हात ठेवून इकडे-तिकडे पाहण्याची मजा काही औरच.
एकदा का ओतूर स्टॅण्ड आले की कौलारु घर, अंगणातली तुळस, गोव्यातील गुरे, नारळाचे घरा पुढे असणारे ताडमाड झाड स्वागतासाठी जणू सज्ज असल्याची जाणीव होत होती. त्याचप्रमाणे घरच्यांना आश्चर्य वाटवं म्हणून मला रस्त्याच्या चढावर सोडायचे. आई-बाबा गाडीवर पुढे जावून घराजवळ थांबायचे. मग सगळे विचारायचे एवढ्याश्या मुलीला कुठे ठेवले. मी मात्र हळूहळू चालत लपत-लपत नारळाच्या झाडामागे लपायचे. घरातले सर्वजण मला पाहिले असून न पाहिल्या सारखे करायचे. आणि मला शोधून काढायचे. मी देखील कसं फसवलं म्हणत हसत बसायचे. मग सगळेजण हसत-हसत घरात जायचो. एकत्र बसून गप्पा मारत असायचो. हिवाळा आला की पहाटेच्या वेळी शेकोटी पेटवून सगळे शेकत बसायचो. रात्रीच्या वेळी अशीच शेकोटी पेटवून गप्पा, गाणी, दमशेराज असे खेळ-खेळत बसायचो.
सकाळी लवकर निघाल्यावर ट्रॅफिक कमी लागते आणि गावी देखील लवकर पोहचता येते. तेव्हा घराच्या अंगणातला आंघोळीकरता तापवलेला बंब, घरापुढे असणा-या हौदावर आत्या, आजी कपडे धुताना, तर एका बाजूला काका, आजोबा गुरांना पाणी पिण्यासाठी हौदावर आणून बादलीत पाणी घेवून पाणी पिण्यासाठी देत असायचे. आमच्याकडे जी बैलजोडी होती त्यातल्या बैलांची सर्जा-राजा हि नावं होती.
हे मनमोहक दृश्य आजही जसेच्या तसे डोळ्यासमोर तरळत आहे. घराच्या हाॅलला तेव्हा आम्ही चौक म्हणत होतो. आत प्रवेश केल्यावर पुढे छोटिशी जागा. त्या जागेत, आणि प्रत्येक खोलीत एक कोपरा असायचा त्याला कोनारा म्हणायचे. त्यात वेळेला उपयोगात येणाऱ्या गोष्टी, हाताशी हव्यात अश्या वस्तू ठेवण्यात यायच्या. तर घराच्या बाहेर असणा-या कोना-यात दिवे लावले जात होते.बाजूला एक जिना, नंतर चौक, चौकाच्या पुढे माजघर, चौकाच्या समोर दोन खोल्या त्यातल्या एका खोलीत नेहमीच अंधार असायचा. आम्हा लहान मुलांना ती भुताचीच खोली वाटायची. तिथे धान्यकोठार असायचे. त्या रुमच्या दरवाजा जवळच उखळ असायची त्यात लाकडी दांडा असायचा त्याला मुसळ बोलतात त्याने साळी कुटून त्याचे तांदूळ तयार करायचे. त्या खोलीत खरतर जायला घाबरायचो. पण लपाछपी खेळताना पकडले जावू नये असे वाटत असेल तर त्या खोलीत राम, राम म्हणत लपून बसण्याची मजा यायची. पकडा-पकडी, दिवाळीला एकत्र उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांची आतिषबाजी, घराला पणत्या लावून दिव्यांच्या रोषणाईने घर उजळून निघायचे. शेणाने सारवून त्याला काव लावून ठिपक्यांची रंगीबिरंगी रांगोळी काढली जात होती. आत्या, काकी, सगळ्याजणी मिळून रांगोळी काढत होत्या.अंगणात पाट मांडून सगळ्यांना क्रमवार बसून पहाटे उटणे लावण्याचा कार्यक्रम पार पडत असायचा. नंतर सर्वांना नविन कपडे देवून गोलाकार बसून दिवाळीचा फराळ केला जायचा. दिवसभर फटाके उडवण्यात यायचे. तेही सर्वजण सोबत राहून फटाके उडवण्याचा आनंद घ्यायचे. लहानांपासून मोठे देखील सहभागी व्हायचे.
एरव्ही गावी गेलो की आजीला हाक मारत माजघरात प्रवेश केला की चुली समोर आजीचा स्वयंपाक हा सुरु असायचा. चुलीवरचे जेवण खमंग आणि गरमागरम होते. पण तिथे थोडावेळही बसणे मुश्किल असायचे. फुंकणीने फुकत अग्नी निर्माण करण्या करता फुंकले की धूर व्हायचा. तसेच त्याकरता सरपण हे शेतातून किंवा घरामागे असणाऱ्या पांदीतून आणले जायचे. घराच्या पुढच्या बाजूला केळीची बाग. खरतर ओतूरला असणा-या प्रत्येक घरापुढे पूर्वी केळीची बाग असायची.घराच्या मागे एक ओढा होता. तिथून गावात जाण्याचा शाॅट कट होता. आजूबाजूला झाडांची वर्दळ असायची. आता तो रस्ता डांबरी बनवण्यात आला आहे. त्यावेळी माजघरातही दोन खोल्या होत्या. खालच्या खोलीत एक मांडणी असायची. तिथे भांडी आणि तांबे ठेवण्यात यायचे. माजघरात वरती एक वरती टांगलेल शिकाळं त्यात झाकूण ठेवलेल्या चपात्या, भाकरी, दूध ठेवत होते. घरातले काम आवरल्यवर शेताची काम करायला जाताना मांजरीने येवून दूध पिवू नये याकरता शिकाळ्याचा वापर केला जायचा. भाकरी थापता यावी करता काठवठ, लाकडी चमचे, पिताळ्याची भांडी, लोखंडी कढई, चिमटे, वेगवेगळ्या आकाराचे चमचे, असायचे. एक मोठी लोखंडी पेटी देखील होती. ती दहा माणसांना पण हलवता येणार नाही इतकी जड होती. जाळीचे एक कपाट देखील होते. त्यात देखील खायचे पदार्थ ठेवून छोटेसे लाॅक लावण्यात यायचे. त्यावेळी लाकडी कपाटे त्यात धान्य आणि त्या कपाटांना कुलूप लावले जायचे. चाव्यांचा जुडगा सतत कमरेला खोचलेला असायचा.
एकत्र कुटूंब असल्याने सकाळी पेटवलेली चूल अगदी दुपार पर्यंत सुरु असायची. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला काही खायला घातल्याशिवाय सोडत नसायचे. मनाची निर्मळता, जपण्यात येणा-या ऋणानुबंधाचा ओढा, जवळच्या माणसांची ख्याली खुशाली घेत आनंदाने आपल्या घराकडे परतण्याची ओढ काय ती निराळीच होती.
कुटूंबाकरता काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास मोठी माणसे चौकात गोलाकार बसून आपाआपली मते मांडत सर्वानुमते योग्य तो निर्णय घेण्यात यायचा. त्यावेळी ब्लॅक अण्ड व्हाईट टिव्ही आमच्या घरात पहिलच होता. तेव्हा आजुबाजूला राहणारे भाऊबंध आमच्या घरात टिव्ही बघायला यायचे. सर्वांसोबत एकत्र मालिका, मॅच पाहिल्या जायच्या. तसेच कार देखील त्यावेळी आमच्याकडे होती. अर्थात ती मी फोटो मधेच पाहिली आहे. आमच्या घरात तीन आज्या, एक आजोबा, आई-बाबा, सहा चुलते- चार चुलत्या, सहा आत्या, पाच लहान मुले, वडिलांच्या सात आत्या आणि त्यांची २१ मुले असा मोठा परीवार या कौलारु घरात सणासुदिला एकत्र पाहायला मिळायचा.
कुटूंबात जेवढे सदस्य तेवढी त्यांची कामे देखील विभागली जायची. कोणी सकाळचा स्वयंपाक, कपडे धुणे, शेण-सडा, रांगोळी काढणे, घर - अंगण झाडून घेणे, गोठा साफ करणे, कपडे वाळत घालणे, धान्य निसणे, टिपणे, शेंगांची पोती दुपारच्या वेळी शेंगदाणे निवडणे, कोणी बैलगाडीतून शेती जाणे, अशी निरनिराळी कामे वाटून घेतली जायची.
आता ते कौलारु घर राहिले नाही. त्या जागेवर नविन बिल्डिंग उभी केली आहे. पण त्या घरात जाताना जुने असणारे आठवणीतलं हे गावचं घर अजूनही आठवणीत ताजं आहे.
