Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

मन करा रे प्रसन्न

मन करा रे प्रसन्न

2 mins
346


  "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण," या संत तुकारामांच्या अभंगामधे मनाचे महत्त्व सांगितले आहे. तुमचे मन प्रसन्न असेल, वृत्ती उल्हसित असेल तर, तुमची विचारसरणी सकारात्मक रहाते. तुम्ही चांगला विचार करु शकता व त्यातूनच चांगले कार्य निष्पन्न होते.


   "श्रावणमासी हर्ष मानसी" अशा मन प्रसन्न करणाऱ्या श्रावणाच्या पहिल्या दिवशीच आल्याचा चहा घेऊन लिहायला लागल्यावर वृत्ती प्रसन्न असणारच! आम्ही सिंहगडरोडला हिंगण्यामधे खोऱ्यात रहात असल्याने आजूबाजूला नजर टाकली तरी, हिरवाईचे डोंगर मन प्रसन्न करतात. त्यामुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. नवीन लिहायला हुरुप येतो. हा निसर्ग आपल्याला खुणावत असतो. तेव्हा हातून काहीतरी चांगले लिहिले जाते. 

 

  मी आसाममधे गुवाहाटीला माझ्या मुलाकडे गेले होते. तिथला निसर्ग हिमालयाचे फार जवळून दर्शन देतो. जगप्रसिद्ध लेखक, कवी, संगीतकार, कै. भूपेन हजारिका सर ह्यांची प्रतिभा तर अलौकिकच पण ते ज्या प्रांतात राहिले तो प्रांत त्यांच्या प्रतिभेला पोषक होता हे मान्य करायला हवे. साहित्य, संगीतात त्यांनी तन - मन - धन अर्पूण फार उच्च दर्जाची कामगिरी केली. बाजूच्या हिरव्यागार थंड निसर्गामुळे त्यांचे मन प्रसन्न राहिले.


  "मन वढाय वढाय," असे बहिणाबाईंनी म्हटलेच आहे. हे चंचल मन कधीकधी लेखकाला मन एकाग्र करायला फार त्रास देते. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ, तो हे अचपळ मनाला जबरदस्त लगाम घालून आपले मन स्थिर ठेवून, ध्येयनिष्ठेने आपला कार्यभाग पूर्ण करतो. Where there is a will, there is a way हे व्यवहारात अगदी सार्थ आहे. 

सांगलीची वल्लरी करमरकर शारिरीक असमर्थता असूनही तिने सायकल शिकून तिचे शिक्षण पूर्ण केले. तिला संगीताचेही ज्ञान आहे. रेडिओवर एखादा राग लागला तर त्यातले बारकावे ओळखते. हे मी तिला प्रत्यक्ष भेटायला गेल्यावर समजले तेव्हा आश्चर्यचकित झाले. ती सिंथेसायझरपण उत्तम वाजवते. "तुमच्यासारखे कौतुक करणारे लोक तिचे मानसिक बळ वाढवतात," असे तिचे वडिल म्हटल्यावर तिच्या जबरदस्त मानसिक शक्तीचे खूप कौतुक वाटले.

 

   हे मन जसे अनुकूल स्थितीत काम करते तसेच काही कलाकारांच्या बाबतीत प्रतिकूल परिस्थितीतही चांगल्या प्रकारे काम करते. ह्याला कारण त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, अडचणींवर मात करण्याची मानसिक शक्ती आणि गणपती सरस्वतीचा वरदहस्त हेच होय! सुप्रसिद्ध संगीतकार कै. श्रीनिवास खळे सर ह्यांना भेटायला गेले असता ते पेटी विकायला निघाल्यावर पत्नीने ती विकूच न देण्याचा दृढनिश्चय करुन त्यांना रोखले. मानसिक बळ मिळाल्यानेच पत्नीच्या आजारपणातही मन कणखर ठेवून काम करु शकले.


   वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार केला तर बहिणाबाईंनी वर्णन केलेले "मन वढाय वढाय" तसेच श्री समर्थ रामदासस्वामींनी "अचपळ मन माझे, नावरे आवरिता," असे वर्णन केलेले मन अनाकलनीय आहे. ती एक अदृश्य शक्तीच आहे असे म्हणावे लागेल. मन प्रसन्न असणाऱ्यांना साहित्य, कला, क्रीडा ह्यात सरळ मार्ग मिळतो. त्यांचे काम सहजतेने होते. प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर गाठणारे माजी राष्ट्रपती पै. ए पी जे अब्दुल कलामजी सर, रघुनाथ माशेलकर, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे सर, भारताच्या सार्वजनिक निवडणूकीत प्रचंड यश मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मनावर ताबा ठेवून कार्याला देव मानणारे महान साधक आहेत. ह्या सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract