Pratibha Chandurkar

Abstract

3  

Pratibha Chandurkar

Abstract

मन भावन श्रावण

मन भावन श्रावण

2 mins
180


श्रावण म्हणल की माहेर आठवत आणि ओठावर गुणगुणत रहातं..एक गीत..

" श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा.."

आकाशात घन निळा, रिमझिम पावसाच्या धारा, माहेरची ओली ऊब..

माझ माहेर डोंबिवलीच. श्रावण सुरू झाला, की आई, शेजारच्या काकू, मावशी, आज्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ..

व्रत, वैकल्य सुरू व्हायची. जरीच्या साड्या, दागिने, चांदीची भांडी नवं रूप लेऊन झळकायची. 

निसर्ग आणि मनं दोन्ही बहरली असायची.

उपास सुरू व्हायचे. कोणाचा ना कोणाचा उपास असायचा. बाल गोपाळांची मजा असायची. प्रत्येक घरातून वेगळा खाऊ मिळायचा. 

खर तर ज्याचा उपास असायचा ती व्यक्ती अगदी घासभर खायची, वाटायची जास्त. किती मनाची तृप्तता होती.

आता अशी दिसतच नाही. 

आम्ही मुली तर पत्री गोळा करायचो. तेव्हा फुलफुडी हा प्रकार न्हवता. 

प्रत्येकाच्या अंगणात वेगवेगळी फुलं, पान मिळायची. ती खुडून आणायची. खूप मजा यायची. ज्यांच्याकडे जायचो, तिथे फुलं, तुळस , दुर्वा , आघाडा, बिल्व पत्र, अगदी मारवा ही मिळायचा कधी कधी..पत्री तर मिळायचीच वर खाऊ ही मिळत असे.

आणखी एक हृद्य आठवण म्हणजे लग्न होऊन सासरी गेलेल्या माहेरवाशिणींच येणं. आल्या की हात पाय धुवून, चहा पाणी झाल, की मानलेल्या काकू, आत्या, आजी, मावशी ह्याच्या घरात डोकावणार..

" कधी आलीस पोरी? " अशी मायेची हाक घराघरातून ऐकू येत असे. 

मग रोज एक घरी भेट, गप्पा, जेवण, ओटी हे अगदी ठरलेलं. किती मनाच मोठेपण होत. 

घराची आणि मनाची दारं मोकळी.

श्रावणी सोमवारी शाळा आणि ऑफिस मधून लवकर यायला मिळत असे. खूप मजा येत असे. आमच्या चाळीत तर सर्व जणी एकत्र फराळ करत असत. साबुदाणा खिचडी, रताळ्याचे काप, फळ, बटाट्याची उपासाची भाजी, साबुदाणा वडा, थालिपिठ, ताक..नुसती खादाडी..

वर म्हणणार , " उपास म्हणत दुप्पट खातो आपण.." एकत्र असल्यावर चार घास जास्तच जायचे. 

दोन तीन जणांचा उपास असेच. म्हणून खायचे खूप चोचले पुरवायला मिळत असत.

सण तरी किती? आणि प्रत्येक सणांचा वेगळा पदार्थ. 

पुरण पोळी, कडबु, नारळी भात, भाजणीचे वडे, दही पोहे, सुंठ वडी ..

आई जिवतीच पूजन करायची. त्या दिवशी सवाष्ण तर असायची च, आणि इतर जणी ही असायच्या. 

जिच्या घरी सवाष्ण असायची तिच्या घरी बाकी ही सगळ्याजणी असायच्या. मदतीला ही. एकमेकांच्या हाताची वेगळी चव चाखायला मिळायची. दोन घास एकत्र जेवत, सुख दुःखाच्या गोष्टी व्हायच्या.

बऱ्याच जणी सासुवाशीण असायच्या. 

थोडी मोकळीक मिळायची. उसंत ही. 

साधी, प्रेमळ, प्रेम करणारी आणि हक्काने ओरडणारी माणसं होती. मनात एक, ओठात एक अस न्हवत.

त्यांच रागावणे आपल्या भल्या साठी आहे, अस घरची मंडळी ठासून सांगत होती. 

मला आठवतं की एकत्र कुटुंब असल्याने , माझ न्हावून झालं , आणि आई जर कामात असली तर शेजारच्या काकू डोकं पुसून सैल वेणी घालून देत असत. 

आई ही किती वेळा अशी मदत करत असे. 

शाळेतून आल्यावर , आईला जर अचानक कुठे बाहेर जावं लागल असेल , तर शेजारी पाजारी सांभाळायचे. 

आई निर्धास्त असे. 

हे सगळ आठवल की आता वाटत, आर्थिक समृद्धी आली आहे.

पण ते प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, विश्वास आता राहिलाच नाही. 

आपणच आपला आपलेपणा गमावून बसलो आहोत.

उरल्या आहेत आठवणी. त्या जपताना मनात एक अनामिक हुरहुर दाटून येते. डोळ्याच्या कडा ओलावत रहातात..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract