Manisha Awekar

Abstract

4.2  

Manisha Awekar

Abstract

मी मराठी बोलतेय

मी मराठी बोलतेय

5 mins
952


  मी मराठी तुमची मातृभाषा बोलतेय!!आईलाच मुलांशी बोलायची आज वेळ आलीय. मी सौम्य आहे, आग्रही आहे आणि आक्रमकही!! मी नवरसांनी समृद्ध आहे. ज्येष्ठ गीतकार , संगीतकार , गायक / गायिका ह्यांनी मराठी गाणी अजरामर केली आहेत. कविता, लेख , समीक्षा ,कथा असे विपुल साहित्य जाणकार आणि साहित्यकारांनी लिहिले आहे. ते इतके सुंदर आहे की विविध भाषांमधे भाषांतरित झाले आहे. इतर भाषिक जाणकार, साहित्यकारांनीही त्याची वाहवा केली आहे. परदेशी लोकही मराठी साहित्याला गौरवतात. वाचनात रममाण होतात.


   पण......पण....काय सांगू तुम्हांला ....कसे सांगू तुम्हांला....आज माझ्या अंतरीची सगळी व्यथा मी तुम्हांला सांगणार आहे. माझे मन मोकळे करणार आहे. माझ्या मराठीभूमीतच मायमराठीला मान मिळेनासा झाला आहे. जो तो आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालायला लागला आहे. इंग्रजी भाषेबद्दल मलाही आदरच आहे पण जी मुले इंग्रजी भाषेच्या शाळेत जातात व फाडफाड इंग्रजी बोलतात फक्त तीच मुले हुशार आणि स्मार्ट आहेत असा गोड गैरसमज लोक करुन घेतात. त्यांच्याशी घरीही इंग्रजी बोला अशी शाळेची पालकांना सूचना असते.मातृभाषा हे अभिव्यक्तीचे साधन असते. घरी-दारी इंग्रजी बोलल्याने त्यांचे मराठी अगदीच मोडके तोडके असते.भर म्हणून त्यात इंग्रजी शब्दही टाकले जातात. अशी इंग्रजी -मराठी सरमिसळ मला फार चटका लावते.फार थोडे पालक सेमी इंग्रजी माध्यमाला घालतात. त्यांची मुलेही उच्चशिक्षित आहेत. कॉन्फरन्सेस मधे ती कुठेही कमी पडत नाहीत. त्यांचे वक्तृत्वकौशल्य इंग्रजीमधेही वाखाणण्यासारखे असते.आता तर हातावरचे पोट असणारे कष्टकरी आई-वडीलही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला लागली आहेत.मातृभाषेतून घेतलेले शिक्षण ख-या अर्थाने कळते ,समजते. मुले त्यातील साहित्यही समरसतेने वाचतात. आता मी लहान मुलांची पुस्तके असणारे दुकान पाहिले तर तिथे 90% इंग्रजी पुस्तके मिळतात आणि 10%च मराठी पुस्तके मिळतात.विचार करा किती विदीर्ण होत असेल माझे मन!!किती वाईट वाटत असेल मला!!माझ्या मराठी भूमीतच मराठी सक्तीची करावी लागली आहे पण त्यात समाधान एवढेच की माझ्या सर्व मुलांना थोडे तरी मराठी नक्कीच येईल.


   माझी मुले परदेशात गेली म्हणजे त्यांनी करिअर केले असे वाटते. तिथे त्यांचीही मुले इंग्रजी शाळेत जातात घरी-दारी इंग्रजी बोलल्याने साहजिकच ह्या पुढच्या पिढीला मराठीचा गंधही असणार नाही अशी अनामिक भिती मला वाटते. वास्तविक ज्या भाषेचा आभिमान आपल्याला वाटायला हवा , त्याला परकियांनी गौरवावे ही एक चिंतेची बाब आहे.


  आजकाल इंग्रजी सिनेमा बघणे म्हणजे एक फुशारकीची गोष्ट झाली आहे.

जे मराठी सिनेमे बघतात ते अडाणी , मागासलेले असे समजले जाते. हा न्यूनगंड आपले मराठी लोक का बाळगतात हेच कळत नाही. कुठलीच भाषा श्रेष्ठ -कनिष्ठ नसते.आपापल्या जागी सर्वच श्रेष्ठ आहेत असे मला वाटते. इंग्रजी गाण्यांच्या तालावर नाचणे हे सुधारकपणाचे लक्षण आहे असे मला आजिबात वाटत नाही.गुजराथीमधे गर्बा मराठीमधे कोळी नृत्य आदिवासी नृत्य शेतकरी नृत्या हे नाचांचे प्रकार आहेत. आपल्या भाषेतल्या परंरा , नृत्य , गाणी , नाटके हे पुढील पिढीत संक्रमित केले पाहिजे,पण आपली पुढची पिढी ह्याला वंचित झाली आहे. आमच्या मुलांना मराठी फारसे येत नाही असे जेव्हा हसून फुशारक्या मारुन सांगितले जाते तेव्हा मला खूपच वाईट वाटते.


  एकच समाधानाची गोष्ट म्हणजे तर्कशास्त्रीय नियमाप्रमाणे काही लोक असे आहेत , म्हणजे सर्वच लोक असे असतील असे नाही.आपल्या देशातील अग्रणी कवींचे परदेशातही संमेलन असते.त्या कविता ऐकायला मराठी लोक रसिकपणे येतातही. विचारांचे ,कल्पनांचे आदान-प्रदान होते. आपली मातृभाषा , आपले मराठी लोक भेटल्यावर त्यांना जो परमानंद होतो , तो त्यांच्या मुखावर झळकताना दिसतो. हे बघताना माझेही डोळे आनंदाश्रूंनी भरुन येतात.


  काही शाळांमधे मुलांना कविता करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.श्रावण , किंवा दसरा अशी संकल्पना घेऊन छोटी छोटी मुले नाटुकली , नाच , गाणी सादर करतात , तेव्ही ती किती गोड दिसतात !!माझा ऊर अभिमानाने भरुन येतो. छान करताय!! असेच नेहमी करत रहा,असे आशिर्वादही मी हसतमुखाने देते.


  नाटक हा तर माझा खूप आवडता प्रांत!!जुनी संगीत नाटके ९ला सुरु व्हायची आणि पहाटे ५लाच संपायची.धन्य ते कलाकार व धन्य ते रसिक प्रेक्षक !!त्यांची कलेवरची निष्ठा शब्दातीत!!जुन्या नटांनी तर आपले सर्वस्व रंगभूमीला वाहिलेले.आता काळ बदलला आहे हे मलाही मान्य आहे पण आपली आभिरुची रसिकांनी उच्च दर्जाचीच ठेवली पाहिजे.बदलत्या काळानुसार बदलती नाटके येऊ देत पण त्यात मूळ संकल्पना , सादरीकरण उच्च दर्जाचेच हवे. बदलत्या समाजानुसार बदलते विषय येऊ देत पण दर्जा खालावायला नकोय.ह्या C D

च्या जमान्यातनाटकांना प्रेक्षक नाही असे म्हटले जाते पण काही बालनाट्ये चांगली चाललेली बघून मला खरोखरीच खूप समाधान वाटते .


   जे नाटकांचे तेच सिनेमांचे.काही दर्जेदार चांगले सिनेमेही केवळ भरपूर मालमसाला नाही म्हणून पडलेले बघून मला वाईट वाटते. आता ऐतिहासिक संकल्पना घेऊन "जाणता राजा"सारखी उच्च दर्जाची नाटकेवर्षानुवर्षे चालत आहेतही समाधानकारक बाब आहे.तानाजीवरचा सिनेमा मला आवडला पण त्यातले हिंदी स्टाईलने उच्चार केलेले संवाद मला खटकलेच.अस्सल मराठी बाण्याचे कलाकार का नाही निवडले गेले?तो सिनेमा केवढ्या मोठ्या उंचीवर गेला असता!! हिरकणीचाही विषय निवडला जातोय सिनेमासाठी.खूप धन्य वाटते. स्त्री जातीला , तिच्या त्यागाला जाणले जातेय ,गौरवले जातेय खूप छान वाटले मला!!


  गाण्यांच्या बाबतीत मी पूर्वी खूपच समाधानी होते.चांगले गीतकार , चांगले संगीतकार, चांगले गायक /गायिका म्हणजे त्रिवेणी संगमच!!शब्द , लय , सूर , ताल ह्यांचा अपूर्व संगम झालेला असे.तो मराठी गाण्यांचा सुवर्णकालच होता. उत्तम शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी संगीतकार , गायक मेहनत घेऊन बसवत असत.मला खूपच आनंद व्हायचा तेव्हा!! पण आता जे कर्णकटू तार सप्तकातले संगीत आले आहे ,ते मला अजिबात आवडत नाही.जुन्या गाण्यांचे रिमिक्स करुन कर्कश आवाजातले गाणे माझ्या कानांना सहन होत नाही.तुमच्या धांगडधिंग्यासाठी जुन्या गाण्यांची मोडतोड कशाला करता? असेल हिंमत तर नवीन गाणे लिहून घ्यावे , त्याला चांगली चाल देण्याचा प्रयत्न करावा पण असे प्रामाणिक प्रयत्न कुणीच करत नाही उलट जे चांगले आहे त्याला ठोकून पोचे आणायचे काम चालू आहे.काय म्हणावे ह्या आळशीपणाला?


  आता गरज आहे प्रतिभावान कवींनी उत्तम कविता लिहिण्याची .चांगल्या संगीतकारांनी चाली लावून उत्तम गायक/गायिकांकडून कसून मेहनत करुन घेण्याची आणि गायक/गायकांनी मेहनत घेऊन मन लावून गाण्याची.मला वाटते तोही दिवस लवकरच नक्की येईल. मी त्या दिवसाकडे डोळे लावून बसले आहे.


  शेवटी महत्वाचे सांगायचे म्हणजे आत्ता जो मराठीदिन साजरा झाला ही चांगली गोष्ट आहे.पण मला एवढेच सांगायचे आहे की मराठीचे गोडवे फक्त त्याच दिवशी गाऊ नका.नाहीतर "नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे" असे व्हायचे. तुम्ही स्वतःही मराठी साहित्य वाचा आणि तुमच्या मुलांमधेही आवड संक्रमित करा. त्यांना भरपूर पुस्तके आणून द्या. खूप खूप समृद्ध आहे आपले साहित्य साहित्य. मुलांनाही त्याची गोडी लावा, म्हणजेच भावी समृद्ध मराठी पिढी निर्माण होईल. मला त्यातच खूप आनंद आणि समाधान वाटेल.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract