कस्तुरी मृग
कस्तुरी मृग
आज शाळेत मुलांना एक्स्ट्रा क्लास घेताना रामायणाची गोष्ट सांगितली , स्त्री हट्ट . सीतेने पर्णकुटी बाहेर सोनेरी आणि खूप सुंदर असा मृग पहिला आणि तिला तो इतका भावला की तिने श्रीरामाला सांगितले कसही करून मला तो मृग आणून द्या . आणि तिच्या ह्या हट्टा पुढे श्रीराम हार पत्करून त्या मृगाच्या मागे धनुष्य घेवून पळाले.
आणि ते एक मायावी हरीण होते , ती रावणाची एक चाल होती कारण त्या नंतर काहीतरी आवाज ऐकून लक्ष्मण श्रीरामाला मदतीला म्हणून गेला पण त्या आधी त्याने आपल्या धनुष्याने एक रेघ मारली आणि सीतेला सांगितलं की काहीही झालं तरी तिने ही रेघ ओळंगुन जाऊ नये . त्या रेघेला " लक्ष्मण रेषा " म्हणून ओळखलं जातं .
पण त्या दुष्ट रावणाने कट रचला होता . पुन्हा वेश बदलून पंचकुटी च्या बाहेर साधूचा वेष घेवून आला जेव्हा सीता तिथे एकटी होती . तिनी लक्ष्मणरेषा न ओळंगण्याचा आग्रह धरला पण त्या साधूंनी अट घातली की त्या रेषे बाहेर येवून भिक्षा दिली तरच ते भिक्षा घेतील नाहीतर नाही घेणार . सीतेला धर्मसंकट पडलं, आता तिने काय करावं ?
तिने जर रेष ओळंगली तर तो लक्ष्मणच्या आदेशाचा अवमान होता आणि प्रश्न तिच्या सुरक्षेचा होता तर एक साधी भोळी आणि सात्विक व धार्मिक विचार करणारी सीता म्हणे की दारी आलेल्या भिक्षुकांना असं भिक्षा न देता परत कसं जाऊ देवू . शेवटी सीतेने ती रेष ओळंगली आणि तो दुष्ट रावण सीतेला पळवून घेवून गेला , आणि रामायण घडलं. जे आपण सर्वांनी धार्मिक पुस्तकं, कथा आणि शालेय पुस्तकातून पण अनेकदा वाचलं आहेच .
ह्या गोष्टीच्या ओघा ओघातून मला कस्तुरी मृगा विषयी उत्कंठा निर्माण झाली .मुळात मृग म्हणजेच हरीण हा एक सुंदर दिसणारा , स्वभावाने गरीब म्हणजे अनुपद्रवी पण चपळ आणि कळपात राहणारा प्राणी .
इतर प्राण्यांसारखी हरिणाची भिती वाटत नाही . त्याची ओळख म्हणजे लांब आणि शरीरयष्टी प्रमाणे बारीक पाय आणि रंग तसा तपकिरी पण त्यावर पिवळ्या - काळया पांढऱ्या रंगाचे थोडे लहान - मोठे असे ठिपके . तेजस्वी डोळे असणारा. आणि अनुपद्रवी प्राणी असल्यामुळे दुसऱ्या हिंस्र प्राण्यांचा जंगलात शिकार होणारा प्राणी. पण त्याला एक वरदान मिळालेलं आहे की ते खूप जोरात धावू शकते आणि आपला बरेचदा त्यामुळे त्याला बचाव करून घेता येतो .
मृग हा शब्द एक मायावी किंवा भ्रम निर्माण करणाऱ्या स्थितीसाठीही वापरला जातो आणि तो म्हणजे " मृगजळ " . एखाद्या रेतीच्या वाळवंटात जिथे कुठेच पाणी नसते पण सूर्य किरणांच्या रेतीच्या कणांवर पडून तिथे पाणी असण्याचा आभास निर्माण होतो आणि म्हणूनच जे प्रवासी वाटसरू असतात ते मृगजळ म्हणजे ते दिसणारे पाणी गाठण्याचा प्रयत्न करतात पण तो फक्त एक खोटा आभास असतो . म्हणूनच एखाद्या आमिषा मागे धावणाऱ्यासाठी ते एका मृगजळामागे धावण्या सारखं असतं.
कस्तुरी ही अतिशय सुगंधी असते आणि राजघराण्यात शृंगार साधनात ह्याचा उपयोग केला जात असावा . आता ही कस्तुरी त्या विशिष्ट "कस्तुरी मृग" म्हणून ओळखला जाणाऱ्या मृगाच्या नाभी मध्ये असते . आणि म्हणून जिथेही तो मृग जातो तिथे कस्तुरीचा सुवास पसरतो .
असं म्हणतात की ते त्या मृगालाही ठावूक नसतं की हा सुगंध त्याच्या नाभीत दडलेल्या कस्तुरी मुळे येतोय ते . जसं तुकाराम , ज्ञानदेव असे संत हे परमेश्वराच्या भक्तीमध्ये इतके लिन झालेले होते की त्यांनी कधी विचार केला नाही की किती जण त्यांना अनुसरत होते , किती दूरदूर पर्यंत त्यांची ख्याती होती ते . खरे संत कधीही प्रसिद्धीची पर्वा न करता आपल्या ध्यानात मग्न असतात . आणि म्हणूनच त्यांनी लिहिलेले ग्रंध आज जगभरात प्रसिद्ध आहेत .
कस्तुरी मृग हे अतिशय दुर्मिळ असणारे झाले आहेत . भारतात हिमाचल प्रदेश व हिमालयाच्या आसपास च्याच परिसरात हे दिसत असत आता त्याची सद्य परिस्थिती व संख्या काय असावी हे ठावूक नाही . पण वन्य जीव आणि पर्यावरण ह्या बाबतीत लक्ष देणाऱ्या संस्थांनी कस्तुरी मृग हा नक्की वाचवावा व त्यांची उत्पत्ती चालू राहिली पाहिजे ह्यावर लक्ष द्यावे , नाहीतर तर ते पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टीत मर्यादित राहतील .
कस्तुरी ही एक ओळख आहे , नुसता शब्द नाही . कस्तुरी आणि सुगंध हे एकमेकांशी जोडले गेलेले शब्द आहेत , आणि ह्याचा संबंध खूप अनादी काळापासून आपल्या संस्कृतीत आढळला जातो . ह्या कस्तुरी मृगाची नोंध आणि त्याचं असणं, त्याविषयी आणखीन जाणून घेणं हे खरंच महत्वाचं आहे .
असो , शाळेत सहजच विद्यार्थ्यांना गोष्ट सांगताना आज मला कस्तुरीची अनुभूती झाली असं म्हणायला हरकत नाही . मन कसं प्रफुल्लित होवून गेलं. एखाद्या मूल्यवान वस्तूची ओळख झाली असं वाटलं . प्रसिद्धीही खरीच कस्तुरी सारखी असते का ? आणि ती पण एखाद दिवशी आपल्याला अशीच गवसेल का ? आणि ती गवसल्यावर खरंच त्या कस्तुरी मृगा सारखं होईल का ?
