जीवनाची किंमत किती ?
जीवनाची किंमत किती ?


मला आठवतं माझा महाविद्यालयातील समीर नावाचा एक मित्र होता. अगदी बिन्दास्तपणे जीवन जगणारा. त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे जगण्यात विशेष रस होता. "माय लाईफ माय रुल" हे जणू त्याच्या जीवनाचे ब्रीदवाक्य होते. अनेकदा बेफिकीरपणातून त्याला नुकसान ही सोसावे लागले होते.परंतु त्याला त्याची काहीही किंमत नव्हती. त्याच्या साऱ्या सवयी मनाप्रमाणे असल्याने तो चांगलाच स्थूलही झाला होता. एके दिवशी आमच्या अशाच गप्पा रंगल्या होत्या. समीर तिथे आला. त्याच्या हातात नवीन घड्याळ होते. दर महिन्याला त्याच्या हातात नवीनच घड्याळ दिसत असे. आम्ही सर्वानी त्याला विचारले,"काय रे अजून एक नवीन घड्याळ? "
त्यावर तो मोठ्या तोर्याने बोलला,"अरे माझ्याकडे घड्याळ टिकतच नाही. आणि मी महागडे ब्रँडेड घड्याळ वापरत नाही. त्यामुळे ते घड्याळ न टिकल्याची कसलीही खंत वाटत नाही." त्याच्या बोलण्यातून जाणवत होते की तो स्वतःच्या बेफिकीरपणाला एखादा सद्गुण असल्याप्रमाणे सांगत होता.
मी त्याला सल्ला दिला,"एकदाच ब्रँडेड घड्याळ घे. बघू किती दिवस टिकते ते...!"
माझे बोलणे त्याने मनावर घेतले. दुसऱ्याच दिवशी दोन हजार किमतीचे ब्रँडेड घड्याळ त्याने घेतले. दिलेला शब्द पडू न दिल्याने आम्ही त्याचे आणि त्याच्या घड्याळाचे मनभरून कौतुक केले.
त्यांनतर बरेच दिवस उलटून गेले. तब्बल दीड वर्षानंतर आमच्या भेटीचा योग आला. परंतु ही भेट आनंदाची नव्हती. कारण या भेटीचे स्थळ होते एक हॉस्पिटल. समीर ला लठपणामुळे हाइपर थायराइड चा त्रास असल्याने त्यावर उपचार सुरु होते. आम्ही सर्व मित्रांनी एकत्रित जाऊन त्याची भेट घेतली. समीर तसा थोडा कोमेजलेलाच वाटला. त्याचे लक्ष त्या आजारावरून विचलित व्हावे म्हणून आम्ही त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो. गप्पा सुरु असतानाच माझे लक्ष त्याच्या हाताकडे गेले. आणि मी आश्चर्याने त्याला म्हटले,"काय रे सम्या, हे घड्याळ चांगलेच टिकले की तुझ्याकडे." त्यावर तो बोलला,"का नाही टिकणार, त्याची किंमत किती महाग आहे. त्यामुळे जरा काळजीपूर्वक वापरले."
आता मात्र माझ्या डोक्यात विचारचक्रे फिरू लागली. न राहवून मी समीरला बोललो,"घड्याळ का टिकले कारण त्याची किंमत जास्त होती. त्याला तू अगदी किंमतीप्रमाणे जपले."
समीरने होकारार्थी मन डोलावली.
मी लगेच बोललो,"दोन हजाराची वस्तू एवढी जपून वापरलीस तर मग लाखमोलाच्या वस्तू कडे दुर्लक्ष का केलेस? "
समीर आणि सर्वच मित्र माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. समीरने कपाळावर आठ्या आणत विचारले,"कोणती लाखमोलाची वस्तू ?"
मी म्हणालो,"तुझं शरीर"
आता मात्र समीरचा चेहरा पडला. बेजाबदारपणाच्या दाहक वास्तवाची जणू त्याला जाणीव झाली. ओशाळलेल्या स्वरांत तो उत्तरला,"हो रे जरा चुकलंच माझं." त्याला त्याच्या वर्तनाची जाणीव झाल्याने मला जिंकल्याचा आनंद झाला. समीरचे घड्याळ टिकले होते. त्याचे घड्याळ दीड वर्षांनंतरही व्यवस्थित चालू होते. मात्र एक गोष्ट त्याने गमावली होती आणि ती म्हणजे निघून गेलेली वेळ.
आपलेही अनेकदा असेच असते. महागड्या,ब्रँडेड आणि आलिशान वस्तूना आपण जीवापाड जपतो. कारण त्याची किंमत जास्त असते. मात्र आयुष्यातील आपल्या हाती असलेल्या अनेक अमूल्य गोष्टींचे मोल आपणाला समजत नाही हेच दुर्दैव. भौतिक सुखाच्या वस्तू जपण्यात आपण इतके दंग होतो की त्याच्या नादात आयुष्यातील मौल्यवान गोष्टी गमावतो.
शरीर ही सर्वांत मोठी संपत्ती आहे हे आपल्याला समजत नाही. हे तेव्हा समजते ज्यावेळी रोग व्याधीने ग्रासलेले शरीर करोडो रुपये खर्चूनही पूर्ववत होत नाही.
गेलेल्या वेळेची किंमत तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत येणारी वेळ आपल्यावर काळ बनून येत नाही.
मित्रानो शरीर हे सर्वांत महाग असून मन हा सर्वांत मोठा ब्रँड आहे. या दोन्ही गोष्टींची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्या अमूल्य आहेत. निरोगी आणि सशक्त शरीर दीर्घायुष्याचे वरदान आहे. तर प्रसन्न आणि समाधानी मन हा आनंददायी जगण्यासाठीचा ऑक्सिजन आहे हे मात्र लक्षात ठेवा.