आता चिऊ ताई साठी दार उघड....
आता चिऊ ताई साठी दार उघड....


सायंकाळी ऑफिस चे काम आटोपून पावले घराकडे वळली. दिवसभराचा कामाचा ताण आणि थकवा आता दूर होणार होता. माझ्या ताणतणावावरचा एक रामबाण उपाय जणू मला मिळणार होता. घरी पोहोचलो आणि दाराची बेल वाजविली. बेल वाजवताच अपोआपच माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटले. चिमुकल्या पावलांनी पुढे येऊन हळुवार पणे दाराची कडी उघडली. आणि आनंदी स्वरांतील “माझे पप्पा आले” या स्वरांनी माझे स्वागत केले. समोर होती माझी अडीच वर्षाची मुलगी परी. माझ्या सर्व ताणतणावावरचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे माझी कन्या.
फ्रेश होऊन मी तिच्याशी गप्पा मारू लागलो. तिला बालगीते म्हणून दाखवू लागलो. माझ्या पाठीमागे तर कधी माझ्या स्वरांत स्वर मिसळून ती गात होती. आता बालगीते म्हटल्यावर चिऊ-काऊ तर आलेच. आता मी चिऊ ताईच्या बालगीताला सुरुवात केली.
मी म्हटले,”चिऊ ताई चिऊ ताई दार उघड”
माझ्या पाठीमागे तिचे बोबडे बोल येतील ही अपेक्षा होती. परंतु परी थोडावेळ शांत बसली आणि कुतूहलाने मला म्हणाली,”पप्पा चिऊताई कशी दिसते?”
मी अंकलिपीचे पुस्तक काढून त्यातील चिमणीचे चित्र तिला दाखविले. त्यावर ती म्हणाली,”ही नाही खरी चिमणी.”
आता मात्र माझ्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. आता परीला खरीखुरी चिमणी कशी दाखवायची याच एका विचारात मी बुडालो होतो.
तितक्यात सकाळी सकाळी आमच्या खिडकीतून पक्षी दिसतात याची मला आठवण झाली. उद्या सकाळी मी तुला चिऊताई दाखवितो असे बोलून कशीबशी मी परीची समजूत काढली. तसेच झोपण्यापूर्वी खिडकीत मुठभर धान्य ठेवले. ते धान्य खाण्यासाठी चिमणी येईल आणि मला परीला ती दाखवता येईल याची मला खात्री होती.
पहाट उजाडली सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून घरात आली. परी मात्र शांत झोपलेली होती. मी तिच्या कानाशेजारी जाऊन हळूच पुटपुटलो,”चला चिऊ ताई कोणाला पहायची आहे?”
आणि काय आश्चर्य डोळे चोळत परी ताडकन उठून बसली. इतर वेळेस उठल्याउठल्या रडणारी परी आज मात्र कुतुहलापोटी उठून बसली होती. मी तिला खिडकीपाशी घेऊन गेलो. कावळे,पारवे,कबुतरे विजेच्या तारेवर बसलेली दिसत होती. परंतु चिमणी काही दृष्टीस येत नव्हती. तासभर होऊन गेला परंतु चिमणी दिसेना. टेरेसवर नक्कीच असणार या आशेने तात्काळ परीला घेऊन टेरेसवर गेलो. बराच वेळ उलटला इतर पक्षी दिसले परंतु चिमणी नजरेस पडली नाही. निराश होऊन परीला घेऊन मी पुन्हा घरी आलो.
लहानपणी क्षणोक्षणी चिऊ चिऊ करताना दिसणारी चिऊताई जणू गायब झाली होती. काही वेळाने मी ऑफिसला पोहोचलो. गाडी पार्क करीत असतानाच पार्किंगमध्ये कानावर चिऊ चिऊ पडली. आणि ताडकन मी मागे वळून पाहिले. विजेच्या मीटरबॉक्स च्या वर मला चिमण्याचे एक घरटे दिसले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. गाडीला पुन्हा किक मारली आणि तडक घरी गेलो. परीला गाडीवर बसवले आणि थेट ऑफिसचे पार्किंग गाठले. परीला चिमणीच्या घरट्याजवळ नेले आणि तिला चिवचिव करणाऱ्या त्या दोन तीन चिमण्या दाखविल्या. परीच्या चेहऱ्यावर निखळ हास्य खुलले. तिचे हास्य माझ्यासाठी माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण बनला.
मी माझ्या कन्येला ती खरीखुरी चिमणी दाखविल्याचे समाधान मला भेटले. परंतु येणाऱ्या पिढीला ही चिमणी पाहायला मिळेल का? की गोष्टीतली चिऊताई फक्त चित्रातच दर्शन देणार? या विचारांनी मनात एकच थैमान घातले.
भारतात सर्वाधिक संख्येने असणारा पक्षी म्हणून गणली जाणारी चिऊताई दुर्मिळ होत चालली आहे. मानवाने भौतिक सुखांसाठी पर्यावरणाचा ह्रास केला. चिमणीच काय अनेक पशुपक्षी आपल्या पिढ्यांना पूर्णविराम देण्याच्या स्थितीत आहेत. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. दुष्काळाने माणसानाही प्यायला पाणी नाही, पशु पक्ष्यांचे तर कठीणच. मोबाईल टॉवर्स मधील धोकादायक किरणांनी पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
आता आपणच आपल्या भावी पिढ्यांसाठी बदल घडवायला हवा. झाडे लावायला हवीत. पर्यावरणाचे संवर्धन करायला हवे. पशु पक्ष्यांसाठी खाद्य-पाणी उपलब्ध करून द्यायला हवे. आज न उद्या ते तिथे राहायला येतील. त्यांच्या पिढ्या पुनरुज्जीवित होतील.
त्यातही काही पक्षीप्रेमी बर्ड नेस्ट्सची आयडिया अजमावत आहेत. कृत्रिम घरटी करून पक्ष्यांना निवारा देत आहेत. झाडांवर पाण्याची व खाद्याची व्यवस्था करीत आहेत. आपणही या स्तुत्य उपक्रमाचा भाग बनायला हवे.
लक्षात ठेवा “चिऊ ताई चिऊ ताई दार उघड,” म्हणता म्हणता चिऊ ताई साठी आपल्या मनाचे दार उघडायला हवे. भुर्र उडून गेलेल्या चिऊताईला परत आणायला हवे. चला निश्चय करूया आपल्या लाडक्या चिऊ ताईला नवजीवन देऊया.