एक राखी फौजीसाठी
एक राखी फौजीसाठी
रक्षाबंधन, बहिणीने भावाला राखी बांधून सदैव रक्षण करण्याचे वचन देण्याचा सण. भाव बहिणीच्या नात्यातील गोडवा आणि स्नेह जपणारा हा सण.
मला गेल्या वर्षीचा याच रक्षा बंधनचा एक प्रसंग आठवतो. रक्षाबंधन म्हटल्यावर आमच्या घरीही बहिणींची सर्व तयारीची चढाओढ लागलेली होती. आठवडाभर लाडक्या भावासाठी दुकाने पालथी घालून बहिणीने निवडलेली सर्वांत सुंदर राखी आज त्या रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी जणू सज्ज झाली होती. माझीही सर्व तयारी पूर्ण झाली होती. आणि मी निवांत मोबाईल हाती घेऊन बसलो होतो. व्हॉटस अप, फेसबुकवर शुभेच्छांचा अगदी जोरदार वर्षाव सुरु होता. पूर्वी रक्षाबंधनाच्या सणाला सकाळी सकाळी हाती राख्या शोभून दिसायच्या. परंतु आजकाल प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्याने त्यावरील इमोजी च्या राख्यांचा भाव भलताच वधारला होता. मीही त्यात रंगून गेलो होतो. सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून माझ्या काव्यरूपी शब्दांतून शुभेच्छा पाठवत होतो. हे असे चालू असतानाच माझ्या फेसबुक वॉलवर एक मेसेज आला. आधी कधीही न भेटलेला परंतु फेसबुकच्या जगात मला गवसलेला तो माझा एक फेसबुक फ्रेंड होता. कुण्या अनोळखी व्यक्तींसोबत मी सहसा फेसबुक वर जोडला जात नाही परंतु तरीही आम्ही जोडले गेलेलो होतो. आणि आम्ही जोडले जाण्याचे कारण म्हणजेच तो भारतीय सैन्यात कामावर रुजू होता आणि मला पहिल्यापासूनच सैन्याबद्दल कमालीचा आदर होता. आम्ही दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनतर चॅटिंगद्वारे आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या.
त्याने मला विचारले ,"काय मग ताईने राखी बांधली का?"
मी उत्तर दिले," नाही आता थोड्याच वेळात बांधणार आहे"
त्यावर तो बोलला," अरे वा मस्तच की !
मीही त्याला तुला राखी बांधली का ? असाच प्रश्न विचारणार तेवढ्यात माझ्या लक्षात आले की, अरे हा तर आपल्या देशाचा सैनिक. आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सीमेवर पहारा ठेवणाऱ्या सैनिकांसाठी कसला आलाय सण. परंतु घरचे आणि विविध सामाजिक संस्थांच्या राख्या जवानांसाठी सीमेवर पोस्टाने जातात याबद्दल माहित होते.
त्याला अनुसरूनच मी त्याला पुढचा प्रश्न विचारला," तुम्हाला पोस्टाने मिळत असतील ना राख्या ?
त्यावर तो बोलला," तसे निश्चित नसते परंतु जेव्हा येत असतात तेव्हा आम्ही सर्व फौजी एकमेकांकडून बांधून घेत असतो."
मी त्याला बोललो," तुला पण घरची ओढ लागत असेल ना रे ? आणि घरचेही खासकरून ताई तुझी वाट पाहत असेल ना ?
माझ्या या भावनिक शब्दांनी तो भावनिक होऊन उत्तर देईल असे मला वाटत होते परंतु त्याच्या आलेल्या उत्तराने मी आश्चर्यचकितच झालो.
तो म्हणाला," ओढ असते पण जबाबदारीचे भानही असते. त्यामुळे फारसे काही वाटत नाही. आणि राहिला प्रश्न बहिणीला वाईट वाटण्याचा, तू मला सांग राखीच्या बदल्यात भावाने बहिणीला काय द्यायचे असते ?
मी लगेच उत्तर दिले," आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याचे वचन".
तो लगेच बोलला," अगदी बरोबर, जर तिचा भाऊ राखीऐवजी हाती बंदूक घेऊन केवळ वचन न देता सीमेवर दुश्मनांशी दोन हात करून देशातील सर्व भगिनींचे रक्षण करीत असेल तर त्या बहिणीला वाईट वाटेल?
आता मात्र त्याच्या या उत्तराने मी काही काळ 'आ' वासून तो मेसेज पुन्हा पुन्हा पाहत राहिलो.
त्यानंतर आमचे बोलणे पुढे तसेच चालू राहिले परंतु त्याच्या या उत्तराने मला मात्र रक्षाबंधनाचा खरा अर्थ समजला होता. लगेच त्याला प्रत्यक्षात भेटून सॅल्यूट करावा अशी तीव्र भावना मनात येऊन गेली होती.
मनात विचारचक्रे फिरू लागली होती. रक्षाबंधनाला बहिणींना सदैव रक्षण करण्याचे वचन देणारे आपण आपल्या माताभगिनींना खरच सुरक्षित ठेवतो का ? आणि जर आपले उत्तर 'हो' असेल तर मग आपण बलात्कार,हुंडाबळी,छळ आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात का उभे राहत नाही?. का तर ती आपली सख्खी बहीण नाही म्हणून ?
कोणत्याही सणात सहभागी न होताही त्या सणाचे पावित्र्य प्रत्यक्षात आचरणात आणणाऱ्या त्या जवानांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. जर ते सीमेवर आपल्या प्राणाची पर्वा न करता परकीयांचा सामना करून आपले रक्षण करीत असतील. तर मग आपण आपल्या स्वकीयांकडून माताभगिनींच्या रक्षणाची जबाबदारी घेऊ शकत नाही का ?
आपण सर्वांनी यावर विचार करण्याची गरज आहे. ज्यादिवशी माता भगिनींबाबत घडणारे अनुचित प्रकार थांबतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रत्येक भगिनीला रक्षाबंधनाचे वचन पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. चला थोडी नजर बदलूया.
तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा