मनाचे नाही मौनाचे गुलाम व्हा
मनाचे नाही मौनाचे गुलाम व्हा


फार पूर्वी एक अजिंक्य राजा होता. ज्याने त्याकाळात अनेक लढाया जिंकल्या होत्या. त्या राजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणतीही लढाई हरला नव्हता. त्यामुळे आपण म्हणजे साक्षात ईश्वराचा अवतार असल्याचा साक्षात्कार त्याला झाला होता. राजाच्या आदेशानुसार त्या राज्यातील लोक त्याला पुजू लागले होते. दिवसेंदिवस राजाचा अहंकार वाढू लागला होता.
एके दिवशी तो राजा एका जंगलात सफारीसाठी गेला होता. जंगलात फिरत असताना त्याची नजर एका माणसावर गेली. बहुतेक त्या जंगलातच कुठेतरी राहत असावा. अंगावर मूठभर मांस नव्हते. हातभार वाढलेली दाढी, मागे कमरेपर्यंत लोंबणारे केस आणि शरीराभोवती गुंडाळलेली पळसाच्या पानांची विजार असा त्याचा अवतार. राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याची विचारपूस केली.
तो व्यक्ती सांगू लागला,"मी काही वर्षांपूर्वी घरदार सोडून इथे जंगलात निसर्गासोबत राहत आहे. "
त्यावर राजा बोलला, " मग तू तुझ्या सर्व गरज कशा पूर्ण करतो."
तो व्यक्ती सांगू लागला, "हे जंगल हे माझे जीवन आहे. येथील झाडे, वने, फळे, फुले, पाने हेच माझा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत."
राजा चिडला आणि त्याला म्हणाला, "या राज्यातील प्रत्येक गोष्ट माझी आहे. त्यामुळे माझी परवानगी न घेता तू या जंगलाचा लाभ घेऊ शकत नाही"
तो व्यक्ती हसला आणि राजाला बोलला,"राजन ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली आहे. तुम्ही आम्ही तर केवळ निमित्त आहोत. "
राजा संतापला आणि म्हणाला, "अरे मूर्ख माणसा .... तू मला ओळखले नाही . मी देवाचा अवतार आहे. आणि हे सर्व माझे आहे" असे म्हणतच राजाने आपली तलवार काढली आणि त्या माणसाच्या मानेवर ठेवली.
राजा त्याला म्हणाला, "चल मला शरण ये आणि माझ्याबरोबर राज्यात चल. तुला माफ करतो आणि माझी गुलामी करण्याची संधी देतो."
यावर तो माणूस हसला आणि म्हणाला ,"जो स्वतः गुलाम आहे तो मला काय गुलाम बनविणार "
आता राजा रागाने लालबुंद झाला त्याला रागाने ओढत म्हणाला,"या अजिंक्य राजाला तू गुलाम कसा काय म्हणतोस?"
त्यावर तो व्यक्ती शांतपणे बोलला ,"राजन तुम्ही भले जगावर विजय मिळवला असेल पण तुम्ही स्वतः मात्र तुमच्या क्रोधापुढे हरला आहात. आणि तुमच्या अहंकाराने तुम्हाला त्याचे गुलाम केले आहे."
आता मात्र राजा शांत झाला. एका जंगलातील भटक्या माणसाने त्याला त्याची जागा दाखविली होती.
आपण आपल्या मनाचे मालक व्हायला हवे, नोकर नाही. मन एक अश्वरथाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे अश्वरथात पुढे काही घोडे बांधलेले असतात जे त्या रथाची गती-अधोगती ठरवीत असतात. अगदी त्याचप्रमाणे मानवी मनाचा विचार केल्यास. मनाभोवती क्रोध, मोह, मत्सर, माया, स्वार्थ, अहंकार, वासना आणि हिंसा यासारख्या भावना असतात. मात्र त्यांचा लगाम आपल्या हाती असायला हवा. त्यावर वेळीच लगाम घालून आपल्याला आपल्या मनावर विजय मिळविता यायला हवा.