ये है हिंदोस्तां हमारा...
ये है हिंदोस्तां हमारा...
गेल्या महिन्यातील प्रसंग. त्यादिवशी रमजान ईदचा उत्सव होता. सर्व मुस्लिम बांधव मशिदीत नमाज अदा करून एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देत होते. रहीमचाचा नामक एक ४०-४५ वर्षांचे गृहस्थ सकाळच्या प्रहरी नमाज अदा करायला ईदगाहमध्ये निघाले होते. डोक्यावर धार्मिक टोपी, वाढवलेली दाढी आणि नवा कोरा चकचकीत सुलतानी कुर्ता परिधान केलेला होता. सोबत त्यांची दोन लहान मुले होती. ईदच्या सणाचा उत्साह सर्वांच्याच चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. ईदगाहला पोहोचून नमाज अदा करण्यासाठी ते लगबगीने दुचाकीवर निघाले. दुचाकीवर एक मुलगा पुढे तर एकजण रहीमचाचांना बिलगून मागे बसला होता. रस्त्यात जाताना बाप-लेकांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. नमाज अदा केल्यांनतर दिवसभरात काय काय धमाल करायची याबाबत मुले रहीमचाचांशी संवाद करीत होती. रहीमचाचाही त्यांना समाधानकारक उत्तरे देऊन सणाच्या उत्साहाला चार चांद लावित होते.
रहीमचाचांची गाडी आता थोड्या वेगाने पुढे निघाली होती. मित्रपरिवार तसेच समाजबांधवांशी भेट चुकू नये म्हणून कदाचित लगबग असावी. पुढे काही अंतरावर जाताच एक अचानक टर्न आला. गाडीचा वेग कमी करण्याच्या गडबडीत हॉर्न वाजविणे राहूनच गेले. आणि त्याच टर्नला एका तरुणाची गाडी भरधाव वेगाने येत होती. दोघेही समोरासमोर आले. दोघांनीही करकचून ब्रेक दाबत गाडी धडकण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्हीही गाडयांना धक्का लागून त्या थोड्या एका बाजूला कलल्या. दोघांनीही आपापल्या पायावर जोर देऊन गाडी पडण्यापासून गाडीला रोखले.
रहीम चाचा आणि त्यांची मुले या प्रकाराने पुरतीच भांबावली होती. समोरून आलेला तरुणही काहीसा क्रोधीत झाला होता. त्या तरुणाच्या गाडीवर "राजे" असे भगव्या अक्षरात लिहिलेले होते. रहीमचाचांकडे पाहून तो तरुण दबक्या आवाजात बोलला, "ओ दिसत नाही नाही का?"
मृदू स्वभावाचे रहीम चाचा बोलले, "बेटा गलती हो गयी, अचानक से स्पीड को रोकने मे नाकामयाब रहा..."
तो तरुण रहीमचाचांना म्हणाला, "चला गाडी बाजूला लावा..."
आता मात्र रहीमचाचा आणि त्यांची मुले पुरतीच भेदरली होती. रहीमचाचांना घाम फुटला होता. मुलांचाही भीतीने थरकाप उडाला होता. आजूबाजूला जमलेल्या बघ्यांना आता भांडण पाहण्याची आयती मेजवानी जणू मिळणार होती.
तो तरुण रहीमचाचांच्या जवळ गेला. रहीमचाचांनी लगेच माफीसाठी हात जोडले. चाचांचा हात लटलट कापू लागला होता. मुलेही प्रचंड घाबरून गेली होती.
तेवढ्यात त्या तरुणाने चाचांचे जोडलेले हात बाजूला केले. आणि एका हाताने त्यांना हॅन्डशेक करीत म्हटले, "तुम्हाला ईद मुबारक..."
रहीमचाचांचे डोळे पाणावले. मुलांच्या चेहऱ्यावर गगनात मावेनासा आनंद दिसू लागला. चाचांनी त्याच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार केला. पुढे तो तरुण दुचाकीवरून मार्गस्थ झाला. चाचा आणि आजूबाजूचे बघेही अवाक झाले होते. चाचा दुचाकीवरून पुढे चालू लागले. त्यांच्या मुलाने त्यांना विचारले, "अब्बा हम मुसलमान और वो हिंदू थे, फिर भी ये कैसे हुआ?"
त्यावर स्मितहास्य करीत आणि अभिमानाने चाचा म्हणाले, "बेटा यही तो है हमारा हिंदुस्तां..."
धर्मनिपेक्षता काय असते हे पुस्तकापेक्षा त्या घटनेने त्या मुलांना शिकविले होते. एकमेकांच्या धर्माचा, भावनांचा आणि माणुसकीचा आदर त्यांना पाहायला मिळाला.
आज भारताचे विश्वात एक धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव असणारे राष्ट्र म्हणून अस्तित्व आहे. सर्व धर्मांबाबत समान आदर समान प्रतिष्ठा इथे जोपासली जाते. सर्वाना सामान हक्क, कायदे, अधिकार आणि कर्तव्ये ठरवून दिलेली आहेत. आणि याचे काटेकोर पालनही जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीत केले जाते.