एक नंबरच....!
एक नंबरच....!


जय आणि पार्थ हे दोघेही इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होते. दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. शाळेतील प्रत्येक उपक्रमात दोघेही अगदी हिरीरीने भाग घेत असत. दरवर्षीप्रमाणे शाळेने वार्षिक क्रीडास्पर्धांचे आयोजन केलेले होते. सर्व इयत्ता आणि तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने त्यात सहभाग घेतला होता. जय आणि पार्थ त्यात कसे मागे राहतील? त्यांनीही लिंबू-चमचा या खेळाच्या प्रकारात भाग घेतला होता. पहिल्या दोन्ही फेरींत पात्र ठरून दोघेही अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. अंतिम फेरीसाठी एकूण १८ मुले निवडली गेली होती. अंतिम फेरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी पालकांसह हजर राहण्यास सांगितले होते.
ठरल्याप्रमाणे सर्व चिमुकले स्पर्धक दुसऱ्या दिवशी आपल्या पालकांसह मैदानात हजर झाले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी केलेल्या गर्दीमुळे मैदान भरगच्च भरले होते. स्पर्धेला सुरुवात झाली दातांत चमचा घट्ट पकडून आणि चमच्याच्या पुढील खोलगट भागात लिंबू ठेवून सर्व सज्ज झाले. शिक्षकांनी शिट्टी वाजवताच सीमारेषेच्या दिशेने सर्व चालू लागले. तोल सावरत संयम राखत पावले तुरुतुरु चालली होती. शाळेतील त्यांचे मित्र मोठमोठ्याने चिअर करून त्यांना प्रोत्साहन देत होते. पालकही आपल्या मुलांना तोल राखण्याचे आवाहन करीत त्यांचा आत्मविश्वास वाढवीत होते.
जिंकण्याच्या आशेने आणि आजूबाजूच्या स्पर्धकांच्या दडपणाखाली जो तो आपापल्या परीने उत्तमपणे खेळ खेळत होता.
काही अंतरावर जाताच तोल सावरता न आल्याने अनेक मुलांचे लिंबू जमिनीवर पडले आणि ते बाद ठरले. मुले बाद ठरल्याने पालकांनाही निराशा लपविता आली नाही.
मात्र, उर्वरित स्पर्धकांमुळे स्पर्धेत अद्यापही रंगत होतीच. जय आणि पार्थ हे दोघेही त्या स्पर्धेत उत्तमप्रकारे टिकून होते. काही वेळाने स्पर्धेत जय, पार्थ आणि त्यांच्या वर्गातील नील हा मुलगा असे तिघेच उरले होते. तिघांचेही पालक मोठमोठ्याने ओरडून मुलांना मार्गदर्शन करत होते.
तिघेही सीमारेषेच्या अगदी जवळ होते. स्वतःचा तोल सावरून, नियंत्रण ठेवत पुढे वाटचाल करीत होते. तिघांपैकी प्रत्येकाला प्रथम, द्वितीय किंवा तृतीय पारितोषिक हे मिळणारच होते. परंतु, चढाओढ होती ती प्रथम कोण येणार त्याची. जसजसे ते तिघे सीमारेषेच्या जवळ आले होते तसतसा पालकांचा आवाजही वाढला होता. आणि अखेरीस निकाल लागला. नीलने प्रथम क्रमांक पटकावला. तर त्यानंतर काही सेकंदाच्या फरकाने पार्थ द्वितीय तर जय तृतीय आला. जय आणि पार्थला पहिला क्रमांक गेल्याची खंत लपविता आली नाही. पार्थ आणि जयचे बाबा आपल्या मुलांच्या दिशेने निघाले. पार्थजवळ जाताच त्याच्या बाबांनी त्याला ओरडायला सुरुवात केली, "अक्कल नाही का थोडे नियंत्रण ठेवून भराभरा चालायचे ना?" पार्थ हिरमुसला. आता जयसुद्धा बाबा ओरडणार म्हणून घाबरला. जयचे बाबा त्याच्या जवळ आले त्यांनी त्याला उचलून घेतले आणि म्हणाले, "वेल डन जय, बाळा खूप छान खेळलास, तुझे अभिनंदन आणि तुझे गिफ्टही आता पक्के..."
पार्थच्या बाबांनी हा प्रकार पाहून जयच्या बाबांना विचारले, "अहो जयचा तर तिसरा क्रमांक आला आहे तरी तुम्ही त्याला गिफ्ट देणार?"
त्यावर हसत जयचे बाबा हसत त्यांना म्हणाले, "एकूण स्पर्धक किती होते.?"
पार्थचे बाबा बोलले, "एकूण १८ होते."
जयचे बाबा म्हणाले, "त्या १८ पैकी जयच्या मागे १५ होते. आणि तो त्या १५ जणांत तर पहिला आला ना. आणि राहिला पहिल्या क्रमांकाचा विषय तर जय पुढच्या वेळेस नक्कीच पहिला येणार. हो ना जय?"
जयने आनंदाने होकारार्थी मन डोलावली आणि आपल्या बाबांना कडकडून मिठी मारली. पार्थच्या बाबांना मात्र आता आपली चूक समजली होती.
हा प्रसंग आज प्रत्येक पालकांसाठी खूप मोठा संदेश देणारा आहे. आपल्याला आपल्या मुलांना प्रोत्साहन देता आले पाहिजे. शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देऊन त्याचा आत्मविश्वास द्विगुणित करता आला पाहिजे. मुलांना ओरडल्याने, चिडल्याने दडपणाखाली कोणतीही गोष्ट ते मनापासून आणि उत्तमप्रकारे करू शकत नाहीत.