Sagar Nanaware

Others

5.0  

Sagar Nanaware

Others

जगण्याचा आनंद घ्या

जगण्याचा आनंद घ्या

3 mins
907पुण्यातील एका उच्चभ्रू वस्तीत गणेश आणि रीना नामक दाम्पत्य राहत होते. त्यांना दोन मुले होती. गणेश एका खासगी कंपनीत कामास होता. रीना आपली गृहिणी म्हणून असणारी जबाबदारी अत्यंत इथंभूतपणे पार पाडत होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानन्तर मुलांच्या शाळा नुकत्याच झाल्या होत्या. सकाळी पहाटे उठून रिनाने सर्व कामे आटोपली होती. गणेश आणि त्यांची दोन्ही मुलेही आवरून सावरून तयार झाली होती. सकाळचा नाश्ता उरकून गणेश ऑफिसला जाण्याच्या बेतात होता. नेहमीप्रमाणे दोन्ही मुलांना तो जाताना शाळेत सोडविणार होता. तिघांनीही रिनाचा निरोप घेत घर सोडले. रीना दिवसभराच्या कामाच्या जबाबदाऱ्या पाहण्यासाठी सज्ज झाली. गणेश आणि रिनाचा अगदी सुखाचा संसार चालला होता. दोन दिवसांनी ते लग्नाचा १० वा वाढदिवसही साजरा करणार होते.

गणेश त्याच्या ऑफिस ला पोहोचला. आणि पोहचताच क्षणी त्याचा मित्र सचिन त्याला म्हणाला," काय मग गणेश परवा तुमच्या लग्नाचा ना ? मग काय नियोजन केले आहे? "

हताश मुद्रेने गणेश उच्चारला,"काय करणार कामाचा लोड आहे. त्यामुळे सुट्टी मिळणार नाही"

त्यावर लगेच सचिन बोलला,"काळजी करू नको मी बॉस शी बोललो आहे. आणि त्यांनी तुला परवा ची सुट्टी मंजूर केली आहे. आणि हो आम्ही तुम्हा दोघांसाठी महाबळेश्वरचे एका दिवसांचे पॅकेजही बुक केले आहे. "

गणेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. कधी एकदाचे घरी जाऊन सांगतो असे त्याला झाले. त्याने सचिनचे मनापासून आभार मानले. सायंकाळी मोठ्या आनंदाने गणेश घरी परतला आणि पोहोचताच पर्त्नी रीनाला ती बातमी सांगितली. परंतु गणेशला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. पण मग दिवसभर मुलांचे कोण पाहणार? त्यांना शाळेतून कोण आणणार ? उशीर झाल्यास त्यांच्या जेवणाचे काय? अशा एक ना अनेक चिंता व्यक्त केल्याने गणेशचा जरा हिरमोड झाला. परंतु लवकर परत येण्याच्या शर्थीवर आणि शेजारच्या काकूंनी मुलांची घेतलेली जबाबदारी यावर बेत निश्चित झाला.

अखेर तो दिवस उजाडला दोघांनीही पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने प्रयाण केले. रीनाला मुलांची वाटणारी काळजी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. दोघे महाबळेश्वरला पोहोचले. विविध ठिकाणांची भटकती सुरु झाली. गणेश प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होता. परंतु रीना आलबेल नसल्याप्रमाणे थोडीशी खिन्न होती. उपहारासाठी दोघेही एका उपहारगृहात थांबले. रीनाच्या मनाची चलबिचल पाहून गणेशला तिला विचारले,”रीना तुला इकडे येणे आवडले नाही का?

त्यावर रीना बोलली,”नाही हो तसे काही नाही....मुलांची काळजी वाटते थोडी”

त्यावर गणेश बोलला,”अगं शेजारच्या काकू नेहमीच मुलांना छान सांभाळतात की, मग काळजी का? हवं तर फोनवर विचारपूस कर. आपण निघू लवकरच.”

त्यावर रीना उत्तरली,”अहो मला आजचा हा दिवस आनंदाने तुमच्यासोबत साजरा करायचा आहे पण मला मुलांचीही काळजी वाटते?”

त्यावर गणेश म्हणाला,”तू दोन्ही गोष्टी अशा एकत्र आणल्या तर एकही गोष्टीचा आनंद घेता येणार नाही.”

त्यावर हळव्या स्वरात रीना बोलली,”पण मी दोन्ही बाजूंचा विचार करते ना.”

गणेश काहीही बोलला नाही. गणेशने स्वतःसाठी ज्यूस तर रिनाने चहा मागवला. गणेशने जूस पिण्यास सुरुवात केली. रिनाने गरमागरम चहाचा पहिलाच घोट घेतला आणि म्हणाली,” अहो चहा मस्त आहे, तुम्हालाही अजून एक मागवायचा काय?”

गणेश बोलला,”अगं नको, तुझ्याच कपातील थोडा मला दे.”

असे म्हणून गणेशने ज्यूसने अर्धा भरलेला ग्लास चहासाठी रीनापुढे केला.

त्यावर रीना आश्चर्याने उद्गारली,”अहो त्या ज्यूसच्या पात्रात चहा कसे घेणार. ज्यूस पिऊन आधी तो ग्लास रिकामा करा.”

गणेश बोलला,”असू दे ना...दे यामध्येच”

रीना थोडीशी वैतागून बोलली,”अहो एकाच पात्रात दोन भिन्न चवीच्या गोष्टी कशा बसतील? तुम्ही ज्युसचा ग्लास रिकामा करा मगच मी चहा देते”

त्यावर गणेश शांतपणे रीनाला बोलला,”मी पण तर तुला हेच सांगतोय ना. एकाचवेळी चिंता आणि आनंद मनात असल्याने काय साध्य होईल. त्यापेक्षा तू चिंतेतून मन रिकामे कर आणि या क्षणांचा आनंद घे.”

आता मात्र रीनाची ट्यूब पेटली. फोनवर मुलांची विचारपूस करून नंतर भटकंतीच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेयास ती सज्ज झाली.

मित्रांनो आपलेही बरेचदा असेच होते. आनंदी क्षणांना आपलेसे करताना चिंता, काळजी, हुरहूर अशा अनेक गोष्टींनाही आपण जवळ करतो. परिणामी त्या अविस्मरणीयव व आनंददायक क्षणांना आपण गमावून बसत असतो. आनंदाची उधळण करताना मनात कोणताही चिंतेचा भाव नको. आनंदाची,सुखाची आणि आल्हाददायी क्षणांची लयलूट आपल्याला करता आली पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे परंतु त्या सुंदर आयुष्यातील सुंदरता आपल्याला जपता आली पाहिजे. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि सुखी समाधानी जीवन जगा.


Rate this content
Log in