तिचा स्वातंत्र्यदिन
तिचा स्वातंत्र्यदिन


स्वातंत्र्यदिन म्हणजे प्रत्येक देशवासियाच्या अभिमानाचा दिवस. भारतातील थोर क्रांतिकारकांच्या अथक संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्याची सोनेरी पहाट पाहता आली. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली परंतु प्रत्येकजण खरंच स्वतंत्र आहे का हे मोठे प्रश्नचिन्ह आहे.
गेल्यावर्षी स्वातंत्र्यदिनी एका मराठी शाळेत ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून जाण्याचा योग आला होता. सकाळचे रम्य वातावरण, स्वच्छ इस्त्री केलेले गणवेश परिधान करून हातात तिरंगा घेतलेली मुले-मुली, मुला-मुलींबरोबरच पांढऱ्याशुभ्र पोशाखातील शिक्षकवृंद आणि लाऊड स्पीकरवर वाजणारी देशभक्तीपर गाणी असा आनंदमय माहोल होता. मुलांची प्रभातफेरी झाल्यानंतर सर्व मुले एका रांगेत शिस्तबद्ध उभी होती. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या लहान मुलगा आणि मुलीसोबत कार्यक्रमाला हजेरी लावली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. आणि यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांच्या भाषणाला सुरुवात झाली.
भाषणात प्रमुख पाहुण्यांनी ठरल्याप्रमाणे, "स्वातंत्र्य हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि तो आपल्याला मिळालाच पाहिजे, गुलामीतून प्रत्येकाची सुटका झाली पाहिजे." वगैरे बोलण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात भाषणानंतर लहान मुला-मुलींच्या नृत्य नाट्य, कलाविष्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शिक्षकांनी सर्व बालचमूंसाठी सामूहिक नृत्याचे आवाहन केले. गाण्याच्या तालावर ठेका धरत अनेक बालके त्यात सहभागी होऊन नाचू लागली. आम्ही सर्व मान्यवर टाळ्या वाजवून त्यांचे मनोबल वाढवीत होतो तर बरेच मोबाईलप्रेमी हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते.
माझ्या शेजारीच बसलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या पाच वर्षांच्या मुलीने तिच्या बाबांचा मोबाईल हाती घेऊन फोटो काढण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तिच्या छोट्या भावाने मोबाईलसाठी हट्ट धरला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणाऱ्या तिच्या बाबांनी कशाचाही विचार न करता तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन तो आपल्या चिरंजीवांच्या हाती दिला. आता ती छोटी मुलगी रडू लागली तेव्हा तिच्या बाबांनी तिला ओरडून, डोळे मोठे करून शांत बसण्यास सांगितले. ती मुलगी दबक्या स्वरात हुंदके देऊन निमूटपणे रडू लागली तर दुसरीकडे तो मुलगा मात्र हसत मोबाईलशी खेळू लागला.
हे सारे पाहून माझे मन खिन्न झाले. स्वातंत्र्यदिनावर भाषणबाजी करणाऱ्या त्या प्रमुख पाहुण्यांनाच स्वातंत्र्याची खरी व्याख्या कळलेली नव्हती. जिथे आज मुलगा आणि मुलगी यात काही अंतर ठेवलं जात नाही, तिथे मुलींवरच सारी बंधनं लादली जातात हेच का आपले स्वातंत्र्य? आज आपण सारे वंश, वर्ण, लिंग, जात, धर्म आणि गरिबी- श्रीमंतीच्या मानसिक गुलामीत जगत आहे आणि स्वतःला स्वतंत्र म्हणत आहे हेच मोठे दुर्दैव.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु देशातील प्रत्येक नागरिक पूर्णपणे स्वतंत्र आहे का? याचे उत्तर नक्कीच नाही, असे येईल. अजूनही आपण मानसिक गुलामगिरीतच जगत आहोत. आपल्या समाजाने पिढ्यान्पिढ्या घालून ठेवलेली काही बंधनं, मर्यादा यांना कंटाळून आणि त्यांना तोडून आपल्यांनाच आपल्याशीच बंडखोरी करावी लागते हेच खरे, स्वातंत्र्य म्हणावे लागेल. मुले पालकांच्या अवास्तव अपेक्षांच्या गुलामगिरीत, नोकरवर्ग श्रीमंतांच्या गुलामगिरीत, स्त्रिया परंपरांच्या गुलामगिरीत आणि अबाल वृद्ध मुलांच्या जाचक गुलामगिरीत आहेत.
ज्याप्रमाणे स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांशी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले तसाच लढा आपल्यालाही द्यावा लागणार आहे एक लढा स्वतःचा स्वतःशीच. आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मात करून आपल्याला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे .मानसिक गुलामगिरीच्या जोखंडातून आपली सुटका करून चांगले आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य मिळवणे शेवटी आपल्याच हातात आहे.