इण्डियन फ़िल्म्स 1.5
इण्डियन फ़िल्म्स 1.5


लेखक : सिर्गेइ पिरिल्याएव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
इण्डियन फ़िल्म्ससारखीच नास्त्यादेखील बघताक्षणीच आवडली. सुरुवातीला आमचे खूप छान चालले होते, पण मग (ते पण, कदाचित बघतांक्षणीच) नास्त्याला जुनी हिन्दी फिल्म ‘मेरा नाम जोकर’ आवडली नाही आणि आम्हीं वेगळे झालो.
हे सगळं असं झालं.
नास्त्या माझ्या घरी आली, आम्हीं कॉफी प्यायलो आणि मी म्हटलं, चल, एखादी फिल्म बघू या. जशी, ‘मेरा नाम जोकर’.
“चल, बघू या,” नास्त्या म्हणाली.
मी कैसेट लावली आणि स्क्रीनवर दिसलं : ‘राज कपूर फिल्म्स प्रेझेन्ट्स’. माझ्या डोळ्यांत एकदम पाणी आलं आणि सर्कसच्या अरेनांत रंगीबेरंगी रिबन्सच्या, फुग्यांच्या कल्होळात जोकरची ड्रेस घातलेला राजकपूर आला. लगेच त्याच्याजवळ पांढरे एप्रन्स घातलेले बरेच लोक धावत-धावत आले. प्रत्येकाच्या हातांत कातरी होती.
“तुमच्या हार्टचं ऑपरेशन करावं लागणारेय,” ते म्हणाले.
“कां?” राज कपूरने विचारलं.
“कारण की तुमचं हार्ट खूप मोट्ठं आहे, एवढ मोठं हार्ट घेऊन जगणं खूपच धोक्याचं आहे,” ते म्हणाले. “कारण की येवढं मोट्ठं हार्ट जगांत कोणाचेच नाहीये! जरा विचार करा, जर तुमच्या हार्टमधे सगळं जग सामावून जाईल, तर काय होईल?!”
आणि राजकपूर गाणं म्हणूं लागला. मी हे सुद्धा विसरून गेलो की माझ्या शेजारी नास्त्या बसलीये. माझ्या मनांत इतकी खळबळ माजली होती की माझे दात घट्ट मिटले होते, आणि मी उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट इतके घट्ट धरले होते की ते दुखायला लागले होते.
सुरूवातीचा जवळ-जवळ अर्धा तास नास्त्या शांतपणाने बघत होती. मग ती हसायला लागली. राजकपूरची मम्मा मरते आहे, त्याच संध्याकाळी तो अरेनांत येतो आणि मुलांना हसवतो, आणि ‘शो’ झाल्यावर काळा चष्मा लावतो, ज्याने कोणाला त्याचे अश्रू नाही दिसणार...आणि ही नास्त्या हसतेय!
“ओय, चश्मा कसा आहे त्याचा – एकदम सुपर!” ती म्हणते.
“नास्त्या,” मी मिटलेल्या दातांमधून तळमळतो, “ही फिल्म सन् सत्तरची आहे!”
पण नास्त्याला त्याने काही फरक पडंत नव्हता की फिल्म कोणत्या सालाची आहे. जेव्हां राजकपूरने आपल्या समोर जुन्या चिंध्यांचा बनवलेला जोकर-बाहुला ठेवला आणि स्कूल टीचरशी झालेल्या आपल्या पहिल्या-वहिल्या असफल प्रेमाबद्दल सांगू लागला, तेव्हां मला नास्त्याकडे बघायचीसुद्धां भीती वाटूं लागली. मला फक्त येवढंच ऐकू येत होतं की ती अति प्रयत्नाने आपलं हसू आवरतेय.
जवळ-जवळ वीस मिनिटं अत्यंत तणावाखाली आम्ही फिल्म बघंत होतो. नास्त्याने आपले गाल हातांत धरले होते, आणि स्क्रीनकडे न बघण्याचा प्रयत्न करंत होती. मला मात्र वाटंत होतं की माझ्यांत इतक्या प्रचंड शक्तिचा संचार झाला आहे की मी नुसत्या नज़रेने सूर्याला नेहमीसाठी विझवून टाकेन. राज कपूर समुद्राच्या काठावर एका कुत्र्याला कुरवाळंत होता.
“सिर्योग, फिल्म बरांच वेळ चालणारेय कां?” शेवटी नास्त्याने विचारलेच.
जणु मला चिडवण्यासाठीच रिमोट कुठेतरी निसटला होता. मी त्याला धुंडलं, कैसेट थांबवली, वीडियो-प्लेयरमधून बाहेर काढली, परत डब्यांत ठेवली आणि डब्यावरून नज़र न हलवातां हळू-हळू म्हटलं:
“सोवियत बॉक्स-ऑफ़िसमधे ही फिल्म दोन तासांपेक्षा थोडीशी जास्त होती. पण, माझ्याकडे – पूर्ण , ओरिजिनल फ़िल्म आहे. तीन तास आणि चाळीस मिनिटांची.”
“कठीण काम आहे,” नास्त्या म्हणाली.
“कठीण,” मी म्हटलं आणि टेबलवार ताल देऊं लागलो.
“सिर्योग,” नास्त्याने भुवया उंचावल्या, “तुला हे सगळं फ़नी नाही वाटत? बघ, कसा आहे तो, बुढ्ढ्या खुंटासारखा, पण चालला आहे, चालला आहे, स्वतःसाठी मुलगी शोधतोय! आणि जेव्हां सगळे त्याला काढून टाकतात, तेव्हां बसल्या-बसल्या आपल्या बाहुल्याजवंळ फिर्याद करतो!”
“नाही,” मी म्हटलं, “मला ह्यांत काहीच फनी वाटत नाही.”
“ नुसतं पांचट!” नास्त्याने म्हटले. “चल, त्यापेक्षां, मी काही म्यूजिकच लावते.”
मी टेबलवरून लाइटर उचलला, क्लिक केला आणि त्याच्या ज्वाळेकडे पहात राहिलो.
“म्यूज़िक तर तुला केव्हांही ऐकता येईल, पण ‘मेरा नाम जोकर” ही फिल्म तुला जगातला कोणतांच तरूण नाही दाखवणार.”
“थैन्क्स गॉड,” नास्त्या खुद्कन हसली.
त्यानंतर आम्ही कधीच नाही भेटलो.
जाता-जातां नास्त्याने ठामपणे सांगितले की पहिले मी तिला फोन केला पाहिजे. पण मी फोन नाही केला. काही दिवसांपूर्वी मला आन्या भेटली. मी तिला ‘मेरा नाम जोकर’ नाही दाखवणार, तिला मी ‘श्री 420’ दाखवेन, त्यात राजकपूर खूप तरूण आहे आणि त्यातले गाणे पण मस्त आहेत.