बोलकी झाडं.
बोलकी झाडं.


नालासोपारा शहराच्या पश्चिम दिशेला अगदी आत गेल्यावर मंग्याला अनेक झाडे एकमेकांशी बोलताना दिसली. मंग्या म्हणजे मंगेश आदिवाडे. नेहमी सुट्टीच्या दिवशी आपल्या बाबां बरोबर त्याला समुद्र किनारी जाऊन समुद्राच्या लाटांवर मौज करायला किंवा रेतीमध्ये गड किल्ले बनवायला फार आवडत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज तो खूप दिवसांनी समुद्रावर जात होता. विजयरावही आपल्या एकुलत्या एक मुलाचे सारे हट्ट अगदी न चुकता पुरवायचे. मंग्या अभ्यासात हुशार आणि शाळेत सर्व गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता. 'बाळांनो'! 'तो कमालीचा स्वावलंबी होता बरं का!' आपली सारी कामे तो स्वतःच करायचा. रोज शाळेत जायचा. आईला तिच्या कामात मदत करायचा आणि न-चुकता आपला अभ्यास करायचा. त्याचे निसर्गावर खूप प्रेम होते. नेहमी त्याला जंगलात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडत असे.
आज खूप दिवसांनी तो आपल्या मित्रांना भेटणार होता. त्याचे मित्र म्हणजे समुद्र आणि भवतालची झाडे. सकाळी गेला की अगदी दिवसभर तो समुद्रकिनारीच रमून जायचा. पण आज त्याला नालासोपारा पश्चिमेकडील सारंच वातावरण वेगळं दिसत होतं. मंग्याचे बाबा स्कुटर चालवण्यात दंग होते. पण मंग्याला काहीतरी खटकत होते. रस्त्याच्या दुतर्फा रोज दिसणारी वर्दळ आज शांत शांत होती. जणू काही वाईट घटना घडली असावी. 'खरं सांगू मित्रांनो', मंग्याला ते सारं सुन्न सुन्न वातवरण पाहून जाम भीती वाटत होती! पण, तरीही नक्की घडलंय काय हे पहाण्याचे कुतूहल सुद्धा मनात होते. म्हणून तो निमूटपणे सारं पाहत पाहत पुढे जात होता. काही अंतर पुढे गेल्यावर पाहतो तर ठिकठिकाणी माणसं झोपलेली दिसली. कुणी घराच्या बाहेर तर कुणी रस्त्यावर, कुणी झाडाखाली तर कुणी घरात. असं काय झालं असेल ? हाच एक प्रश्न मंग्याला सारखा सतावत होता. घाबरत घाबरत त्याने आपल्या बाबांना आवाज दिला, "बाबा ही सारी माणसं अशी का झोपलेत कुठेही?" "काहीच कळत नाही बाबा. हे भयंकरच आहे काहीतरी!" बाबांनी उत्तर दिले.
गावात आणि रस्त्यावर सारीच माणसं मृतावस्थेत पडलेली दिसत होती आणि एकही चालता बोलता माणूस दिसत नव्हता. सारीकडे शुकशुकाट पसरला होता. मनातून मंग्या आणि त्याचे बाबा आता खूप घाबरले होते. एवढ्यात त्यांना कुठूनसा काहीतरी बोलण्याचा आवाज आला. ते ऐकून त्यांनी हळूच गाडी थांबवली आणि शांत उभे राहिले. रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडांची भली मोठी गर्दी होती. पूर्वी भली मोठी उंच उंच झाडं पाहून मन कसं प्रसन्न व्हायचं मंग्याचं, पण आज त्याच झाडांची त्याला भीती वाटल्यासारखे जाणवत होते. पुढे काही वेळाने येणारी कुजबुज स्पष्टपणे दोघांच्याही कानावर पडू लागली. "बरं झालं आपण प्राणवायू सोडणं बंद केलं. नाहीतर या मूर्ख माणसांनी आज आपल्याला नाहीसच करून टाकलं असतं." "अगदी खरं! स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या मानेवर कुऱ्हाड चालवणाऱ्या माणसाला हे असं कळत नाही की, वातावरणातील विषारी कार्बन डाय ऑस्काइड आम्हीच शोषून घेतो आणि सजीवांसाठी लागणारा जीवनावश्यक प्राणवायू आम्हीच बाहेर सोडतो. पूर्वी आपल्यापासून अनेक फायदे करून घेणारा माणूस बदललाय रे आता, या आधी आवडीने आपली लागवड करणारा माणूस आता स्वार्थासाठी आपल्या जीवावर उठला आहे. आपल्या जमातीचे जंगलच्या जंगल याने नष्ट करून टाकलेत हल्ली. आता खूप झालं! या माणसंच मुळीच चालून द्यायचं नाही आपण!" हे सारं काही झाडं एकमेकांशी बोलत होती आणि इतर सारी झाडं त्यांचं बोलणं ऐकत होती हे मंग्यानं गुपचूप पाहिलं होतं. चक्क झाडं बोलत आहेत याचं मंग्याला फार नवल वाटलं. एवढ्यात एक भले मोठे झाड पुन्हा जोराने, कदाचित रागानेच बोलले. "ही तर सुरुवात आहे, यापुढे आपल्या वाट्याला जे कुणी जातील त्यांचीही हालत हीच होईल, या मूर्ख माणसांना आता धडा शिकवलाच पाहिजे!" त्याचे बोलणे ऐकून मंग्या अजूनच घाबरला. नाही नाही ते विचार त्याच्या मनात येऊ लागले. जर या झाडांनी इतर ठिकाणच्या झाडांची ही मने वळवून त्यांनाही प्राणवायु सोडण्यास बंद करायला सांगितले तर सगळीकडची माणसं मरून जातील आणि सारी पृथ्वी मनुष्यहीन होऊन जाईल. या धास्तीने मंग्या खूप घाबरला.
त्या दिवशी भितीने घामाघूम झालेला मंग्या, "मी झाडे लावणार...मी झाडांवर प्रेम करतो... मी माझ्या मित्रांनाही झाडे लावायला सांगणार..." असे मोठमोठ्याने बडबडत उठला. कारण त्याने हे भयंकर स्वप्न बघितले होते. आपला मुलगा स्वप्नात दचकलेला दिसतोय, हे पाहून अंजनाबाई धावत मंग्याच्या बेडजवळ गेल्या. "काय झालं बाळा? काही स्वप्न पाहिलंस का?" आईने विचारले. मंग्याने आपल्या आईला स्वप्नात बघितलेलं सारं सांगून टाकलं. ते विजयरावांनी ही ऐकलं आणि तेही आपल्या बाळा जवळ जाऊन बसले. मंग्याच्या डोक्यावरून हात फिरवीत विजयराव म्हणाले, "चल मग कधी लावूया झाडे?" आपण तिघांनीही मिळून पाच पाच झाडे लावूया व त्यांना वाढवून मोठी करूया, आहेस का तैयार मंग्या?" बाबांचे बोलणे ऐकून मंग्या खुश झाला आणि ताड्कन उठला. बाळांनो! आज मंग्याच्या घराभोवती पंधरा भली मोठी झाडे दिमाखदार डौलाने उभी आहेत, मंग्याच्या घरातील सदस्य बनून.
मंग्याच्या घराच्या परिसरात आज शुद्ध हवा खेळते, पक्षी गाणी गातात, झाडं नृत्य करतात आणि खळाळून हसून पावसाला बोलावतात, फुलं, फळं, लाकडं, सावली अगदी आपलेपणानं देतात. खरंच मित्रांनो आपले खरे मित्र तर वृक्ष असतात रे! त्यांना तोडून आपले आयुष्य बेरंगी करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांची लागवड करून आपल्या आयुष्यासह निसर्गात रंग भरून घेतले पाहिजेत. "बघा पटतंय का हे? मंग्या सारखी तुम्हीपण लावाल का मग आपल्या घराभोवती झाडं? मला कळवा बरं का? या पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्ही किती झाडं लावली ते!"