Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Nagesh S Shewalkar

Children Stories


4.4  

Nagesh S Shewalkar

Children Stories


आमचे चॉकलेट काका

आमचे चॉकलेट काका

5 mins 1.8K 5 mins 1.8K

                 ** आमचे चॉकलेटकाका! **

    रविवारचा दिवस होता. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असले तरीही पाऊस चालूच होता. सकाळी लवकर राम उठला. पावसाचा आवाज ऐकून त्याने आईला विचारले,
"आई, पाऊस पडतो का ग?"
"हो ना. रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय. पण खूप छान झाले बाप्पा, उशिरा का होईना पाऊस सुरू झाला ते." आई म्हणाली.
"आम्ही रोज पावसाला प्रार्थना करतोय ना म्हणून पाऊस पडतो. तांडेकाका नेहमी सांगतात की स्वच्छ मनाने प्रार्थना केली की सारी कामे मनाप्रमाणे होतात." राम म्हणाला.
"अस्सं आहे का या पावसाचे गणित? तुम्ही करीत असलेल्या प्रार्थनेचे किती छान फळ मिळत आहे."
"आई, मी रहिमला सांगून येतो की, आपण प्रार्थना करतोय म्हणूनच पाऊस सुरू झाला. आलोच.." असे म्हणत राम धावतच बाहेर पडला.
 रहिमही रामलाच भेटण्यासाठी निघाला होता. दोघांची भेट झाली तेव्हा दोघांचेही चेहरे आनंदी दिसत होते. रहिमला बघताच राम म्हणाला,
"ए रहिम, बघ. आपण दोन-तीन दिवस पावसाची प्रार्थना केली आणि पावसाला यावेच लागले. कसा धो-धो कासळतोय ते."
" हो ना. चल. आपण तांडेकाकूंना सांगूया.." रहिम म्हणाला आणि राम रहिमची जोडी काकांकडे धावतच गेली. तिथे समीर होता. दिवाणखान्यात काका वर्तमानपत्र वाचत बसले होते.त्यांच्याजवळ बसून समीरही वर्तमानपत्रात आलेल्या वेगवेगळ्या वाहनांची छायाचित्रे बघत होता. मधूनच काकांना म्हणत होता,
" काका, ही बघा, आपली फेरोरी गाडी. अरे, आपण तर बघितलीच नाही."
"हो ना यार. आपण बघितलीच नाही बाप्पा. बघू.अरे,किती मस्त आहे ना." काका म्हणाले.
"मोठ्ठीच्या मोठ्ठी आहे. आपण हीच घेऊया का?" समूने विचारले.
"घेऊया. नक्की घेऊया." काका म्हणाले.
" अरे, बापरे ! तांडेकाका, ही माझ्या पप्पांची गाडी. ही बघा तुमची गाडी. ही - ही सावळेकाकांची गाडी. गाड्याच गाड्या. एक - दोन- पाच- दहा- शंभर गाड्या ! काका, हे हे बघा, ट्रॅक्टर. ही ही बघा ना केवढी मोठ्ठठी जीप आहे..."
"अरे, खरेच की! हे काय आहे ते सांग बरे..." काकांनी विचारले.
"टँकर.... हैश्या... आपलं पाण्याचं टँकर..." टाळ्या वाजवत समीर म्हणाला.
" शाब्बास! व्हेरी गुड! गुड बॉय ! " काका म्हणाले. वर्तमानपत्रातील वाहने पाहण्याचा छंद समीरला चांगलाच जडला होता. कधी काकांसोबत तर कधी काकूंसोबत समीर वर्तमानपत्रात आलेल्या वाहनांच्या छायाचित्रांना बघत गप्पा मारत असे. वर्तमानपत्रात आलेले एखादे चित्र संकुलातील कुणाच्या वाहनाप्रमाणे दिसले की त्याला खूप आनंद होई. आणि ते वाहन कुणाच्या वाहनाप्रमाणे आहे हे तो बरोबर ओळखत असे. त्यांची चर्चा चालू असतानाच तिथे रामरहिम आले. राम म्हणाला,
" काका...काका, बघा ना, कित्ती पाऊस पडतोय."
" का नाही पडणार? आपण दररोज प्रार्थना करतोय ना म्हणून त्याला यावेच लागले." काका सांगत असताना समूचे लक्ष रहिमकडे गेले तो तांडेकाकूंच्या खुर्चीवर बसत असलेला पाहून त्याच्या हाताला धरून ओढत म्हणाला,
"ये..ये..उठ. त्या खुर्चीवर बसायचे नाही. ती तांडेकाकूंची खुर्ची आहे. उठ..."
तांडेकाकूंची ती स्वतंत्र खुर्ची होती. त्यांना पाठदुखीचा त्रास होत असे. त्या खुर्चीवर बसले की, त्यांना थोडा आराम वाटत असे. त्याच खुर्चीवर बसून काकू छोटी छोटी कामेही करत असत. त्या खुर्चीवर समीर कुणालाही बसू देत नसे. स्वतः मात्र त्या खुर्चीवर हक्काने प्रसंगी दादागिरी करून बसत असे. इतर कुणी सोडा पण लहर आली की, तो काकूंनाही त्यांच्या खुर्चीत बसू द्यायचा नाही. काकू खुर्चीवर बसत असताना धावत जाऊन त्यांना ढकलून देऊन स्वतः बसत असे. काकू बसलेल्या असल्या तरीही त्यांंच्या हाताला धरून खाली ओढून तो स्वतः त्या खुर्चीवर बसे. खुर्चीवर बसला की, त्याच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव आणि विजयी खट्याळ हसू पाहून काकू त्याला रागवायचे सोडून स्वतःच हसू लागत....
"कुणी कुणी ब्रश केले आहे?" काकांनी विचारले.
" मी नाही केले बुवा..." राम म्हणाला.
"मी उठलो आणि इकडेच पळत आलो. आता घरी जाऊन आंघोळ करणार." रहिम म्हणाला.
" मी तर बुवा, सकाळीच ब्रश केला." समीर म्हणाला. परंतु त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव होते.
"कित्ती खोटे बोलतय..." काका खास स्वरात म्हणाले आणि समीरसह सारे हसू लागले.
"ये राम, चल आपण पार्किंगमध्ये जाऊया." रहिम म्हणाला.
"मी पण येणार...." असे म्हणत समीरही धावत निघाला....
   काकांनी घड्याळात पाहिले. सकाळचे अकरा वाजत असल्याचे पाहून ते म्हणाले,
" अग, बघ ना, अकरा वाजत आहेत पण आभाळ भरलेलेच आहे."
"का हो, ही पोरं आज शाळेत गेली नाहीत का?"
" अग, आज कशाची शाळा? आज रविवार आहे. सकाळपासून नुसता धिंगाणा चालू आहे. पाऊस कमी झाल्यासारखा वाटतोय पण भरलेले ढग मात्र आहेतच. तरीही इतक्यात पाऊस पडेल असे वाटत नाही. मी मंदिरात जाऊन येतो. उद्या चतुर्थी आहे. फळेही घेऊन येतो." काका म्हणाले.
"अहो, जरा सांभाळून जा. पाऊस सुरू आहे. रस्त्याने खूप खड्डे आहेत. पाण्याने भरल्यामुळे दिसणार नाहीत." काकू म्हणाल्या.
" ते तर आहेच. जाऊन येतो." असे म्हणत काका खाली आले. इमारतीचे वाहनतळ प्रशस्त असे होते. सुट्टीमुळे आणि पावसामुळे सारी वाहने तिथे असली तरीही मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा होती. काकांना पाहताच समीर ओरडला,
"काका आले. तांडेकाका आले."
ते ऐकून सारी मुले काकांभोवती जमा झाली. काकांनी खिशातून चॉकलेट काढले आणि प्रत्येकाला एक-एक चॉकलेट दिले. मुले खुश झाली. तांडेकाका त्यांच्या स्कुटीजवळ गेलेले पाहताच समूने विचारले, "काका, तुम्ही कुठे चालले?"
"चॉकलेट आणायला. बाय! " असे म्हणत काकांनी गाडी सुरू केली. ते हरिनाम संकुलाच्या बाहेर पडत असताना पाठोपाठ मुलांचे आवाज आले,
"बाय काका, बाय !"
"काका, लवकर या. पाऊस येईल. " समीर म्हणाला.
संकुलापासून थोडे अंतर जाताच काकांची गाडी एका खड्ड्यात अडकली. काका गाडी वर घेण्याचा प्रयत्न करीत होते परंतु गाडी वर येत नव्हती. एक्सीलेटर वाढवले की, चाक जाग्यावर गरगरत होते. काका गाडीवरून उतरले. त्यांनी गाडी ढकलून वर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश येत नव्हते. ते पाहून रामरहिम पळत त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या पाठोपाठ सारी बच्चेकंपनी धावत आली. सर्वांंनी काकांना गाडी ढकलण्यासाठी मदत केली. काही क्षणात काकांची स्कुटी खड्ड्यातून बाहेर येताच मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
"थँक्स, मुलांनो..." गाडी सुरू करताना काका म्हणाले.
"वेलकम् काका. लवकर या. मी वाट बघतो." समीर म्हणाला. काकांची गाडी दिसेनाशी होताच राम म्हणाला,
" अरे यार, आज आपण किती खेळलो रे. दमलो बाप्पा. भूक लागली आहे. आपण जेवण करूया. वाटल्यास पुन्हा खेळूया."
"मी एक आयडिया सांगतो. आपण आज अंगतपंगत करुया. " रहिम म्हणाला.
"कुठे करायची? मी पण येणार हं. " समीर म्हणाला.
" अंगतपंगत? व्वा! मस्तच. काल की नाही, पेपरमध्ये एक कविता आली होती. ती कविता मी पाठही केली." मालिनी म्हणाली.
" खरेच ! आम्हाला म्हणून दाखव ना." रहिम म्हणाला.
"ऐकायची ? ऐका.....  'ससे आले सात, त्यांनी आणला भात,
               पळत आले हरण, घेऊनी वरण,
               माकड आले करीत हूपहूप, घेऊनी तूप,
               सारे मिळूनी खाऊया, अंगतपंगत करुया ।'....."
"अरे वा! किती छान आहे." राम म्हणाला.
"माझी आई ना, मला खूप खूप छान गाणे शिकवते. आईने मला की नाही, पुरणपोळीचे गाणे शिकवले आहे." मालिनी म्हणाली.
"काय म्हणतेस? पुरणपोळीचे गाणे? मला पुरणपोळी खूप आवडते." रहिम म्हणाला.
"मलाही पुरणपोळी खूप आवडते म्हणून माझ्या आईने तांडेकाकूंकडून शिकून घेतली." राम म्हणाला.
" ये मालू, म्हण ना ग, पुरणपोळीचे गाणे. .." रहिम म्हणाला.
"टाळ्या बाई टाळ्या, पुरणाच्या पोळ्या।
एक पोळी करपली, दुधासंगे ओरपली।
दूध झाले कडू, बाळाला आले रडू ।
बाळ गेले झोपी, बाळाला घाला टोपी । " मालिनीने गाणे म्हटले.
"वॉव! मस्तच आहे, तुझी पुरणपोळी ." रहिम म्हणाला.
"पुरणपोळी ? कुठे आहे रे? कुणी केली रे? मला पण खायची आहे." समीर म्हणाला.
"अरे, अजून एक आयडिया! आज आपण आईला पुरणपोळी करायला सांगूया आणि मग पुरणपोळीची अंगतपंगत करुया." राम म्हणाला.
" मी पण मम्मीला पुरणपोळी करायला सांगतो... " असे म्हणत समीर सर्वांंच्या आधी धावत सुटला.
  हरिनाम संकुलातील मुले तशी दंगेखोर असली तरीही हट्टी किंवा भांडखोर नव्हती. त्यांच्यामध्ये वाद, भांडणे जास्त प्रमाणात होत नव्हती. एकत्र खेळणे, बागडणे, जेवणे असे सारे चालत असे. त्यामागे त्यांच्या पालकांची शिकवण तर होतीच परंतु तांडेकाका - काकूंचे लक्षही होतेच.....Rate this content
Log in