चिऊ - भाग 1
चिऊ - भाग 1


ही एक अशीच टाइमपास कथा आहे. म्हटलं तर विनोदी आणि म्हटलं तर नाही. कारण विनोद निर्माण व्हायला तितक्याच प्रतिभेचं लिखाण हवं आणि मी ते अजून शिकतेय असं मला वाटतं.
तर ही कथा आहे एका छोट्या मुलीची जी शाळेत जायची. असेल 5 वी – 6 वी ला. काय बरं तिचं नाव. चिऊ ठेवूया. तर ही चिऊ. मस्त नाजुक-साजुक. नाही. नाही. नाजुक नव्हती ती. साजुक होती. लांब केस आणि त्याच्या दोन वेण्या. चांगली उंच. तब्येतीने चांगली. म्हणजे तिच्या वयाच्या मुलींच्या मानाने एकदम मोठ्ठी वाटेल अशी. दिसायला मात्र बरी होती. गोरी आणि सावळी याच्या मधला एखादा रंग होता तिचा. अभ्यासात ब-यापैकी हुशार.
तर अशी ही चिऊ तिच्या उंचीमुळे तिला नेहमी मागच्या bench वर बसावं लागायचं. जे तिला अजिबात आवडायचं नाही. पण काय करणार..! सगळे विषय सारखेच वाटायचे तिला. चित्रकला हा विषय मात्र खुप आवडायचा. शाळेत नेहमी होणा-या चित्रकलेच्या स्पर्धांना ती नेहमी भाग घ्यायची. चित्रकलेच्या तासाला देण्यात येणा-या चित्रांना खुप प्रेमाने आणि मेहनतीने रंगवायची. पण तिला म्हणावं तसं काही जमत नव्हतं. तरीपण बिचारी प्रयत्न करायची.
अरे हो महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. तर एकदा काय झालं. चित्रकलेची परिक्षा होती. चित्रकलेची परिक्षा म्हणजे सगळ्यांसाठी पर्वणीच. मग काय चिऊ पण तयारीला लागली. ज्या दिवशी परिक्षा होती त्या दिवशी ब्रश, रंग, pencil, रबर अशी सगळी जय्यत तयारी करुन madam निघाली ना शाळेला. तिची ना एक मस्त मरून रंगाची सायकल होती. सायकलच्या handle जवळ एक बास्केट होतं. त्यात तिने तिचे सगळे रंग , डबा आणि पाण्याची बाटली ठेवली. सायकलच्या मागच्या कडीला दप्तर अडकवलं आणि निघाली स्वारी.
शाळेत सगळ्या मैत्रिणींनी आपापलं सामान आणलं होतं. मग काय कोणी कोणी काय काय आणलंय याच्या चौकश्या झाल्या. सकाळच्या प्रार्थनेपासून ते चित्रकलेच्या तासापर्यंत बऱ्याच वेळा मग हा विषय चघळला गेला. गंमत म्हणजे मधल्या सुट्टीनंतर सगळे तास चित्रकलेच्या परिक्षेसाठी राखीव होते. कसेतरी ते कंटाळवाणे तास संपले आणि परिक्षेला एकदाची सुरवात झाली. दोन-तीन विषय दिले गेले काढण्यासाठी. जसं गाव, बगिचा आणि टपाल. आता एका बेंच वर तीन तीन जण बसणार. एरवी ठिक आहे हो. पण चित्र काढायचं म्हणजे एकमेकांना धक्का लागणार. तसे चित्राचे कागद वाटले गेले. पण तेपण भले मोठ्ठे. मग एका बेंच वर असे कितीसे कागद राहणार ना. मग काय बाईंनी एक शक्कल लढवली. अर्ध्या पोरांना बाहेर व-हांडयात जायला सांगितलं. पोरांसाठी ही तर धम्मालंच होती.
आपली चिऊ.. तिने पण तिचा मोर्चा वळवला बाहेर. शाळेचा परिसर तसा छानंच होता. ती एक बैठी कौलारु L आकाराची बिल्डिंग होती. 5 वी ते सातवी पर्यंत. एका मोठ्या लाईन मध्ये सगळे वर्ग. मध्ये शिक्षकांची खोली. आणि छोट्या L च्या लाईन मध्ये प्रयोगशाळा. 8वी ते 10 वी चे वर्ग दुस-या बिल्डिंगमध्ये होते. आणि चिऊचा वर्ग प्रयोगशाळेच्या बाजूलाच होता. वर्गासमोर अनंताचं झाड होतं. त्याला खुप सुंदर पांढरी फुलं यायची. होतं छोटंसंच. पण फुलां पर्यंत हात खुप मुश्कीलीने जायचा. बाजूलाच समोर बकुळीचं झाड होतं. त्या झाडाखाली एक छोटासा हौद. अगदीच लहान. बकुळीचा सडा त्या हौदात आणि त्याच्या आजुबाजुला पडायचा. पुर्वी म्हणे त्या इवल्याशा ह
ौदात मासे होते. काहीही म्हणतात लोकं!. हा पण गप्पी मासे बघितले होते चिऊने.
तर चिऊ आणि तिच्या मैत्रिणींनी याच हौदाजवळ आपलं दुकान मांडलं. किती मन लावून काढत होते सगळे चित्र. चिऊने पेन्सिल घेतली. कागद नीट पकडला. आणि काढायला सुरवात केली. पण काढणार काय? ठरवायला तर हवं ना.. तर चिऊने खुप विचार केला. काय काढता येईल बरं. आणि मग ठरवलं की गावाचं चित्र काढायचं. मग काय पेन्सिल भरभर कागदावर फिरू लागली. खोडरबर आणि पेन्सिलने जणू दोस्तीच केली. एकमेकां सहाय्य करू… चित्र काढून झालं. हो पण एवढ्यावरंच संपत नाही ना. ते चित्र रंगवायला पण हवं. Water color, खडू कलर , स्केच पेन असं सगळं मग बाहेर निघालं. एका छोट्या वाटीत पाणी आणलं गेलं. पिशवीतून रंग काढायला प्लेट आणि खराब कपडा काढला गेला. ब्रश दिमाखात समोर येऊन बसले. आणि मग काय कागदावरचं गाव रंगू लागलं. शेतं हिरवी झाली. आकाश निळं झालं. झाडांना हिरवा बहार आला. झोपड्या रंगल्या आणि माणसं सुद्धा. आणि शेवटी finishing…. मग काळ्या रंगाच्या स्केच पेनने बॉर्डर केली गेली. बरेच रंग उधार पण घेतले गेले बरं का… हाहा म्हणता एकदाचं झालं चित्र पूर्ण.
चिऊने वर डोकाऊन पाहिलं तर सगळ्यांचीच चित्र जवळपास झाली होती. तिने एकदा मन भरुन प्रेमाने स्वत:च्या चित्राला पाहिले. ओलं होतं ते अजून. अर्ध ओलं आणि अर्धं कोरडं. कागदाच्या मागच्या बाजूला नाव गाव लिहायचं होतं. तिने काळजीपूर्वक मागे नाव लिहिलं. चित्र खराब होणार नाही हे बघून. आता एकदा रंग सुकले की चित्र बाईंना द्यायचं म्हणजे झालं.
सगळ्या मैत्रीणींनी ठरवलं की इकडेच चित्र सुकवत ठेवायचं. मग काय सगळा बोरिया बिस्तर आवरला गेला. स्वत:च्या कागदांवर दगड ठेवले गेले. आणि सगळे जण आले वर्गात. आता शाळा सुटायची वेळ. तरीपण काही शिक्षकांना शिकवण्याचा मोह आवरत नाही. आपल्या कागदाची रखवाली करायची सोडून वर्गात बसायची चिऊला अगदी जिवावर आली. सगळयांसोबत तिला पण बसावं लागलं वर्गात. मात्र तिचं एकंच चुकलं. तिने तिचा एकटीचा कागद बाहेर ठेवला. अहो असं काय करताय.. रंग ओले होते ना.
वर्गात बसुन थोडा वेळ होतो ना होतो तोच चिऊची एक मैत्रिण ओरडतंच आली. “चिऊ..चिऊ..तुझं चित्र..” चिऊच्या तर काळजाचा ठोकाच चुकला. ती धावत धावत बाहेर आली. बघते तर काय. साक्षात एक गाय समोर उभी आणि तिच्या तोंडात चिऊचं काढलेलं अर्ध चित्र. अर्धा कागद ती गाय खाऊन मोकळी. त्या गायीलाच चिऊचं चित्र आवडलं म्हणायचं दुसरं काय.
इकडे चिऊची हालत मात्र खराब झाली. रडून रडून पोरगी बेजार झाली. तशीच रडत रडत ती दुस-या बिल्डिंगमधल्या ladies staff room मध्ये आपल्या एका मैत्रिणीसोबत गेली. चित्रकलेच्या बाईंना तिने सगळं सांगितलं. बाईंनी तिला घरुन दुसरं चित्र काढून आणायला सांगितलं. तेव्हा staff room मध्ये ब-याच शिक्षिका होत्या. चिऊची गोष्ट ऐकुन सगळया फिदीफिदी हसायला लागल्या. बिचारी चिऊ. इतका राग आला तिला सगळयांचा. तिच्या मैत्रिणी मात्र खुप चांगल्या. त्यांनी तिला समजावले. तिची काळजी घेतली. तिचं रडणं थांबलं तशा घरी गेल्या.
बिचारी चिऊ. तिने घरी येऊन रात्रीतूनच चित्र पूर्ण केलं आणि दुस-या दिवशी बाईंना दिलं. तो क्षण तिच्या मनात कायमचा कोरला गेला.
(क्रमशः)