Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Harshada Shimpi

Others


3  

Harshada Shimpi

Others


चिऊ भाग ४

चिऊ भाग ४

4 mins 164 4 mins 164

प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास क्षण असतात. त्यांनी पाळलेल्या प्राण्यांबद्दल… काही चांगले.. काही वाईट… चिऊच्या आयुष्यात सुद्धा होते..  चिऊला मनीमाऊ खुप आवडायच्या. इतक्या की ती त्यांना सोबत घेऊन झोपायची. भाड्याच्या घरातंच माऊशी तिची पहिली भेट झाली. त्यानंतर चिऊ मोठी होईस्तोवर कित्येक वर्ष तिला माऊ भेटत गेल्या. तिची पहिली मांजर तिला भेटली ती खासकरुन तिला झालेल्या गोंडस पिल्लांमुळे. नेहमी भेटणा-या या मांजरी आणि त्यांची पिल्लं यांनी चिऊच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. प्रत्येक वेळेला भेटणा-या या मांजरींची साधारण एकच गोष्ट. अशा खुप सा-या मांजरींची वेगवेगळी गोष्ट लिहिली तर तोचतोचपणा येईल.

एकदा एक माऊचं छोटुसं पिल्लू तिच्याकडे होतं. ते मोठं होईस्तोवर तिने सांभाळलं. इतकं गोड आणि मऊ मऊ होतं ते. ते पांढरं आणि त्याच्या अंगावर काळे पट्टे होते. खुपंच छान होतं ते. खुप खेळायचं. मटामटा दुध प्यायचं. लहान होतं तोवर ठिक होतं. घरात रहायचं. पण मोठं झालं आणि त्याला बाहेरची संगत लागली. मग घरी पाय टिकायचाच नाही त्याचा. तशी चिऊ पण कधी कधी द्यायची त्याला त्रास. पण तिला खुप आठवण यायची त्याची. नंतर जेव्हा तिला पिल्लं झाली तेव्हा कळलं की ती मनीमाऊ होती.

चिऊला नेहमी मांजरी आवडायच्या. म्हणजे तिला मनीमाऊ आवडायची. पण बोके अजिबात आवडायचे नाहीत. याला अपवाद फक्त Tom and Jerry मधला Tom आहे.

तर नेहमीप्रमाणे एकदा एका मांजरीने चिऊच्या घरात पिल्लांना आसरा दिला. जन्म दिला असं नाही म्हणणार कारण ती दुसरीकडून पिल्लांना घेऊन आली होती. मांजरी कशा नेहमी घर बदलत राहतात. तर चिऊला मुळातंच त्या आवडत असल्याने तिची मजाच झाली. पिल्लं लहान होती तेव्हा मांजरीला दुध, चपाती द्यायचं, सतत त्यांच्या अवतीभवती रहायचं असले उद्योग ती करायची.

हळूहळू ती पिल्लं मोठी होऊ लागली. दिवसभर ती इकडून तिकडे उडया मारत रहायची. झोपण्याच्या त्यांच्या नाना त-हा. कशाही झोपायच्या. त्यांचं ते मऊ मऊ केस असणारं इवलसं शरीर. त्यांना आंजारत गोंजारत त्यांच्याशी खुप खेळ खेळले जायचे. ती पिल्लं पण चिऊ आल्यावर पटकन तिच्यापाशी यायची.

असंच एकदा नेहमीप्रमाणे रात्री खेळून चिऊ झोपली. पिल्लं देखील तिच्या आईच्या कुशीत झोपी गेली. सकाळी सकाळी पिल्लं आधीच ऊठून दंगामस्ती करत होती. चिऊच्या बाबांनी सकाळ झाली म्हणून दार उघडलं. चिऊ अजून झोपली होती. म्हणून त्यांनी दार इवलसं उघडं ठेवलं. 

अचानक पिल्लांचा ओरडण्याचा आवाज आला. चिऊ दचकून उठली बघते तर काय… पिल्लांची आई.. त्या मांजरीने स्वत:चे सगळे अंग रागाने फुलवले होते. ती गुरगुरत होती. बाजूलाच एक इवलंसं पिल्लू तडफडत होतं आणि.. समोर एक महाकाय.. बोका..ज्याच्याशी ती पिल्लांची आई सामना करत होती. 

त्या पिल्लाने कधीच जीव सोडला. दुसरी पिल्लं कुठेतरी दूर लपून बसली. त्या बोक्याच्या अंगाची गुर्मी अजुनही उतरली नव्हती. तो अजुनही निर्लज्जपणे फिस्कारत होता. शेवटी त्या बोक्याने आजुबाजुच्या माणसांची चाहूल घेतली आणि तो सटकला. त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते की तो पुन्हा येईल.

चिऊला हे सगळं बघून धक्काच बसला. पण पुढचा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या मांजरीने ते मेलेलं पिल्लू खायला सुरवात केली. असलं काही आपल्या मुलांसमोर घडायला नको म्हणून चिऊच्या बाबांनी लगेच चिऊला तिकडून बाजूला नेलं आणि ते मेलेलं पिल्लू दूर नेऊन पुरलं. 

चिऊ धाय मोकलून रडली त्या दिवशी. इतकी रडली इतकी रडली की एखाद्याचं मन हेलावून जाईल.

आपण विचार करतो त्यापेक्षा वास्तव कितीतरी वेगळं असतं याची चिऊला पहिल्यांदा जाणीव झाली. नंतर अशा कितीतरी पिल्लांनी आपला जीव गमावला. पण होणा-या गोष्टीला कोणी रोखू शकलं नाही. एकदा तर एक मांजर पिल्लांना दुध देण्यासाठी त्यांना घरभर शोधत होती. आर्त आवाज देत होती. रडून रडून तिची आसवं सुकली होती. पान्हा वाहत होता. पण पिल्लं… ती तर कधीच गेली होती सोडून.

आयुष्याचं असंच असतं का? कधी आपल्या हातून जाईल काहीच सांगता येत नाही. चिऊ उगीचंच त्या वास्तव जीवनाचा विचार करत राहीली. आपल्या नशिबात येणारे छान आनंदी क्षण खरंच कमी आहेत का? की आपण त्यांना कमी करतो? की असाच एखादा बोका येऊन आपलं आयुष्य कमी करतो. किती विचार करायचा.

किती दिवस आणि किती रात्री…अशा रडत काढल्या असतील चिऊने. अन् एक दिवस.. तिची आसवं देखील आटली… याचा अर्थ असा नाही की तिने तिची संवेदनशीलता गमावली. तिने फक्त सत्यता स्विकारली. वास्तव जीवन काय असतं याचं एक जगाच्या दृष्टीने छोटं पण तिच्या दृष्टीने मोठं असं उदाहरण तिने अनुभवलं. आजही तिला मांजर तितकीच आवडते. मनीमाऊ आणि तिची बाळं तितकीच गोड वाटतात. जमलं तर ती त्यांना खाऊ घालते. मात्र आता त्यांना ती पाळत नाही.

सहवासाने एखादी व्यक्ती… व्यक्तीच का.. प्राणीदेखिल.. इतके जवळचे होऊन जातात की त्यांना गमावण्याचं दु:ख खुप मोठं होऊन जातं. तरीदेखील जीवन तिकडेच थांबत नाही. ते वाहतं राहतं. आणि मनाच्या एका कोप-यात त्या सगळया आठवणी जीवंत राहतात.

चिऊचंही तसंच झालं. वेळ हे त्यावरंच उत्तम औषध ठरलं. तिने मनाच्या कोप-यात त्या गोड आठवणी जपुन ठेवल्या. पुढच्या प्रवासासाठी…..


Rate this content
Log in