अति घाई संकटात नेई.
अति घाई संकटात नेई.


"गावाकडच्या दहीहंडीला फारच धमाल असते बरं का बाल मित्रांनो. सारा गाव एकत्र गोळा होऊन घरा घरात जाऊन धिंगाणा घालणे हेच फक्त ठाऊक असते पोरांना दहीहंडीच्या दिवशी. त्यात धोधो पाऊस असला की, पोरं अजूनच चेकाळून जातात. गावाकडं हंड्या मोजक्याच असतात. शहरासारख्या गल्लोगल्लीत हजारो करोडोंच्या नसतात हं बाळांनो. तिथल्या हंड्या फक्त आणि फक्त संस्कृतीच्या भावना जपणाऱ्या असतात. हंडीच्या दोराला लटकलेली फळे जर का खाली पडली तर ती गोळा करण्यासाठी पोरांचा पडणारा गराडा बघाल तर म्हणाल यांना फळं कधी खायलाच मिळाली नाहीत का? पण खरं सांगू दहीहंडीचा खरा सण पाहायचा तो गावाकडं. आधी कृष्ण जन्माचं जागरण, मग कृष्ण जन्मानंतर सकाळपर्यंत निरनिराळे नाच खेळ झिम्मा फुगड्या व दुसऱ्या दिवशी दहीकाला, सारं कसं बघण्यासारखं असतं. ते इथं मुंबईत बघायला नाही मिळत. पण जेवढा हा सण आनंदाचा आहे तेवढाच धोक्याचा आहे बरं का?
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धमाल मस्ती करणार आणि हंडी फोडून झाल्यावर नदीवर पोहायला जाणार असा बेत होता निलूचा. तशी त्याने आपल्या बाबांची परवानगी सुद्धा काढली होती, हंडी नंतर नदीवर पोहायला जायची, आणि बाबांनी होकारही दिला होता त्याला. दिवसभर गावातील घरोघरी फिरून थंड, गरम पाणी आणि दही दूध अंगावर घेऊन गावातील सारी पोरं थंडीने कुडकुडत होती. कधी एकदा शेवटची हंडी फोडतोय आणि कधी नदीवर आंघोळीला जातोय असं प्रत्येकाच्या मनात असायचं. हंडी फुटली रे फुटली की सर्वांच्या आधी मीच जाईन धावत नदीवर असे निलूने ठरवले होते. सर्वांसह आज तोही फार खुश होता. कारण आज हंडीच्या निमित्ताने तरी त्याला पोहायला मिळणार होते. पण त्याच्या या आनंदाला विरजण लागणार होते हे त्याला ठाऊक नव्हते.
शेवटची हंडी फुटली आणि सारी मुलं वाऱ्यावर स्वार झाली. दगड धोंड्यांच्या गावात वाटेवर अनेक दगड आणि खाच खळगे असतात. पण त्यांना त्यावेळी खाली काहीच दिसत नव्हते. धावण्यात सर्वात पुढे निलूच होता. नदी जवळ पोहचताच नदीत उडी टाकण्यासाठी तो एका मोठ्या दगडावर चढला. मागे वळून पहिले तर धावणारी मुले फार लांब होती आणि जसे त्याने ठरविले होते तसेच तो सर्वांच्या आधी एक नंबरला नदीत उडी मारणार होता. सर्व मागे राहिलेत हे पाहून त्याने नदीत उडी मारण्यासाठी डाव्या पायाला मागे करून उजवा पाय वाकवून उडी घेण्यासाठी कमरेत खाली वाकला, एवढ्यात त्याचा बाजूच्या दुसऱ्या छोट्या धारदार दगडावर तोल गेला आणि तो डोक्यावर धाडकन् आपटला. आपण पडलो आहोत हे कुणी पहिले तर नाही ना? हे बघण्यासाठी त्याने मागे वळून पहिले तर अजून कुणी आले नव्हते. क्षणभर डोळ्यापुढे काळोख आला आणि पुढल्याच क्षणी निलू नदीच्या काठावर बेशुद्ध पडला. म्हणतात ना बाळांनो हातचं बोटावर निभावलं तसं झालं निलूच्या बाबतीत, ती म्हणं आहे ना? 'अति घाई संकटात नेई' हे त्याला कळून चुकलं. म्हणून तुम्हीही दहीहंडी खेळत असताना आणि इतर कोणतेही खेळ अथवा काम करता असताना अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट केली पाहिजॆ यातच आपले भले असते.