laxman kisan divate

Children Stories Inspirational

4.5  

laxman kisan divate

Children Stories Inspirational

गणू लिहू लागला

गणू लिहू लागला

7 mins
657


  एक गाव होतं. गावामध्ये गौतम नावाचा मजूर राहत होता. तो अगदी प्रामाणिक आणि कष्टाळू होता. कोणतेही काम तो मनापासून करायचा. कुचराई ही त्याला माहीतच नव्हती. तो वेळेचा आणि शब्दाचा अगदी बांधील होता. मिस्तरीच्या हाताखाली माल देणे, माल कालवणे, विटा देण्याचे काम तो करत असायचा. त्याच्या प्रमाणिकपणामुळे आणि कष्टाळुपणामुळे लोक त्याला आवडीने कामाला बोलवायचे.

           काम कष्ट करून गौतम आपल्या संसाराचा गाडा हाकीत होता. त्याची बायकोपण मोलमजुरी करून संसाराला हातभार लावीत होती. चार पत्र्याच्या झोपडीत त्यांनी आपला संसार थाटला होता. त्यांचा एकुलता एक मुलगा 'गणू' चुणचुणीत आणि हुशार होता. गणू नुकताच शाळेत जाऊ लागला होता. तो पहिलीच्या वर्गात शिकत होता. सुरुवातीला त्याला शाळा म्हणजे तुरुंग वाटत होता. एवढा वेळ त्याला एका ठिकाणी बसवत नव्हतं. सारखी घरची आठवण यायची. पण आता त्याला शाळेची गोडी लागली होती. बाई खूप छान शिकवायच्या. त्यांचा त्याला चांगलाच लळा लागला होता. गणू आता शाळा बुडवावीत नव्हता. शाळेची घंटा वाजली की दप्तर घेऊन धूम ठोकायचा.

            गौतमचं काम शाळेच्याच बाजूला चालू होतं. बांधकाम भरपूर मोठं होतं. बरेच दिवस काम चालणार होतं. शाळा सुटली की गणू रोज कामावर यायचा. वाळूच्या ढिगाऱ्यावर मनसोक्त खेळत बसायचा. वाळूतून त्याने अनेक लहान मोठे शंख सिंपले गोळा केले होते. त्याच्या दप्तरात अनेक शंख शिंपले होते. त्याला वाळूत खेळायला खूपच आवडायचे .

            आज नेहमी प्रमाणेच शाळा सुटल्यावर गणू वाळूत येऊन खेळत होता. गौतमचं काम वरच्या मजल्यावर चालू होतं. तो आपल्याच कामात मग्न होता. सुट्टीची वेळ झाली होती. पण उरलेला माल संपवायचा होता, म्हणून कामाची लगबग चालली होती. माल संपवून मिस्तरी हात - पाय धुवून निघाले . गौतम आपला सनगं धुऊन आवराआवर करीत होता. एवढ्यात खाली गाडीचा आवाज आला. गाडीच्या आवाजाने गौतमने खाली डोकावले. ती मालकाची गाडी होती.

 "अरे, गौतम !" गाडीतून उतरत मालकाने हाक मारली

"काय मालक?"

"अरे, किती वेळ काम करतोस? आता सुट्टी कर."

"होय मालक. एवढे सनगं धुवुन ठेवतो. नाय धूतली तर खराब व्हत्यात."

"बरं... बरं...! तुला पैसे किती द्यायचे?"

"पाचशे रुपये द्या. बास होतील. किराणा तर न्यायचाय."

"बरं, हे बघ मी थोडा घाईत आहे. तुझ्या पोराकडे पैसे ठेवतो." असे म्हणून मालकांनी पाकिटातून पाचशेची नोट काढून गणूच्या हातात दिली.

"गणू बाळा, तुझ्या पप्पाकडे दे अं ! नाहीतर हरवशील?"

"नाही हरवणार. पप्पा कडेच देईन." असं म्हणून गणूने पाचशेची नोट हातात घेतली आणि घाईघाईने मालक निघून गेले. गणू तिथंच वाळूवर खेळत होता. थोड्याच वेळात गौतमचं काम आवरलं. हात- पाय धुऊन गौतम खाली आला. बापाला बघताच गणूने दप्तर पाठीवर अडकवलं आणि पळत जाऊन बापाला मिठी मारली. गौतमने त्याला उचलून घेतलं. गणूने मुठीत ठेवलेली नोट बापाच्या खिशात ठेवली. गौतमला त्याचं कौतुक वाटलं. त्याने त्याचा अलगद मुका घेतला. दिवसभर केलेल्या कामाचा शीण नाहीसा झाला.

              दिवस मावळतीला गेला होता. गौतम घराच्या ओढीनं चालला होता. एका हातात जेवणाचा डब्बा तर दुसऱ्या हातात गणू चा हात होता. गणू बापा बरोबर आजूबाजुला बघत लुटुलुटू चालत होता. बाजूचे दुकान बघून गणू हळूच आपल्या बापाला म्हणाला.

"पप्पा, मला बिस्किट घ्या ना !"

"बिस्किट घ्यायचंय? बरं, चल." असं म्हणून गौतम दुकानाकडे वळाला. दुकानात बरीच गर्दी होती. I l गिर्हाईक देता देता ढेर पोट्या शेठ नोकरावर खेकसत होता. गौतमच्या पुढं बरेच गिराईक होते. त्याला लवकर घरी जायचे होते. इथंच त्याला दिवे लागण झाली होती. गौतम ने हात लांबवून शेठजिकडे पैसे दिले. बिस्कीटचा पुडा घेतला. मध्येच घेतल्यामुळे बाकीचे गिर्हाईक त्याच्या कडे वळून बघू लागले. गौतमने बिस्कीटचा पुडा गणूच्या हातात दिला आणि सुट्ट्या पैशासाठी तिथेच चुळबूळ करत उभा राहिला. शेठ समोरच्या लोकांना सामान देत होता. त्याचं गौतम कडे लक्षच नव्हतं. शेठजीने आपल्याला बघावं म्हणून गौतम पुढं पुढं तोंड करीत होता. शेवटी शेठजी ने आपल्या चाळीशीतून भुवया उंचावून गौतमला पाहिले आणि विचारले,

"तुम्ही बिस्कीटचा पुडा घेतला ना?"

"हो"

"मग चला, सुट्टे पाच रुपये द्या."

"अहो शेठ, मी पाचशेची नोट दिलीय. बाकीच्या पैशासाठी मी थांबलोय. तुम्हीच मला चारशे पंचान्नव रुपये द्या.

"हे बघ, तू पैसेच दिलेले नाहीस. उगाच संध्याकाळच्या वेळेला घिसघिस घालू नकोस.

"अहो शेठ, मी खरंच तुम्हाला पाचशेची नोट दिलीय." तोंड बारीक करत गौतम म्हणाला.

"कोणाला शिकवतोस ? मोठा आला पैशावाला. तू पाचशे रुपये दिले नाहीस. पाच रुपये दे, नाहीतर बिस्किटचा पुडा परत कर आणि चालता हो."

"अहो शेठ, माझ्या लेकराची आण घेऊन सांगतो. म्या पाचशेची नोट दिलीय. हवं तर ह्या लोकांना विचारा." गया वया करीत गौतम म्हणाला.   

             पण त्याच्या बाजूने कोणीच बोलत नव्हतं. शेठजी पाच रुपयासाठी खोटं बोलणार नाही. असंच सगळ्यांना वाटत होतं. शेठजी तावातावानं बोलत होता. त्यांचा गलका ऐकून येणाऱ्या - जाणाऱ्यांनी गर्दी केली होती. गौतमचे पैसे असून लोकांच्या नजरेत चोर वाटू लागला. त्या विखारी नजरा त्याला जाळू लागल्या. त्याचा चेहरा काळवंडला. डोळे भरून आले. त्याने मोठ्या कष्टाने गणूच्या हातातील पुडा परत केला आणि डोळे पुसत तिथून निघाला.

             आपल्या बापाला रडताना पाहून गणू ही रडू लागला. पण कोणालाच त्यांची दया येत नव्हती. त्याच्या कष्टाचे पैसे आज बुडाले होते. लेकराच्या हातातील पुडा परत घेतल्याचच त्याला दुःख वाटत होतं. पैशापेक्षा झालेला अपमान त्याला मोठा वाटत होता. गौतम दुःखी कष्टी होऊन विचारांच्या तंद्रीत घराकडे निघाला. एवढ्यात एक गाडी अचानक येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली. काच खाली घेऊन आतल्या माणसाने "गौतम. .!" म्हणून हाक मारली. हाक ऐकून गौतम भानावर आला. गाडीत बसलेले गावडे साहेब बघून गौतमला आनंद झाला. तो धावतच त्यांच्याकडे गेला .

"अरे, काय गौतम?" किती वेळ झालं हॉर्न वाजवतोय? पण ऐकायलाच तयार नाहीस .कसला विचार करतोस?" दरवाजा उघडत गावडे साहेबांनी विचारले.

"साहेब, काही कळालंच नाही." गौतम ओशाळल्यागत होऊन म्हणाला. गौतम आणि गावडे साहेबांची जुनी ओळख होती. त्यांच्या बंगल्याचे काम गौतमनेच केलेले होते. ते पोलीस मध्ये नोकरीला होते. घडलेली हकीगत त्यांना सांगावे की नाही? या द्विधा मनस्थितीत गौतम होता. एवढ्यात साहेबांनीच त्याला विचारले‌.

"काय रे गौतम, तुला बरं नाही का वाटत? काही टेन्शनमध्ये आहेस का?" गावडे साहेबांनी वर-खाली निरखीत, त्याला विचारले. त्यांच्या पोलिसी नजरेने बरोबर हेरलं. गावडे साहेबांचे शब्द ऐकताच गौतमचे डोळे भरून आले. त्याने घडलेला प्रसंग साहेबांना सांगितला आणि गावडे साहेब गौतमला घेऊन दुकानाकडे निघाले.

             दुकानात अजून गर्दी होती. दुकानासमोर गाडी उभी राहताच सगळ्यांच्या माना वळाल्या. गावडे साहेबांना बघताच शेठजिने रामराम घातला.

"या साहेब, आपली काय सेवा करू?" हात जोडत शेठजी ने विचारले.

"हे पहा, सेवा काही नको. फक्त ह्या गौतमची काय तक्रार आहे ती पटकन मिटवा." गौतम कडे हात करत साहेब म्हणाले. शेठजीने गौतम कडे चमकून पाहिले.

"हो.. हो..! हा मघाशी आला होता. तो म्हणतो की, मी तुम्हाला पाचशे रुपयाची नोट दिली आहे. पण त्याने पैसेच दिलेले नाहीत." आठवल्यासारखं करीत शेठजी म्हणाले. 

"अहो शेठजी, गौतम खोटं बोलणार नाही. त्याचा मला विश्वास आहे. तुम्ही गिऱ्हाईकाच्या नादात विसरला असाल, तर लक्षात आणा."

"अहो साहेब, गौतम खोटं बोलत नाही? मग पाचशे रुपयासाठी मी खोटं बोलन का? रोज लाख दोन लाखाचा गल्ला होतो माझा ! ह्याच्या पाचशे रुपयासाठी खोटं का बोलू ?

"तुम्ही खोटं बोलतात असं कोण म्हणतंय? फक्त घाईगडबडीत विसरला असाल तर,लक्षात आणा. एवढच !" साहेब शांतपणे म्हणाले.

            त्यांचं बोलणं ऐकून लोकांची चांगलीच गर्दी झाली. कोण खरं? कोण खोटं? हे, जाण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली होती. पण, गौतमने जर पाचशाची नोट दिली असेल; तर ती कशी शोधायची?" हा एकच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये घोळत होता.

"साहेब एक गल्ला पूर्ण पाचशेच्या नोटांनी भरला आहे. मग तुम्हीच सांगा गौतमची नोट कशी शोधायची?" सर्वांच्या मनात डळमळणारी शंका शेठजीने विचारली आणि गल्याचा ड्राव्हर ओढला. खरोखरच पाचशेच्या नोटांनी गल्ला गच्च भरलेला होता. ते पाहून साहेबांना अवघडल्यासारखे झाले. गौतमला आपल्या पैशावर पाणी सोडावं लागतंय, असंच त्यांना वाटू लागलं.

"शेठजी, चांगलं लक्षात आणून बघा. कदाचित त्यात गौतमची पण एक नोट असेल?"

"साहेब, त्यात गौतमची नोट असायला काय, नोटीवर त्याचं नाव लिहिलंय का?" वैतागून शेठजिने विचारले आणि लोकांमध्ये हशा पिकला. त्याच वेळेस गर्दीमधून बारीक आवाज आला.

"हो. मी नोटीवर नाव लिहिलंय ! मी नोटीवर नाव लिहिलय........!" गर्दीमध्ये गणू ओरडून सांगत होता. त्याच्या कोमल आवाजाने सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. गौतमच्या चेहऱ्यावर आशेची पालवी फुटली. गावडे साहेबांनी गणूच्या दंडाला धरून समोर घेतले.

"बाळा, तू नोटी वर नाव लिहिलस?" डोक्यावर हात फिरवत गावडे साहेबांनी प्रेमाने विचारले.

"हो. मी नोटीवर पेन्सिलनी नाव लिहिलं आहे."

"काय नाव लिहिलंस ?"

"गणू गौतम इमानदार ,असं लिहिलय." गणू म्हणाला आणि साहेबांना आता पुरावाच सापडला.

"शेठजी, सगळ्या नोटा तपासून पहा. नाव असणारी नोट शोधा." मोठ्या उत्साहाने साहेबांनी आदेश सोडला.

"साहेब, तुम्हीच आत या. तुमच्या हातानेच नोटा तपासा." शेटजी म्हणाले.

             आता बाहेर बघ्यांची गर्दी झाली होती. गावडेसाहेब आणि शेठजी नोटा तपासत होते. खालून - वरून , दोन्ही बाजूंनी; प्रत्येक नोट ते तपासत होते. पाहिलेली नोट ते एका डब्यात टाकीत होते. सर्वांचीच उत्सुकता वाढली होती. पण नाव लिहिलेली नोट काही सापडत नव्हती. बापा सारखाच मुलगा पण खोटं बोलतोय कि काय ? असंच सर्वांना वाटत होतं. आता थोड्याच नोटा शिल्लक राहिल्या होत्या. गौतम आणि गावडे साहेबांचा चेहरा काळवंडला होता. तर शेठजीच्या चेहऱ्यावर हसू खुलत होतं. शेवटी दोन तीन नोटा मधून एक नोट गावडे साहेबांच्या हातात आली ,आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुललं.

"सापडली ! सापडली ! नोट सापडली !" गावडे साहेब कितीतरी मोठ्याने ओरडून म्हणाले. हे ऐकून सर्वांनाच आनंद झाला.

"गणू गौतम इमानदार सापडला." आनंदाने सर्वांना ती नोट दाखवीत गावडे साहेब म्हणाले. सर्वजण ते नाव वाचून गणूच कौतुक करत होते.

            शेठजी ने गावडे साहेबांच्या हाताने गौतमला त्याचे पैसे परत केले. गौतम चे डोळे भरून आले. साहेबांचे उपकार कसे मानावेत हेच त्याला कळत नव्हते.

"साहेब, तुमच्यामुळेच आज माझे पैसे परत मिळाले. तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत. हात जोडून गौतम म्हणाला.त्याचे डोळे भरुन आले.

"अरे वेड्या, माझे कुठले उपकार?" गौतम च्या खांद्यावर हात टाकत गावडे साहेब म्हणाले.

"अरे तुझ्या गणूने त्यावर नाव लिहिले, म्हणूनच पैसे परत मिळाले. आता तुझा गणू लिहू लागलाय ! होय कि नाय गणू?" असं म्हणून गावडे साहेबांनी गणूचा गालगुच्चा ओढला. गणू आता हसत होता. 


Rate this content
Log in