बाप्पा रुसले...
बाप्पा रुसले...
"मुलांनो, बाप्पा तुमचे लाडके आणि सर्वात आवडते देव आहेत की नाही? मग त्यांना राग येईल असं काही करू नका बरं का! तुम्हांला एक गम्मत सांगतो. जसे तुमचे बाप्पा लाडके आहेत अगदी तसेच तुम्ही सुध्दा बाप्पाला खूप प्रिय आहात बरं का! दरवर्षी फार मोठ्या आनंदाने आणि आतुरतेने भाद्रपदाच्या चतुर्थीची वाट पाहून ते आपल्याला भेटायला येतात. असे हे आपले लाडके बाप्पा या वर्षीच्या चतुर्थीच्या आदल्या दिवशीपर्यंत रुसून बसले होते.
आपल्या पार्वती मातेवर ते खूप रागावले होते. "माते या वर्षी मी मुळीच जाणार नाही पृथ्वीवर." गणपती म्हणाले. "काय झालं बाळा?" पार्वती मातेने प्रेमाने हळुवारपणे विचारले. "माते,माझे भक्त नुसतेच वेडावले आहेत ग. माझ्या नावाने उगाचच घाणेरडे प्रकार करू लागले आहेत. मला नको असेल तरी जबरदस्तीने गल्लोगल्लीत आणि रस्त्यावरून उगाचच मिरवणुका काढतात, त्याने इतर माणसांना किती त्रास होतो माते! पूर्वीसारखे नाचगाण्यात दंग होऊन जागरण करणारे हेच भक्त आता रात्र रात्रभर पत्ते खेळतात, माझ्या पुढं बायका नाचवतात, प्रसंगी हाणामाऱ्या करतात, मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करतात, काही काही ठिकाणे अशी आहेत माते जिथे वीज काय असते हे ठाऊक नाही आणि हे वेडे एवढी रोशणाई करतात ना तुला काय सांगू माते. दहा दिवस फक्त आणि फक्त माझ्या नावावर अनेक लोकांना नुसताच त्रास सहन करावा लागतो. नद्या, तलाव आणि समुद
्र माझ्या निरनिराळ्या रसायनांनी बनविलेल्या मूर्तींनी दूषित करून टाकतात. माझ्या नावाने गल्लोगल्लीत चालणारे राजकारण मी जवळून पाहिलंय.
पूर्वीचे माझे सारे भक्त चक्क माझ्यासमोर निर्बलांवर अरेरावी करतात. माते! हे नाही बघवत सारं मला. म्हणून मी ठरवलंय या वर्षी धरणीवर जाणार नाही. जरी गेलो आणि ते अनिष्ट प्रकार पाहून माझ्या क्रोधाचा पारा चढला तर वाईट माणसांसह चांगल्यांचाही ह्रास होईल."
"ऐकलेत ना बाळांनो. आपल्या लाडक्या बाप्पाला केवळ चांगल्या व्यक्तींना भेटण्यासाठी कसेबसे पार्वती मातेने यावर्षी धरणीवर पाठवले आहे बरं का! म्हणून आपण त्यांना न आवडणारी एकही गोष्ट करायची नाही अशी शपत घेऊया आणि सारे एकत्र मिळून भक्तिभावाने प्रदूषण विरहीत या वर्षीचा गणेश उत्सव सुमंगल पद्धतीने साजरा करूया. आपल्यातील वाईट गुण जे काही असतील ते या गणपतीत विसर्जित करूया. एक लक्षात ठेवा जर रागाने बाप्पा आपल्यावर रुसले आणि पुन्हा धरणीवर कधी आलेच नाही तर बाप्पाविना आपल्या गणेशउत्सवाला काही अर्थ ठरेल का याचा विचार करा आणि यावर्षी आपल्या भेटीला आलेल्या रुसलेल्या बाप्पाला हसवण्याचा प्रयत्न करा, प्रसन्न करण्याचे प्रयत्न करा. तो मायाळू आहे, प्रेमळ आणि मानाने निर्मळ आहे. आपली भक्ती पाहून त्याला आपली नक्कीच दया येईल आणि खुश होऊन आणि तो जाता जाता आपल्याला गोड गोड आशीवार्द नक्कीच देऊन जाईल."