अती तिथं माती
अती तिथं माती


गुलाबरावांच्या घरात त्यांची मुलगी शमी ही घरातील सर्वांची लाडूबाई होती. लहानपणापासून तिला खूप प्रेमानं, मायेनं वाढवलं होतं. तिचे सारेच हट्ट एका झटक्यात पुरवले जायचे बरं का! अश्या या शमीला कोणतीही गोष्ट नेहमीच इतरांपेक्षा अधिक हवी असायची. म्हणजे छोट्या बहिणीला जेवढे खाऊ बाबा देतील त्यापेक्षा तिला जास्त हवे असायचे. मग हाच हट्टीपणा तिचा सगळ्याच बाबतीत चालायचा आणि आई बाबा व घरचे सारेच ते हट्ट पुरवायचे सुद्धा. पण तिची आज्जी मात्र या सर्वांच्या आणि शमीच्या नेहमीच विरोधात असायची बरं का! शमीचा हा आती हावरटपण तिला मुळीच आवडत नसे. आज्जी तिला नेहमी म्हणायची "अग वेडाबाई, जास्त हावरटपणा करशील तर माती खाशील. पोरी अती तिथं माती होते ग."
शमी आता दहा वर्षांची होती. तरीही तिचा तो हावरटपणा म्हणजे जे हवे ते सर्वांहून अधिक हवे हा गूण काही गेला नव्हता. एकदा शाळेतून परत घरी जात असताना शमीला वाण्याच्या दुकानाजवळ तिचा मामा भेटला. तिचे आजोळ बाजूच्या गावात होते, पण आज अचानक कामानिमित्त शमीच्या गावात आलेल्या मामला पाहून शमी जाम खूश झाली. तिने मामला लांबूनच हाक मारली आणि धावत जाऊन त्याला बिलगली. घरच्यांप्रमाणेच मामाची सुद्धा शमी लाडूबाई होती. शमीला वाण्याच्या दुकानातील गुलाबजामून फार आवडतात हे ठाऊक होते त्याला. म्हणून मामाने तिला वाण्याच्या दुकानातून सहा गुलाबजामून घेऊन दिले. ते पाहून शमी फार खूश झाली. पण तिला अजून सहा गुलाबजामून हवे होते. ते मामाच्या लक्षात आले. "काय ग! अजून हवेत का?" मामाने विचारले. तिने नुसतेच खोडकरपणे डोळे मिचकावीत मानेनेच होकार दिला. "हा हा हा! नाही सुधारणार तू, वेडाबाई अग एवढे कसे नेणार आहेस घरी?'' तरीही हट्टाने बारा गुलाबजामून घेऊन आपल्या मामाला टाटा बाय बाय करून शमी घरी निघाली. वाण्याने एका छोट्या प्लॅस्टिकच्या थैलीत ते गुलाबजामून बांधून दिले. त्या पातळ पिशवीमध्ये कोंबून भरलेल्या गुलाबजामूनचा भार जास्तच झाला होता.
गुलाबजामून खाण्याच्या आनंदात शमी झपाझप आपल्या घराकडे चालत होती. कधी एकदा घरी जातेय आणि गुलाबजामून मटकावतेय असं तिला झालं होतं. पाठीवर बॅग, एका हातात पाण्याची बॉटल आणि दुसऱ्या हातात गुलाबजामूनची पिशवी. घाईघाईत चालताना ती पिशवी फाटून जाईल याचे तिला भान नव्हते, फक्त ते कधी खाणार याकडेच तिचे लक्ष लागले होते. एवढ्यात जे व्हायचे तेच झाले. चालता चालता आचानक ती पिशवी फाटून गेली आणि एका क्षणात सारे बाराच्या बारा गुलाबजामून खाली मातीत पडले. शमीच्या आनंदाला विरजण लागले. ती रडवेली झाली. मामाने दिलेले तिच्या आवडीचे गुलाबजामून आता मातीत मिसळून गेले होते. तिला फार वाईट वाटले. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती रडत रडत घराकडे पळू लागली. आज्जी नेहमी बोलायची 'अति तिथं माती.' या म्हणीचा खरा अर्थ तिला आज कळला होता. आपण उगाच बारा घेतले, सहाच घेतले असते तर खायला तरी मिळाले असते. यापुढे हावरटपणा मुळीच करणार नाही. जे व जेवढे मिळेल तेच मुकाट्याने खाणार असे तिने मनाशी पक्के केले, आणि घरी पोहचताच मोठ्याने रडत आपल्या आज्जीच्या कुशीत शिरली.