SUNITA YUVRAJ CHAVAN

Children Stories Children

4.5  

SUNITA YUVRAJ CHAVAN

Children Stories Children

इंदू चंद्रावर पाहुणा जातो तेव्हा...

इंदू चंद्रावर पाहुणा जातो तेव्हा...

7 mins
440


  इंदू चंद्रावर पाहुणा जातो तेव्हा .......

 इंद्रनील आज शाळेतून मोठ्या उत्साहात घरी आला, आज त्याच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. उद्या पासून दिवाळी सुट्टी.........

आल्या आल्या दप्तर टेबलावर भिरकावत, सोफ्यावर जाऊन बसला...... 

     "आलास बाळा," आजीने मोठ्या प्रेमाने इंद्रनील ला कुशीत घेत विचारलं. छोटा दहा वर्षाचा इंद्रनील म्हणजे तिचा जीव की प्राण होता. "ए आजी, आपण यंदा आपल्या चंद्रावरच्या आत्तुकडे पाहुणे जाऊया का?" " यंदा नको हं बाळा, पुढच्या वर्षी नक्की जाऊयात,"

      "मी नाही जा, तू केव्हा पासून असेच सांगते आहेस, घेऊन जात नाहीयेस" इंदू घुश्शातच म्हणाला. 'हट्ट करत..करत ...बिचारा तसा झोपी गेला. ....... '

"मला चंद्रावरच्या आत्याकडे जायचे म्हणजे जायचेय", इंदू म्हणाला "अरे चंद्रावर, रात्री खूप थंडी असते तर दिवसा खूप गरम. शिवाय चंद्रावर जायला प्रवासही खूप लांबचा करावा लागतो. आता तुझी आत्याच बघ, नऊ वर्ष झाली तिला चंद्रावर जाऊन,  लग्न होऊन चांद्र लोकी गेली ती फक्त एकदाच आली होती पृथ्वीवर," " चार वर्षापूर्वी तेव्हा चांगली दोन महिने राहिली होती की तुझ्याकडे"

       "नाही . .नाही ..नाही..."इंदूंने आपला हट्ट चालूच ठेवला, 

'ठीक आहे, मी तुझ्या बाबांशी बोलते."

"माझी चांगली आजी,"असे म्हणून, इंदू आजीला बिलगला. इंदू चा जन्म झाला त्यावेळीच त्याची आई निर्वतली, आजीने त्याला लहानाचा मोठा केला. तसेच एकुलता एक असल्याने आजीची त्याच्यावर विशेष माया होती.

        आता इंदू बाबांबरोबर अंतराळ यानात बसून, चंद्रावर जायला निघाला होता, थोड्या दूरपर्यंत त्याला खिडकीतून बाहेर पृथ्वीचे विहंगम दृश्य दिसत होते, उंचच उंच इमारती अगदी छोट्या, छोट्या दिसत होत्या.डोंगर,नद्या, समुद्र, पर्वते अंतराळयानातून खूप छोटे, छोटे दिसत होते. अगदी दिवाळीला बनवल्या जाणाऱ्या किल्ल्यांएवढ्या ते पाहताना इंदूला खूप गंमत वाटली. त्याच्या आश्चर्याने विस्फारलेल्या डोळ्यातून वाहणारा आनंद त्याचे बाबा कौतुकाने पाहत होते. 

        "बाबा आपण आजीला का सोबत आणले नाही ? " किंचित नाराजीच्या स्वरात इंदू बोलला. 

"अरे आजीला एवढा प्रवास सहन होणार नाही, तसेच चंद्रावरील जीवन सुद्धा मानवणार नाही, चंद्रावर पृथ्वीसारखे अल्हाददायक वातावरण नाही, तेथे कृत्रिम वातावरण निर्मिती केली आहे आपल्या शास्त्रज्ञांनी."

"चंद्रावर पृथ्वीसारखे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र नसते,तेथील दिवस पंधरा दिवसांचा व रात्र पंधरा दिवसांची असते, म्हणजे एकदा दिवस सुरू झाला की पंधरा दिवसानंतर रात्र होते , व रात्र सुद्धा पंधरा दिवसांची असते. त्यामुळे चंद्रावर दिवसा खूप जास्त उष्णता असते व रात्री कमालीची थंडी असते, "ही सर्व माहिती इंदू अगदी विस्मयात हरवून ऐकत होता.  

       एव्हाना यानाने पृथ्वीची कक्षा सोडली होती, आता आकाश निळसर रंगाचे दिसत नव्हते, तर यानाच्या बाहेर सर्वत्र काळाकुट्ट काळोख दिसत होता. अधून-मधून चांदण्या चमकत होत्या, "बाबा बाहेर इतका काळोख का दिसत आहे?" निरागस इंदुने विचारले. 

 आपण पृथ्वीच्या कक्षेत होतो तोपर्यंत आपल्याला आकाश निळ्या रंगाचे दिसत होते कारण पृथ्वीवर बहुतांश भाग पाणी असल्याकारणाने पृथ्वी निळसर रंगाचा प्रकाश परावर्तित करते, मात्र आता आपण चंद्राचा कक्षेत प्रवेश केला आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. तो सूर्यापासून मिळणारा प्रकाश परावर्तित करतो. आपल्याला पृथ्वीवरून जो चंद्र दिसतो,तो पांढराशुभ्र दिसतो परंतु तो चंद्राचा स्वतःचा प्रकाश नाही तो सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश परावर्तित करतो, म्हणून आपल्याला चंद्र पांढरा रंगाचा दिसतो.चंद्राला स्वतःचा प्रकाश नसल्याकारणाने चंद्रावरून आकाश अगदी मिट्ट काळ्या रंगाचे दिसते आणि जे अधून मधून लुकलुकणारे गोळे दिसतात ते म्हणजे तारे आहेत,बर का इंदू."

       बोलता-बोलता इंदू आणि बाबा चंद्रावर पोहोचले, आता त्यांचे यान काही मिनिटातच चंद्रावर उतरणार होते .... दोघेही आनंदित झाले कारण त्यांना आता आत्याला भेटता येणार होते, त्यांची आत्या 'अवकाशयान' स्थानकावर त्यांची वाट पाहत होती.          

      बघता बघता यान चंद्रावर उतरले, इंदू आणि त्याचे बाबा आपल्या बॅगा घेऊन अवकाश यानातून खाली उतरू लागले, बॅगेचे वजन खूप कमी झाले होते, इंदूने चांद्रभूमीवर पाय ठेवताच त्याला नीट चालता येईना, बाबाने त्याचा हात पकडून त्याला सावरले. "इंदू चांद्रभूमीवर गुरुत्वाकर्षण कमी असते, चांद्र भूमीचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सहापट कमी असल्याने आपले वजन कमी होते, म्हणजे माझे वजन जर पृथ्वीवर साठ किलो आहे,तर चंद्रावर ते  फक्त दहा किलो भरेल, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही."असे म्हणत चांद्रभूमीवर कसे चालायचे? याचे प्रात्यक्षिक बाबा इंदूला करून दाखवू लागले,इंदूचे बाबा उड्या मारत मारत कसे चालायचे ते इंदूला शिकवू लागले, एवढ्यात त्यांची आत्या उड्या मारत मारतच त्यांच्यासमोर येऊन उभी ठाकली, आत्याला बघताच इंदू आत्याला बिलगला. 

       बाबा ,इंदू जवळच असलेल्या आत्याच्या घरी उड्या मारत मारतच गेले. चंद्रावर आत्याचा टुमदार बंगला होता. बंगल्याबाहेर आत्याचे अंतराळयान उभे होते. "बरं का इंदू, 'निल आर्मस्ट्राँग' हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव असल्याने इथे येणारा प्रत्येक जण त्यांचे आवर्जून स्मरण करतो, "आत्या इंदुला म्हणाली. "नील आर्मस्ट्राँग आणि एडविन आड्रिन यांनी चंद्रावर पहिली मानवी मोहीम यशस्वी केली, त्यानंतर खुप वर्ष पृथ्वीवरील शास्त्रज्ञ चंद्रावर मानवी वसाहत कशी निर्माण करता येईल ,याबाबत संशोधन करत होते. आणि त्यांच्या संशोधनाला आलेले फळ म्हणून आज आपण चंद्रावर असे मुक्तपणे फिरतो आहोत." आत्याचा प्रत्येक शब्दन् शब्द इंदू मोठ्या तन्मयतेने कानात साठवत होता. 

    एव्हाना बाबा आणि इंदू ताजेतवाणे झाले होते, आत्याची मुले चंद्रावरच्या शाळेतून परतली होती. इंदू त्यांच्याबरोबर खेळण्यात भान हरपून गेला होता, पहिल्यांदा त्याला एवढा मुक्तपणे खेळताना बघून त्याचे बाबा ताण रहित झाले होते. "इंदू आम्ही सुट्ट्या लागल्या की तुझ्याकडे पृथ्वीवर राहायला येऊ, " आत्याची मुलगी म्हणाली. "हो ग, जाऊ या, नक्की पण आता या सगळे फ्रेश होऊन जेवायला."

    आत्याने गरम गरम जेवण तयार केले होते, आत्याला जेवण तयार करण्यासाठी किचनमधल्या रोबोटनी मदत केली, चंद्रावर प्रत्येक कामाला रोबोट होते, उदाहरणार्थ किचन मधले रोबोट, बगीच्यात माळी काम करणारे रोबोट, कपडे धुण्यासाठी धुलाई वाले रोबोट, भांडी घासणारे रोबोट ....अशी सर्व कामे करण्यासाठी वेगवेगळे रोबोट होते. 

सर्वांनी जेवणावर ताव मारला आणि नंतर गेले त्याच्या बंगल्याभोवती च्या बगिच्यात फेरफटका मारायला...... 

     बगीच्यात फिरून झाले होते, बगिच्यात आत्याच्या मिस्टरांची एक मोठी प्रयोगशाळा होती, तिथे ते तासन् तास प्रयोग करत बसत असे, आजही त्यांनी इंदू , त्याचे बाबा आणि आपल्या पत्नीकडे पाहून फक्त स्माईल दिली आणि पुन्हा प्रयोगात मग्न झाले, त्याच्या प्रयोगशाळेत खूप सारे रोबोट होते, ते त्यांना प्रयोगात मदत करायचे. चंद्रावरील आत्याचा बगीच्या तिथल्या रोबोंनी खूप छान सजवला होता. इंदूला झोप यायला लागली, पण अजून रात्र झाली नव्हती ...."आ...ऽ...ऽ.. ताई आता झोपायची काय व्यवस्था आहे? "एक मोठ्ठी जांभई देत इंदूचे बाबा ताईला म्हणाले. "पण अजून रात्र झालेली नाहीये" इंदु म्हणाला. 

  "हो रे, बाळा पण इथे झोपण्यासाठी रात्रीची वाट नाही बघत," "झोप आली की, झोपायचं; झोप झाली की उठायचे, इथे पृथ्वीसारखा दिवस-रात्र नसतो, पंधरा दिवसाची रात्र आणि तेवढाच मोठा दिवस असल्याने, हवे तेव्हा झोपा आणि हवे तेव्हा उठा, भूक लागली की जेवा, हवे तेव्हा शाळेत जा , इथल्या शाळा 24तास चालतात कारण येथे रोबोट शाळा शिकवतात , इथले दुकानदार म्हणजे रोबोट, जास्तीत जास्त कामे इथे रोबोट कडून करविली जातात इथे मानव खूप कमी प्रमाणात आहेत व सर्व मानव मूळ पृथ्वीवासी आहेत".आत्या चंद्रा वरील जीवनाची माहिती सांगत होती आणि इंदू,व बाबा मोठ्या तन्मयतेने ऐकत होते. 

    आता इंदू ला खूपच झोप येऊ लागल्याने सर्वजण झोपण्यासाठी गेले, इंदू आत्याच्या कुशीत झोपी गेला, "ए आत्या निंबोणीच्या झाडामागे हे गाणे बोल ना...नाहीतर एखादी छानशी गोष्ट सांग इंदू ने हट्ट धरला.... "    तेव्हा आत्याने अंगाई गाणार्‍या रोबोटला बोलवलं रोबोट ने गाणं बोलायला सुरुवात केली, "निंबोणीच्या झाडामागे, पृथ्वी झोपली ग बाई.... ऽ.. ऽ... " तेव्हा इंदूला खुदकन हसू आले. .. कारण आजपर्यंत पृथ्वीवरल्या आजीने त्याला निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. ..असे गीत म्हणून झोपवले होते, आज पहिल्यांदा निंबोणीच्या झाडामागे पृथ्वी झोपली... ग बाई... ऽऽ.. 

      बारा तासांची शांत झोप झाल्यानंतर इंदू उठला," ए इंदू दादा आज तू पण चल ना आमच्या शाळेत," आत्याची मुलगी चंदा म्हणाली. "मलाही इथली शाळा पाहायची आहे," इंदू उद्गारला. आत्याने मुलीच्या शाळेत फोन करून शाळा भेटीची खास परवानगी काढली, आणि मग सर्वजण गेले चंदाच्या चंद्रावरच्या शाळेत. ....... 

       चंद्रावरच्या शाळेतील भिंतीवर मोठ-मोठ्या स्क्रिन होत्या, 

स्क्रीन वरल्या भिंतीवर लिहिलेला मजकूर शिक्षक रोबोट मुलांना स्पष्ट करून सांगत होते, इंदू पहिल्यांदा रोबोट शिक्षक बघत होता, आणि रोबोट शाळा सुद्धा.एक रोबोट पंधरा-पंधरा मुलांना एका वेळी शिक्षण देत होते. 

      खेळ ,गप्पागोष्टी, आणि विविध कृती याद्वारे रोबोट मुलांकडून विविध कृती करून घेत होते. विविध प्रयोग मुले स्वतः करून निष्कर्ष काढत होती. हवा ,माती ,पाणी यावर आधारित प्रयोग तज्ञ रोबोट यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात होते. 

    पृथ्वीवरल्या शाळेपेक्षा ही शाळा नक्कीच वेगळी होती. सर्वत्र फक्त प्रयोगप्रयोग नि प्रयोगच केले जात होते, प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपताना इंदू आणि बाबांचे जणू दिपून गेले होते. 

      वेळ कसा जात होता ते कळत नव्हते, दरम्यानच्या काळात अनेक गमतीजमती इंदू अनुभवत होता, चंद्रावरील पृथ्वी उदय, चंद्रावरील पृथ्वीच्या कला, चंद्रावरून पृथ्वी चे दिसणारे रूप पाहून इंदू अगदी वेडापिसा झाला होता, कित्ती कित्ती सुंदर दिसते आपली पृथ्वी! किती विहंगम, निळीशार, तेजपुंज, तेजस्वी, प्रकाशमान आहे हा निळाग्रह, चंद्रापासून पृथ्वीला १७ ते १८ टक्के प्रकाश भेटतो पण पृथ्वी मात्र चंद्राला ४० ते ४५ टक्के प्रकाश देते. आता आपल्या पृथ्वीविषयी त्याच्या मनात प्रेम उत्पन्न झाले होते. त्यादिवशी चंद्रावर पौर्णिमा होती, म्हणजे अर्थातच पृथ्वीवर त्या दिवशी अमावस्या असणार, होय पृथ्वीवर ज्यादिवशी अमावस्या असते म्हणजेच चंद्र अजिबात दिसत नाही त्यावेळी चंद्रावरून पृथ्वी अगदी तेजपुंज पूर्ण प्रकाशित दिसते. आणि ज्यावेळी पृथ्वीवर पौर्णिमा असते त्यावेळी चंद्रावर अमावस्या असते. 

   विश्वाचं रहस्य जसजसे इंदूला न्यात होत होतं तसं तसं त्याचं पृथ्वी प्रेम वाढत होत, चंद्रावरून पृथ्वी चे दिसणारे निळेशार मोहक रूप पाहून कुणीही वेडापिसा होऊन जाईल, इंदू तर छोटा बच्चा होता ,आता त्याला चंद्रावर राहायचं नव्हतं तर पृथ्वीवर परत यायचं होतं, "बाबा चलाना पृथ्वीवर जाऊया," मला परत जायचंय, बाबा चालना, बाबा चालना पृथ्वीवर परत जाऊया, बाबा आत्ताच्या आत्ता चला.......

    "अरे इंदू काय बरंळतोयस तू?" आजी इंदूला झोपेतून उठवत म्हणाली, काय स्वप्न वगैरे पडले काय? इंदू झोपेतून जागा झाला, आजूबाजूला बघू लागला, एव्हाना आपण पृथ्वीवर आपल्या घरीच आहोत, हे बघून त्याला हायसे वाटले. "चल उठ, लवकर तयार हो, आज आपल्याला तुझ्या आत्याकडे चंद्रपूरला जायचंय. दिवाळी सुट्टीत चंद्रपूरला खूप मजा करू या." आजी म्हणाली. 

'एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल, की, इंदू चंद्रावरची आत्या कोणाला म्हणतोय ते???? '

         

सदर कथा केवळ काल्पनिक आहे, कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी तिचा संबंध नाही. कथा केवळ काल्पनिकRate this content
Log in