Anuja Dhariya-Sheth

Inspirational Children

4.3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational Children

मायेचा मनोदीप

मायेचा मनोदीप

7 mins
886


"सहवास सोसायटी" नावाप्रमाणेच होती. सगळे एकमेकांच्या सहवासात गुण्यागोविंदाने राहायचे. सर्व जाती समभाव याप्रमाणे सगळे सण मोठ्या उत्साहात करायचे. सोसायटी मधले सर्वच रहिवासी एकोप्याने सर्व करत होते. त्यांच्यात कधी भांडणतंटा, वाद-विवाद असे काही नव्हतेच. रोज रात्री सर्व एकत्र जमायचे, दिवसभरच्या गप्पा गोष्टी चालत असत, मुले खेळत असत. प्रत्येक सण आला की त्याची तयारी करणे त्या निमित्ताने एखादा कार्यक्रम अरेंज करणे, त्यात तेवढ्याच उत्साहाने भाग घेणे... वर्षभर काहीना काही सुरू असायचेच.


बच्चे कंपनी पण हौशी होती. त्यांच्यामध्ये चिन्मय म्हणजेच चिकु. खूप हुशार मुलगा होता. वय असेल फक्त १०-१२ पण कायम दुसऱ्यांना मदत करणे आणि सतत कसले ना कसले प्रयोग करणे चालूच असायचे. त्याची आई आरती खूप काळजी करायची, कारण ह्या प्रयोगाच्या भानगडीत तो नेहमीच काहीतरी उपद्व्याप करून ठेवत असे. त्यामुळे रोज कोणी ना कोणी तिच्याकडे काही ना काही तक्रार करत असत. पण हा चिकू म्हणजे जणू त्या गोकुळातील कृष्णच होता. सतत खोड्या काढणे, काहीतरी करणे. पण त्याचे बोलणे असे होते की कोणाचाच राग जास्त राहात नसे.


तर अशी ही सहवास सोसायटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नावारूपाला यायची. कारण त्यांच्यामध्ये खूपच एकी होती. व्यक्ती तितक्या प्रकॄती याप्रमाणे मतभेद झाले तरी मनभेद मात्र ते होऊ देत नसत. दिवाळी आल्यामुळे सर्वजण एकत्र जमले, काय तयारी करायची? कसे करायचे? प्रत्येक जण वेग वेगळ्या कल्पना देत होते. सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. चिकूच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच सुरू होते. त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या मंदाताई अगदी सहज बोलून गेल्या, "ताई यंदाची आमची दिवाळी काय खरी नाय बगा..!" नवऱ्याला काय कामधंदा नाय दोन महिनं व्हायला आल्यात. मी एकटी कुठंकुठं पुरी पडू... तेव्हापासून त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असे चिकूने ठरवले होते आणि त्याचाच तो विचार करत होता.


आईला सांगितलं त्यांनी, पण आई म्हणाली असे खूप मुले आहेत तिथे तू कोणाला पुरा पडणार आहेस, सगळ्यांना देण्याएवढे आपल्याला नाही जमणार... बाबांनी पण असेच बोलून दाखवले, आजीला खूप कौतुक वाटले.. पण तिच्या वयाच्या मानाने तिला ते काही जमणार नव्हते. चिकूने लगेच आपले मित्र मंडळ गोळा केले, प्रत्येकानी आपल्या घरून दोन पुड्या, आणि आपले चांगले कपडे जे आपल्याला आता होत नाहीत असे आणायचे ठरले. हळूहळू सर्व मुले तयारीला लागली. कोणाच्याही नकळत हे सर्व सुरू होते. दिवाळीच्या खरेदीसाठी चिकू जात असताना त्याचे लक्ष मातीच्या पणत्या विकणाऱ्या काही लोकांकडे गेले, काही लहान मुले तर काही आजी होत्या. त्याला ते बघून वाईट वाटले. पण त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी त्याच्या पिग्गी बॅंकमधून थोडे पैसे काढले आणि काही पणत्या विकत घेतल्या. ताई चिडली त्याच्यावर, कारण रांगोळी सोबत ठेवायला तिला मस्त डिझाईनच्या पणत्या हव्या होत्या. चिकूने तिला एक दिवस गप्प राहायला सांगितले आणि स्वतः त्या सर्व पणत्या रंगाने रंगवून छान सजवल्या. ताई ते बघून खुश झाली. पण चिकूचे डोके मात्र वेगळ्या ट्रॅकवर गेले होते.


इकडे सर्व बच्चेकंपनी तयार असलेला फराळ आणि सोबत स्वतःचे एक-दोन जुने पण चांगले ड्रेस घेऊन ठरल्या ठिकाणी आले आणि ही सर्व टोळी मंदाताईकडे निघाली. हा प्लॅन तर सक्सेस झाला आता. पणत्या काही त्याच्या डोक्यातून जात नव्हत्या. ह्या मुलांना आलेले पाहून मंदाताईंना आश्चर्य वाटले आणि त्यांनी आपल्या मुलांसाठी तसेच आजूबाजूला ज्या बायका त्या सोसायटीमध्ये काम करत होत्या त्या सर्वांसाठी आणलेल्या ह्या वस्तू पाहून त्यांना भरून आले. काही मुलांनी तर आपली आई जी साडी जास्त घालत नाही पडून आहे अशी साडीसुद्धा आईला गोडी लावून आणली होती. तिथल्या सर्व मुलांना आनंद झाला. तिथून बाहेर पडल्यावर जवळच हे पणती विकणारे बसायचे आता त्यांच्यासाठी काही करायचे तर वेळ कमी होता. पण चिकूचे डोके मात्र सुपरफास्ट धावत होते. तो सर्व मुलांना म्हणाला, एक प्लॅन तर झाला. लगेच सर्व म्हणू लागले हो ना त्यांना किती आनंद झाला नाही. आपल्याला सर्व मागितलं की मिळते म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते. आता खरंच आपण असे हट्ट नाही करायचे. गरज नसेल तर वस्तू घ्यायच्या नाहीत. सर्व मुलांनी एक मताने ठरवलं.


चिकू मात्र हरवला होता कुठेतरी... सगळ्यांनी चिकूला हलवले... काय रे?? तसा तो म्हणाला तुम्ही साथ दिलीत तर अजून एक प्लॅन डोक्यात आहे... काही मुले घाबरून म्हणाली, नको रे बाबा आई ओरडेल आता... तसे हे महाशय म्हणतात, अरे आता दुसरे काही आणायचं नाही फक्त आपल्या पिग्गी बॅंकमधून थोडे पैसे काढायचे, आपले जुने वॉटर कलर, ब्रश... शाळेत क्राफ्टसाठी आणतो तें पेपर, टिकली अशा वस्तू घेऊन या लगेच पुढे काय करायचे ते मी सांगतो.


सर्व मुलांनी एकमेकांकडे बघितले आणि सर्व तयार झाले. लगेच सर्व सेना घरी आली. सगळ्यांच्याच आई बिझी होत्या दिवाळीच्या तयारीत. त्यामुळे मुले काय करतायत त्याच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले. खावून जा रे खेळायला. असे सांगून त्या परत आवराआवर करत होत्या. इकडे सर्व सेना जमली. आपापल्या सायकली घेतल्या आणि निघाले. एक आजीबाई आणि त्याच बाजूला थोड्या अंतरावर एक मुलगा ह्या मातीच्या पणत्या विकत होते. मुलाचे आई-बाबा नसतात, आजीचे वय झाल्यामुळे तिला आता जास्त काम होत नसते. मुलगा अगदी हिरमुसून गेलेला असतो, रडवेला होऊन आजीला म्हणतो आपली दिवाळी कशी होईल? कोणीच ह्या पणत्या घेत नाही. हे सर्व या चिकूने कालच लांबून ऐकले असते. म्हणूनच तो त्यांची मदत करायला आज आलेला असतो. आपल्या मित्र मैत्रिणींना घेऊन...


तो त्या आजीबाईला आणि त्या मुलाला त्याने सज‌वलेल्या पणत्या दाखवत बोलतो, आम्ही सर्व जण तुम्हाला मदत करू... तुमच्याकडच्या पणत्यांना सजवायला... मला माहित आहे आजी, वेळ कमी आहे परवा दिवाळी आहे... पण आपण प्रयत्न करू.... आजीच्या डोळ्यात पाणी येते... त्याच्या चेहेऱ्यावर हात फिरवून बोट मोडते, आणि म्हणते देव अजून ह्या जगात हाय... सर्व मुले तिथेच कोपर्यात बसून कामगिरी सुरु करतात... आणि आजीबाईच्या सर्व पणत्या विविध रंगानी सजून जातात... तिला खूप आनंद होतो... दुसऱ्या दिवशी काही मुले राहिलेल्या पणत्या सजवत होते तर काही जवळ असलेल्या सोसायटीमध्ये विकायला जात होते... चिकूचा मित्र टिनूने एका घराची बेल वाजवली तर ती काकू नेमकी त्याच्या आईची ओळखीची निघाली... तिने सर्व उलटतपासणी केली... टीनूला घाम फुटला...


थोड्याच वेळात सर्व बातमी फोन करून टिनूच्या आईला गेली... सहवास सोसायटीमध्ये लगेच एकमेकांना फोन झाले, खळबळ उडाली... हे ना त्या गोडबोलेेंच्या चिकूचे काम दिसतय... माने काकू रागातच बोलल्या... सगळ्या बायकांचा मोर्चा गोडबोलेंच्या घराकडे वळला... आरतीला म्हणजे चिकूच्या आईला सर्व बायकांनी फैलावर घेतले... बिचारी रडवेली झाली.. तुमचा चिकूच सर्व मुलांना काहीबाही शिकवत असतो... मागच्या काही दिवसात मुलांनी फराळ, कपडे आणि अजून बऱ्याच गोष्टी घरातून नेल्या आहेत... कसले रस्त्यावर जाऊन हे असे काम करायचे? आरती म्हणाली, अहो मला खरंच काही माहिती नाही... चिकूनेसुद्धा बऱ्याच वस्तू नेल्या आहेत... तेवढ्यात त्याची आजी मध्ये पडली आणि म्हणाली माझा "माझ्या नातवावर पूर्ण विश्वास आहे..! तो असे काहीबाही करणार नाही... मुलांना येऊ दे... तोपर्यंत उगाच काही निष्कर्ष काढू नका... सगळ्यांना आजीचे म्हणणे पटले... सर्वांनी लगेच आरतीची माफी मागितली... अगं एकदम असे ऐकायला आले त्यामुळे आम्ही घाबरून गेलो गं... आजीला सर्वजणी म्हणाल्या, आजी तुम्ही सर्व मुलांच्या लाडक्या आहात... तुम्हीच त्यांच्याशी बोला...


मुले आली तेव्हा अख्खी सोसायटी त्यांच्या स्वागताला उभी होती... आजीने सर्वांना गेटवरच अडवले, आणि सांगितलं, मला सर्व प्रश्नांची खरी उत्तरं हवी आहेत नाहीतर तुम्हाला इथेच उभे राहावे लागेल... मुले म्हणाली आम्ही सर्व खर सांगूं.. एकेक जण पुढे येऊन बोलू लागला... आपल्या इथे कामाला येणाऱ्या ताई आणि त्यांच्या काही मैत्रिणी यांच्या मुलांना आम्ही फराळ, आणि आम्हाला होत नसलेले पण चांगले कपडे दिले... आईच्या साड्यापण दिल्या... तिथून येताना कोपऱ्यावर आजीबाई होत्या... त्यांचा एक नातू होता... मातीच्या पणत्या विकत होते.. पण कोणीच त्या साध्या पणत्या घेत नव्हते.. मग चिकूने त्या घेतल्या त्याला सजवले आणि त्यांना दाखवले आम्ही तुम्हाला असे बनवून देऊ का? आजींना आनंद झाला त्या हो म्हणाल्या मग आम्ही त्यांना मदत केली आणि तिथल्या जवळच्या परिसरात विकल्या... तेव्हाच ह्या टिनूला त्या काळे काकूंनी विचारले.. आणि आम्ही घाबरलो.. आम्हाला माफ करा... आम्ही परत तुम्हाला न विचारता काही करणार नाही...


सर्व सोसायटीने टाळ्या वाजवून मुलांचे कौतुक केले. सगळ्यांना मुलांचा अभिमान वाटत होता. मुले म्हणाली, आम्ही आता खरंच कुठलाच हट्ट करणार नाही. काही मुलांना जे हवे ते मिळत नाही आणि आम्हाला मागितले की लगेच मिळते त्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत आम्हाला आता कळाली आहे. सर्व पालक वर्गाचे डोळे भरून आले. मुलांनी खूप चांगले काम तर केलेच पण चांगली शिकवण त्यांनी घेतली. तेवढ्यात दुरून एक आजी बाई येताना दिसली, मुलांनी तिला ओळखले... तिने सर्वांचे आभार मानले आणि त्यांना खाऊ दिला... आणि जे जास्त पैसे मिळाले त्यातून तिने सर्वांसाठी आकाशकंदिल आणले होते... थरथरत्या आवाजात ती म्हणाली, "ह्या पोरांनी मला केलेल्या मदतीपुढं हे लय छोट हाय... म्या दुसर काय बी आणू शकत नाय पोरांनु..." हे नक्की वापरा...


चिकूची आजी लगेच त्यांना म्हणाली, नक्कीच लावू आम्ही... हा आकाशकंदिल नसून तुमच्या मायेचे प्रतीक आहे आणि हा मायेचा मनोदीप नेहमीच झळकत राहील. दिवाळी संपल्यावर सोसायटीकडून सर्व मुलांचा ह्या चांगल्या कामासाठी सत्कार केला गेला आणि दरवर्षी मातीच्या पणत्या सजवून विकणे या शिवाय या गरजूंना प्रत्येक सणाला मदत करण्यासाठी एक ठराविक रक्कम आणि आपल्या घरात असलेल्या जास्तीच्या चांगल्या वस्तू जमा करणे यासाठी सोसायटीने "मायेचा मनोदीप" म्हणून एक छोटी संस्था निर्माण केली.


सगळ्यांच्याच मनात ही दिवाळी मात्र वेगळ्याच आदर्शाचा मनोदीप झळकून गेली आणि सर्वांची दिवाळी ही सारखी नसते याची जाणीव सुद्धा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational