Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

अनपेक्षित पाहुणा

अनपेक्षित पाहुणा

10 mins
335


माझे सासर माहेर अगदी 8 की.मी अंतरावर त्यामुळे दरवर्षी ठराविक ठिकाणी येणारे पुराचे पाणी मला काही नवीन नव्हते.. लहान असल्यापासून पूर म्हणजे मज्जा असेच बघत मोठी झाले. १९८९ साली मोठा पूर आला असे ऐकून माहीती होते, पण तेव्हा खूपच लहान होते त्यामुळे काही आठवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर १९९४ साली मोठा पूर आला होता पण तेव्हा माझ्या आईची प्रकॄती थोडी नाजूक होती, त्यात आमच्या राहत्या घराचे बांधकाम सुरू होते त्यामुळे माझी रवानगी तें अख्खं वर्ष माझ्या मामाकडे होती.. त्यानंतर आमचे नवीन घर माझ्या बाबांनी त्या वर्षी येऊन गेलेल्या पूराच्या अंदाजाने बांधले..


माझे माहेर नदीच्या अगदी जवळ, समोर सर्वांची शेते आणि एका बाजूला घरे त्यात डोंगरापासून रस्त्यापर्यंत घरे त्यामुळे समोर पाणी आले तरी डोंगरातून रस्ता असल्यामुळे तसे फार काही वाटायच नाही.. नदीतून वाळू काढायचा व्यवसाय आमच्या गावात मोठ्या प्रमाणात व्हायचा त्यामुळे खूप जणांच्या होड्या होत्या. शेतात पाणी आले की होडीतून फेरी मारताना मज्जा यायची, तेव्हा काही मोबाइल नव्हते त्यामुळे कॅमेर्यात फोटो काढायची मज्जा अजून वेगळी..


रस्त्यावर ढोपरभर पाण्यात माणसे चालायची तेव्हा वाटायचं आपणही जावं.. पण लहान असल्यामुळे भीती पण तेवढीच वाटायची. पाण्यात दिवा सोडायचो, मोठ्या मोठ्या कागदी होड्या सोडायला आवडत होत्या. मज्जा वाटायची. १९९४ नंतर मोठा पूर कधी आलाच नाही अन् घर रस्त्यापासून 9-10 फुट वरती असल्या मुळे घरात पाणी आल्यावर काय घाई उडते, हाल होतात किंवा कस काय उचलाव लागते हे काय माहीती नव्हते.. पूर म्हणजे मज्जा हि एकच बाजू बघितली होती.

--------------------------------------------

हि मज्जा मस्ती उतरवली, ती २००५ च्या पूराने.. २००५ ला मी कॉलेजला होते. तेव्हा २५ जुलै ला ज्या स्पीडने पाणी वाढलं काय सांगूं? आम्हाला काही अवधीच मिळाला नाही.. मला माझ्या बाबांनी नुकतीच नवीन स्कूटी घेतली होती जेमतेम महिना झाला होता.. पाणी वाढायला लागल्यावर गाडी आम्ही खाली असलेल्या गॅरेजमधून फळी लावुन वरती घेतली.. रस्त्यापासून आमचे घर उंचावर.. शेतांपासून ४ फुट रस्ता त्यानंतर ९-१० फुट आमचे घर त्यामुळे आमच्या दृष्टीने आम्ही गाडी सेफ लेव्हलला ठेवली होती पण पाण्याच्या मनात काही वेगळेच होते.. संध्याकाळ होताच पाणी एवढे जोरात वाढू लागले की काही वस्तू उचलायला वेळच दिला नाही त्याने..


माझ्या बाबांचे दुकान त्यामुळे बरेच नुकसान झाले, पूर आला की लाईट तर जातातच त्यामुळे काळोखात जेवढ्या वस्तू उचलता येतिल तेवढे उचलत होतो.. थोडयाच वेळात पाणी वाढू लागले आणि डोळे झोंबू लागले मग् लक्षात आले की दुकानात विकायला आणलेल्या खताच्या पिशव्या पाण्यात विरघळल्या त्यामुळे डोळे झोंबू लागले.. मग् मात्र आहे त्या कंडिशनला आम्ही वरती पहिल्या मजल्यावर जाऊन बसलो.. मग् एक एक वस्तू आठवू लागल्या, फोटो गेले, कपडे भिजले असतील, दुकानात असलेल्या वस्तूंची यादी तर न संपणारी होती.. कारण आमच्या घरात ५-६ फुट पाणी शिरले होते आणि समोर तर शेताकडे बघवत नव्हते.. समुद्रच वाट्त होता.. रात्रीची भयाण शांतता, पाउस आणि पाण्याचा आवाज.. किती देवांची नाव घेतली, देव पण पाण्यात राहिले होते.. काहीच सुचत नव्हते...


रात्र कशी तरी गेली, सकाळ झाली तरी घरात १ फुट पाणी होते, समोर बघायची तर हिम्मत होत नव्हती.. पण डोंगरातून रस्ता होता त्यामुळे दूध घेऊन रोज येणारा दादा आले, दुकानात कामाला असलेली माणसे जी रात्री आमच्या कडेच थांबली होती ती सुद्धा त्यांच्या घरी जाऊन आली.. पाणी काही कमी होत नव्हते.. सकाळ झाल्यामुळे भयाण वाटत नसले तरी भीती मात्र कमी झाली नव्हती.. रस्त्यावर असलेल १०-१२ फुट पाणी बघून पोटात कससे होत होते.. समोर तर अथांग सागर.. कॊणी कोणाला दिसत नव्हते, तेव्हा काही मोबाइल नव्हते त्यामुळे कोणाचे काही अपडेट कळत नव्हते.. दुपार होईपर्यंत सर्व आवारा आवार करायला घेतली होती.. मी माझ्या त्या नव्या स्कूटीकडे रडवेली होऊन पाहत होते. चप्पल इकडे तिकडे झाल्या होत्या.. असा हा अनपेक्षित आलेला पाहुणा आमचे घरच हलवून गेला.. डोक काहीच काम करत नव्हते..


डोंगरातून जाणार्या रस्त्याने येऊन काही माणसे सुख फरसाण, बिस्कीट अश्या वस्तू घेऊन गेले, पाणी कमी होवो न होवो भूक तर लागतेच ना.. बरेच जण खाली घरात पाणी आल्या मुळे डोंगरात रहात असलेल्या नातेवाईकांकडे गेले होते.. अचानक चार वाजता जोरात आवाज झाला, वाचवा, वाचवा जोरात किंकाळ्या... समोर १०-१२ फुट पाणी आणि वरून डोंगर खाली आला.. डोळ्या समोर असणारी किती तरी माणसे त्या मातीच्या ढिगाखाली गाडली गेली.. सगळीकडे हाहाकार.. सैरावरा पळत सुटली माणसे.. बाहेरच्या बाजूला असलेली माणसांना होडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, बाकी आतल्या बाजूला आलेली माणसे आमच्या घरात आली त्या रात्री आम्ही ७० माणसे घरात होतो.. काळोख झाला लाइट नाही.. पाणी कमी झाले नव्हते.. त्यात हि घटना आम्ही लहान मुले तर भीतीने कापत होतो.. मोठी माणसं आम्हाला दाखवत नसली तरी आतून तुटली होती.. अख्खी रात्र अशीच घालवली... दुसऱ्या दिवशी रस्त्यावरचे पाणी उतरले तरी शेतात पाणी होते. जिथे दरड आली तिथे तर कमरेएवढा चिखल होता.. त्यातून आम्ही तिथूनच जवळ राहत असलेल्या माझ्या चुलत्यांकडे गेलो.. असा हा पूर आणि त्यात कोसळलेली दरड अनपेक्षित पाहुणे म्हणून आले आणि किती तरी जणांचे जीव त्यात गेला.. डोळ्यासमोरची ५०-५२ माणसे त्यात गेली खूप धक्कादायक दिवस होता तो २६ जुलै २००५...

---------------------------------------

त्यानंतर मात्र पाऊस, पूर म्हटलं की भीती वाटते ती अजूनही.. दरड कोसळली तर काय या भीतीने कापायला होते.. नंतर मधली बरीच वर्ष अशीच गेली.. हा पाहुणा काही आदरातिथ्य करून घ्यायला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आला नाही.. त्यामुळे हुशss वाट्त होते पण आपल्याकडे आला नाही तरी केदारनाथला झालेली घटना, पूरात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस या बातम्या ऐकायला मन काही धजत नव्हते.. अगदी दोन वर्षा पूर्वी सांगली, कोल्हापुरच्या बातम्या सुद्धा बघताना आणि ऐकताना घाबरून जायला होत होते.


माझे लग्न २०११ ला झाले त्या नंतर मात्र आमच्या भागात काही तेवढा जोरदार पूर आला नव्हता.. त्यामुळे काळ हेच औषध या प्रमाणे मनात असलेली भीती आता कमी झाली असली तरी जरा पाऊस झाला की माहेरी वरून येणारे अनपेक्षित पाहुणे म्हणजे मोठे मोठे दगड काही दरडीची भिती कमी होऊ देत नव्हते.. त्यात भर म्हणजे २०१५ला आमच्याकडे कामाला येणार्या एका नोकराची बायको वरून मोठा दगड आला आणि गेली.. त्यामुळे पावसात सारखे आईला फोन करणे, फोन लागला नाही तर मनात वाईट विचारांची गर्दी व्हायची.. हे सर्व किती नाही म्हटलं तरी व्हायचच...

--------------------------------


२०१६ साली समजले की अनपेक्षितपणे येणारा पाहूणा म्हणून ज्या पूराला दोष देत होतो किंवा मनात भीती बाळगून होतो त्या पूराच्या मागचे कारण तर अजूनच अनपेक्षित होते.. आता याला काही लोकं श्रद्धा म्हणतील काही अंधश्रद्धा म्हणतील पण जुन्या जाणत्या लोकांनी जे अनुभवल तें आम्ही पण अनुभवल म्हणून असेल. सांगतें मी उगाच कोड्यात पाडत नाही तुम्हाला... तर २०१६ ला माझ्या छोट्याचा जन्म झाला, त्यामुळे त्याला न्हाऊ घालायला जी सुईण यायची तिने आम्हाला सांगितले की, काळ आणि सावित्री अश्या आमच्या जवळच्या दोन नद्या आहेत त्यांचा जिथे संगम होतो त्या संगमावर कोणती नदी पहिली येते यांवर त्या वर्षी येणारा पूर आणि संकट अवलंबून असते. सावित्री नदी जर पहिली आली तर धोका नसतो पण काळ नदी मात्र माणसाचा काळ होऊन येते.. हे ऐकल्यावर पोटात धस्स झालं.. विश्वास बसत नव्हता तेव्हा तिनेच सांगितलं जेव्हा जिवितहानी झाली तेव्हा काळ नदीच पहिली आली होती.. आतापर्यंत येऊन गेलेल्या पूराचा तिने पाढा वाचला जो मी वरती लिहिला आहे तोच.. तरी आमचा विश्वास बसत नव्हता, तेव्हा तिने सांगितल या वर्षी म्हणजेच २०१६ ला सुद्धा काळ नदीच पहिली आले.. तरी आमचा विश्वास बसत नव्हता, तीने सांगितल तेव्हा चार दिवसांनी आषाढ अमावस्या होती, मुसळधार पाऊस, नदीचे वाढते पाणी अन् त्याच सोबत या अनपेक्षित पाहुण्याची भिती..


२ ऑगस्ट २०१६ ला आषाढ अमावस्या होती, जोरात पाऊस पडत होता आणि शेवटी परत एकदा काळ नदीने तिचे रूप दाखवले, आमच्या इथून काही अंतरावर असलेला सावित्री पूल तुटला, पूल तुटला आहे हे लक्षात येई पर्यंत अनेक गाड्या आणि त्यात अनेक जीव वाहून गेले, वाच‌वा वाचवाच्या आर्त किंकाळ्या येत होत्या पण रात्रीची वेळ त्यामुळे कोणाला काही समजले नाही, अन् जेव्हा समजले पूल तुटलाय तेव्हा त्या किकांळ्या आठवल्या पण काहीच उपयोग नव्हता, वेळ निघून गेली. तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिवितहानी झाली होती.. तेव्हा पासून अनपेक्षित पाहुणी म्हणून येणारी हि काळ नदी मनाचा भीतीने थरकाप उडवते...


------------------------------

आता नुकताच मागच्या वर्षी २२ जुलै २०२१ ला येऊन गेलेला पूर त्यामुळे ह्या सर्व आठवणी परत एकदा जाग्या झाल्या.. ह्या वर्षी चा हा पूर म्हणजे खरोखरच अनपेक्षित पाहुणा ठरला हे मात्र खर.. कारण ज्या व्यक्तीचे वय ९४ आहे त्या व्यक्तीने सुद्धा एवढ पाणी कधीच बघितल नाही असा हा पूर पाहुणा म्हणून आला आणि जाताना सर्वांच सर्व काही घेऊन गेला.. जान है तो जहान है असे किती जरी म्हटलं तरी काडी काडी करून जमवलेला संसार जेव्हा डोळ्या देखत मातीमोल होतो तेव्हा काय वाट्त हे शब्दात सांगता येणार नाही.. जेव्हा जनावर सोडून द्यावी लागतात तेव्हा डोळ्यात येणार पाणी आणि कंठाशी आलेला आवंढा गिळत स्वतःच्या भावनांना बांध घालावा लागतो. आता आलेला हा अनपेक्षित पाहूणा खरच न भूतो न भविष्यती असा होता. दरवर्षी येणारा हा पाहुणा ह्या वर्षी मात्र सैरभैर वागला.. त्याच्या आगत स्वागताची तयारी काही वेगळीच असते, सामानाची हलवाहलव, गाड्या नेऊन ऊंच जागेवर लावणे, चिमुकले हात सुद्धा मदतीला सरसावतात सगळे अगदी स्वागताची जोरदार तयारी करतात. पण या वर्षी मात्र या पाहूण्याचे आदरातिथ्य आम्हाला काही झेपलेच नाही. त्याची मर्यादाच त्याने आेलांडली, कोणाचा संपूर्ण तळमजला, कोणाचा पहिला मजला तर कोणाचा दूसरा मजला एवढी त्याने पातळी वाढवली, असे जर झाले तर दरवर्षी तूझा पाहुणचार करणे कसे बरे जमेल आम्हाला? पण आला होता तोच मनात राग घेऊन वाढता वाढता वाढत गेल्या ह्या पाहूण्याच्या अपेक्षा.. त्याला दरवर्षी मिळत होती ती ठराविक जागा कमी पडली त्याला अजून जागा हवी होती..


सगळे रडवेले झाले, हतबल झाले, काहीना रेस्क्यू करून पत्रे फोडून, ग्रील तोडून बाहेर काढण्यात आले. काहींनी तर पत्र्यावर बसून एकट्यानेच झूंज दिली, काहीनी साडीची झोळी, काहीनी शिडी, दोरी, तेलडबे आधार घेत जीव वाचवला.. पण संसार त्याच काय तो मात्र हा पाहूणा उध्वस्त करून गेला होता. खायला अन्न नाही, घालायला वस्त्र नाही.. उतव आला की उत्सव वाटायचा आधी पण आता मात्र या पाहूण्याने नाकात दम आणला. कोणाची दारं तुटली, कोणाची खिडकी तुटली, कोणाचे शटर उघडले गेले, कोणाचे बांध तुटले तर कोणाची भिंत खचली.. चारही बाजूने पाणीच पाणी... दुसऱ्या दिवशी हळू हळू पाणी उतरू लागले, एक रात्र राहिलेल्या या अनपेक्षित पाहुण्याने खूप पाहुणचार घेतला, बऱ्याच गोष्टी घेऊन गेला.. घरातील प्रत्येक कोपर्यात खेळून त्याच्या खूणा सोडून गेला. या वर्षी सुद्धा संगमावर काळ नदी पहिली आली होती हे समजताच भीती मुळे अजून लटपटायला झाले. पण सुदैवाने जिवीत हानी झाले असे ऐकायला तरी आले नाही.. पण हीच नदी माझ्या माहेरी सुद्धा जवळून जाते, तिथे काही बॅटरी असलेले हात वाचवा वाचवा करत नदीच्या पाण्यातून गेले, अर्थात रात्रीची वेळ असल्यामुळे पुढे काही कळले नाही.. पेपर, लाईट नव्हते त्यामुळे बातम्यांचे अपडेट नाहीत.. जवळच एका गावात दरड कोसळली हे मात्र ऐकण्यात आले. पण तें गाव आणि माझे माहेर बरेच लांब त्यामुळे तिथली बरीच माणसे दरडीत गाडली गेली..


आड्याला लागलेल पाणी, सगळीकडे झालेला चिखल, एवढ्या वर्षात साठवलेले सार काही घेऊन गेला.. कसं आवरायच? काय सावरायच या विचाराने मेंदू थकून गेला? साफसफाई साठी सुद्धा कुठून सुरुवात करायची हेच कळत नव्हते. सगळीकडे चिखलाचे थर.. रडवेली अवस्था, सासूबाई अतिशय घाबरल्या, मुले केविलवाणी झालेली, आंघोळीला पाणी नाही, प्यायच पाणी संपत आलेले, घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत पूराचे पाणी शिरलेले.. छोटा तर आई दूध हवंय म्हणून रडत होता.. आणि या सार्यांकडे बघून उसन अवसान आणून डोळ्यात आलेले अश्रू तिथेच रोखून मी सर्वांसाठी भात ठेवला, कुकर लावला.. वातावरण कसेही असले तरी जेवल्याशिवाय कशी काय ताकद येणार हो... भांडी घासायला सुद्धा पाऊस पडल्यावर पागोळीचे पाणी वापरले.. रोखून ठेवलेल्या अश्रूंमुळे आवाज फुटत नव्हता.


तितक्यात ताई ताई हाक मारत चिखलातून सावरत माझा चुलत भाऊ दूध आणि बिस्कीट घेऊन आला.. दुसऱ्याच दिवशी मामा त्याची मुले, भाजी, प्यायचे पाणी, पीठ आणि बहिणीने पाठवलेला सुका खाऊ घेऊन आले. डोळ्यात आलेले पाणी सावरत परत एकदा त्यांच्या प्रेमाने मला उभे केले.. तिसर्या दिवशी माझा मावस भाऊ आला मुंबईहून.. पुलाव, थेपले, माझ्या मुलांसाठी टुथब्रश पासून लॉलीपाॅप पर्यंत सारं काही वहिनीने आठवणीने त्याच्या सोबत दिले होते. फोन लागत नसताना सुद्धा सॅनिटरी पॅड, फिनेल, तसेच काही पुसायला लागल तर फडकी आणि खूप सारा खाऊ घेऊन दादा आला.. त्या पुलाव- थेपल्यातून तर वहिनीच्या मायेचा दरवळ येत होता.. शेवटी टेरेसवर जाऊन फोन केला अन् वहिनीशी फोन वर बोलताना एवढे दिवस दबलेल्या भावनांचा बांध सुटला... कोणताही प्रसंग आला तरी सख्खा भाऊ नाही याची कमी माझे हे पाठीराखे मला कधीच जाणवू देत नाहीत..

धावत पळत चिखलातून भाजी,पाणी,पीठ घेऊन येणार्या पाठीराख्या भावांच्या मायेचा गंध त्यांनी दिलेल्या आधाराच्या स्पर्शातून,वस्तूंमधून दरवळत होता,अश्रुंचा पाऊस मात्र अव्यक्त भावनादेखील व्यक्त करत होता.


तो पाहुणा जाऊन २० दिवस झाले तरी त्याने केलेला पसारा आम्ही आवरतोय. प्रत्येक गोष्ट किती वेळा धुवायला लागतें, साध्या पाण्याने साफ़ करा, डेटॉल लिक्वीडचे पाणी वापरा.. फिनेलने लादी साफ करा... काय तो सोहळा? असे हसत हसत म्हणायचं म्हणजे दूःख कमी होते बाकी काही नाही..


ती काळरात्र आठवली कि अजूनही डोळ्यातून पाणी वाहू लागते, हे पाणी नुकसान झाले म्हणून नाही तर या एक दिवसीय पाहूण्याने घातलेला पसारा आवरताना हतबल झाल्यामुळे येतंय. प्रत्येकाच अंग मोडून आल होतें, धंदे ठप्प झाले होते.२० दिवस झाले तरी वातावरण पुर्वव्रत झाले नव्हते. सर्व विचारानी मन थकून गेले होते.. कारण यातून होणार्या मानसिक त्रासाच्या लाटा माणसाला त्रास देतात हे मात्र नक्की..


या अशा प्रसंगात मदतीचा महापूर आला जात, धर्म, पंथ या सार्याचा मात्र या अनपेक्षित पाहुण्यामुळे विसर पडला..


काय गेले, किती गेले कसला हिशोब मांडू सांग...

मदतीसाठी मात्र लागली खूप रांग...

जात,धर्म, पंथ गेले सगळे विसरून...

माणुसकी हा एकच धर्म बाकी गेले विरून...


एवढ होऊन सुद्धा ह्या पाहुण्याकडे सकारात्मक दॄष्टीने बघायचं, शून्यातून का होईना नव्याने सुरुवात करायची, आपल्यापेक्षा ज्याची परीस्थिती जास्त त्रासदायक आहे त्याचे बघून आपले बरे म्हणायचं आणि आयुष्य पुढे जगायचं कारण कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेत म्हटलेलेच आहे "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..." परत एकदा भरारी घ्यायची हे मात्र नक्की..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational