Anuja Dhariya-Sheth

Classics

4.1  

Anuja Dhariya-Sheth

Classics

सासूबाई..मी माझी हौस करणारच

सासूबाई..मी माझी हौस करणारच

4 mins
543


आमच्या आशुला ना भारीच वेळ लागतो बाई आवरायला.. सासूबाई खोचक कौतुक करत बोलत होत्या.. आशुचे डोळे भरून आले..


नवीनच लग्न झालेलं त्यात साडीची सवय नाही त्यामुळे थोडा जास्तच वेळ लागत होता तिला.. तिलाही ते कळंत होते, पण सवय होईपर्यंत सर्वानी समजून घ्याव एवढीच माफक अपेक्षा होती तिची.. त्यात साडी नवीन असेल तर नेहमीं साडी नेसणार्या बायकांनाही नेहमीं पेक्षा जास्त वेळ लागतोच की.. पण जाऊदे ह्यांना कोण बोलणार? असा सर्व विचार करत आशूने स्वतःला सावरले..


सासू बाई मात्र स्वतःचाच हेका पूरा करायला बघत होत्या.. आशुने तिथून काढता पाय घेतला आणि तिच्या वयाच्या सूना असलेल्या ग्रुप मध्ये येऊन बसली.. ती नवीन त्यामुळे तिची चुलत जाऊ सर्वांशी ओळख करून देत होती.. साऱ्या जणी तिच्या कडे पाहत होत्या.. कोणाला साडी आवडली तर कोणाला सेट.. सर्व जण कौतुक करतायत हे पाहिल्यावर सासूबाईंना कौतुक वाटायच्या ऐवजी राग येतं होता हे बघून आशू खूप कोड्यात पडली.. पण नवीन नातं त्यामुळे शांत राहणे पसंत केले.


काही दिवसांनी बघते तर काय प्रत्येक गोष्टीत सासूबाई नाक खुपसू लागल्या.. बाहेर जाताना ती आवरायला गेली की बाहेरून नुसता आरडाओरड.. तिची खूप चिडचिड व्हायची.. पण तरीही ती स्वतःला शांत करत होती.. प्रत्येक पहिला सण तिला खूप हौशीने साजरा करायचा असे, पण सासूबाईंना कसली हौसच नाही.. एवढी मेहंदी काढू नको.. असे कपडे घालु नको, गळ्यात केवढे मोठे घातलेस, कानात एवढे मोठे कशाला? कमरपट्टा कशाला? नथ कशाला?.. तिला त्यांच्या या टोकण्याचा खूपच कंटाळा आला होता..


साडी किंवा ड्रेस घेताना सुद्धा हा कलर नको, हि डिझाइन नको..


तिच्या नणंदेचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले, तिच्या साठी वरसंशोधन चालू केले, तेव्हा तिला बघायला आलेल्या पाहूणे मंडळींसमोर सासूबाई लेकीच कौतुक करत होत्या, हल्लीच्या मुलीना सवय नसते त्यामुळे वेळ लागतो आवरायला त्यात त्यांना नटायला मूरडायला भारी आवडते, अहो हेच तर वय असते ना.. सासूबाईंचे हे बोलणे ऐकून आशू बघतच बसली.. पण घरात पाहुणे त्यात आतेसासुबाई आल्या होत्या त्यामुळे तिने शांत राहण पसंत केले..


सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर मात्र सासूबाई खोचकपणे बोलल्या, काय ग नंदीनी? एवढा का वेळ लागला तूला? तुझ्या वहिनीची सवय घेऊ नको बाई.. तुम्हाला सांगतें वन्स.. असे सासूबाई बोलताच आशू गप्प बसली नाही.. नेहमीं तुम्ही मला का बोलता? आज नंदीनीला उशीर लागला तर तिची बाजू सावरायचा प्रयत्न करत होतात का तर ती तुमची मुलगी आहे म्हणून.. आणि मी सून म्हणून मला बोलता.. पण मी सुद्धा ह्या हल्ली च्या जमान्यातीलच आहे, मी काय लग्ना आधी रोज साडी नेसत नव्हते.. मलाही ह्या सर्व गोष्टीची सवय नव्हती.. आणि मला काय माझ्या आईने जुन्या साड्या दिल्या नव्हत्या, मी सुद्धा नवीन कोर्या साड्या घेऊनच आले होते.. पण तुम्ही मला कधी निर्या व्यवस्थित करायला मदत केली नाही की साधी पीन लावायला मदत केली नाही.. स्वतःचे स्वतः करायला मला वेळ लागत गेला आणि प्रत्येकाला तुम्ही किती खोचकपणे सांगता ना ते मला माहीती आहे.. पण प्रत्येक गोष्टीत मी तुमचे ऐकणार नाही, मला जे आवडते ते मी करणारच.. आणि हो नटणे मुरडणे ह्या वयातच करतात असे तुम्हीच आता म्हणालात.. माझे ही वय फार काही झाले नाही, त्यामुळे मला आवडते तें मी सर्व करणार, दागिने घालणार...


आशु तिथुन गेल्यावर आत्याबाईंकडे बघत सासूबाई हात फलकवत म्हणाल्या, हे असच आहे बाई.. हल्ली च्या ह्या मुली...


तेवढ्यात आत्या मोठ्याने बोलल्या, वहिनी अहो बसं आता.. तुमचा सुरुवातीचा काळ देखील असाच होता की हो? तरी एक बरं तुम्हाला नटण्या -मुरडण्याची आवड नव्हती नाहीतर त्या गोष्टी साठी अजून एक तास जास्त गेला असता... आणि एकच हशा पिकला..


सासूबाई रागाने आतल्या खोलीत जाणार तोच आत्या बाई म्हणाल्या, अहो वहिनी रागावू नका.. पण माझ्या आईने केली किंवा फार पूर्वी पासून अनेक सासू करत आल्यात तीच चूक तुम्ही करताय, म्हणून जुना विषय काढला मी.. काही वेळा पूर्वी तुम्ही नंदूला पाठीशी घातलेत तसेच आशूला घालून बघा..


सासूबाईंना त्यांची चूक समजली.. आतापर्यंत खूप वेळा मी तीचं मन दुखावलय असे म्हणत त्या आत गेल्या.. स्वताला घेतलेली पैठणी तिला देत म्हणाल्या, नंदूच्या लग्नात हीच पैठणी घाल आणि हो माझी सून मला नखशिंखात नटलेली हवी बर का? कशी उठून दिसली पाहिजे अशी सजून तयार हो, तुझी सगळी हौस पूर्ण करू आपण..


सासूबाईंचे हे बोलणे ऐकताच आशूला खूप आनंद झाला, तीने देखील त्यांची माफी मागितली आणि आत्या सासूबाईंचे आभार मानले..


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून..


अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics