चला जाऊ माकडाच्या दवाखान्यात!
चला जाऊ माकडाच्या दवाखान्यात!
तिसऱ्या वर्गातील शिक्षक कामानिमित्त शाळेच्या कार्यालयात गेल्याची संधी साधून मुले धिंगामस्ती करीत होती. त्यांचा चाललेला गोंधळ ऐकून त्यांचे शिक्षक घाईघाईने वर्गात शिरले. त्यापूर्वी त्यांच्या येण्याची चाहूल लागताच मुले चिडीचूप झाली. जणू काही घडलेच नाही. मुलांची ती शांत बसण्याची तत्परता आणि समयसूचकता पाहून मनोमन चिडलेल्या शिक्षकांना थोडे समाधान झाले. वर्गात येताच त्यांची दृष्टी सर्व मुलांवर फिरू लागली आणि त्यामुळे मुलांची पाचावर धारण बसली. शिक्षक म्हणाले,
"मी तुम्हाला आता दवाखान्यात घेऊन जातो..."
ते ऐकून मुले जास्तच घाबरली. कुणी भीतीने थरथर कापू लागले तर कुणाची भीतीने घाबरगुंडी उडाली. एक मुलगा घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला,
"क..क..का सर?"
"सर, दवाखान्यात नको ना. मला इंजेक्शनची खूप भीती वाटते हो. " दुसरा एक मुलगाही त्याच अवस्थेत म्हणाला. इतर मुलांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून गुरुजी हसत म्हणाले,
"अरे, घाबरू नका. मी तुम्हाला दवाखान्यात नेतो म्हणजे दवाखान्याची गोष्ट सांगतो..." गुरुजींचे गोष्ट सांगतो हे शब्द ऐकून मुलांची भीती कुठल्या कुठे पळाली. सारी मुले सावरून बसली.
"तर मी आज तुम्हाला माकडाच्या दवाखान्यात म्हणजे माकड डॉक्टर असलेल्या दवाखान्याची गोष्ट सांगणार आहे. डॉक्टर माकड यांचा दवाखाना एका वखारीत होता..."
"सर, वखार म्हणजे काय हो?"
"वखार म्हणजे लाकडांचा कारखाना. तिथे लाकडे विकत मिळतात. कुणाला खरे वाटेल, कुणी खोटे म्हणू देत पण माकड डॉक्टरांच्या दवाखान्यात खूप आजारी लोक येत असत. डॉक्टर माकड त्यांना औषध तर द्यायचे पण सोबत सल्लाही देत असत. चला तर मग आपण दवाखान्यात आलेल्या एक- एक आजाऱ्यास भेटूया. चालेल ना?"
"हो sss ..." मुले एका आवाजात ओरडली.
" डॉक्टर असलेल्या माकडाला आपण भेटूया. माकडाने घातली होती छानशी विजार..."
"सर, विजार म्हणजे काय हो?"
"अरे, ती एक प्रकारची पँट असते. जुन्या काळातील लोक ज्या पँट वापरायचे त्याला विजार म्हणत असत. तर अशी विजार घातलेल्या माकड डॉक्टरांच्या डोक्यावर एक हॅट होती. त्या डॉक्टरांना एक सवय होती. ते की, नाही सतत सिगारेट पित असत..."
"पण सर, सिगारेट पिणे चांगले नसते. त्यामुळे आजार होतात हे त्या माकडाला माहिती नव्हते का? आणि ते तर डॉक्टर होते."
"बरोबर आहे तुझे पण कसे आहे डॉक्टर म्हटले की, सारे घाबरतात की नाही. आता तुम्हीही घाबरलात ना. त्यामुळे भीतीपोटी कुणी त्या डॉक्टरला सिगारेट ओढू नका असे सांगत नसे. तर त्या दवाखान्यात पहिली रोगी आली एक बाई, तिचे नाव कोकिळाताई...."
"सर..सर, कोकिळा म्हणजे ती सकाळी सकाळी 'कुहू...कुहू ' करते तीच का?"
"अगदी बरोबर. काय झाले, तू म्हणतोस तसे सारखे ओरडून ओरडून तिचा गळा झाला खराब.गळा लागला दुखायला. ती आली डॉक्टरकडे. डॉक्टर माकड यांनी तिला तपासले. ते म्हणाले,
"घाबरू नका. थोडा धीर धरा. कळ सोसा. 'आ' करा बरे...."डॉक्टरांनी सांगितले आणि कोकिळेने 'आ' वासला. ते पाहून डॉक्टर म्हणाले,'व्वा! छान!' असे म्हणून माकडाने चिमटीत पकडला एक काजवा....."
"काजवा? तो काय असतो ?" एका विद्यार्थ्याने विचारले.
"अरे, काजवा म्हणजे एक प्रकारचा किडा. तो की नाही रात्रीच्या अंधारात फिरत असतो. कोकिळेचा गळा आतून डॉक्टरला पाहायचा होता म्हणून त्यांनी एक काजवा चिमटीत पकडला आणि कोकिळेच्या चोचीत सोडला आणि त्या प्रकाशात ते कोकिळेचा गळा बघू लागले. गळा तपासून चिमटा बाहेर काढताच कोकिळेने विचारले,
"काय झाले डॉक्टर?"
"गंडमाळा... म्हणजे टॉन्सिल्स झाले आहेत तुम्हाला. त्यामुळे गळा झालाय लालेलाल..."
"मग आता?" कोकिळेने घाबरून विचारले.
"सर, मलाही टॉन्सिल्स झाले होते. मी की नाही आइस्क्रीम खूप खात होतो. डॉक्टरांनी मला आइस्क्रीम खाऊ नका असे सांगितले.तेंव्हापासून मी आइस्क्रीम खाणे बंद केले. ती कोकिळाही आइस्क्रीम खात होती का?"
"खातच असणार त्याशिवाय का गळा सुजतो ?" दुसऱ्या मुलाने विचारले.
" खात असेल किंवा नसेल पण माकड म्हणाले,आता भरपूर विश्रांती घ्या. उन्हात जायचे नाही. महत्त्वाचे म्हणजे चार महिने मुळीच गायचे नाही. आरा
म करा. कमी होईल. मला बारा कैऱ्या आणून द्या..?"
"कैऱ्या कशासाठी?" मुलाने विचारले.
"डॉक्टर कोण होते? माकड. मग त्याला पैसे काय करायचे? फिस म्हणून त्याने कैऱ्या मागितल्या असतील. बारा कैऱ्या मागून डॉक्टर म्हणाले, भंबेरी भंबेरी भम् !"
"आता हे काय..."
"म्हणजे ह्या वाक्यातून डॉक्टरांचा विनोदी स्वभाव लक्षात येतो. ह्या वाक्यातून ते म्हणतात, बघ कशी केली तुझी फजिती. भंबेरी म्हणजे फजिती. असे म्हणत लगेच त्यांनी दुसऱ्या आजाऱ्यास बोलावले. कोकिळा गेली आणि डॉक्टरांसमोर आले, पिंपळाच्या झाडावर बसणारे दिवाभीत.."
"दिवाभीत म्हणजे?"
"अरे, दिवाभीत म्हणजे घुबड. त्याला पाहताच डॉक्टरांनी विचारले, काय होतेय तुम्हाला?"
"मला की नाही, भरपूर भूक लागत नाही. रात्री झोप लागत नाही. " ते ऐकून माकड म्हणाले,
"बसा इथे. डोळे नीट उघडा. जीभ दाखवा बरे....." असे म्हणत डॉक्टरांनी घुबडाला तपासायला सुरुवात केली आणि मध्येच घुबडाने विचारले,
"डॉक्टर, असे का होते? असा त्रास का होतोय?" डॉक्टर माकड त्यावर ऐटीत म्हणाले,
"जागरण.... जागरण... रात्री जागता. उगाच रात्रभर ओरडत फिरता. मग असे होणारच. एक काम करा, रात्री जागायचे नाही. दिवसा झोपायचे नाही. त्याचबरोबर पावसात बाहेर भटकायचं नाही. भिजायचं नाही. अंधारात भटकू नका. फार विचार करून तब्येत बिघडून घेऊ नका. माझ्यासाठी अंड्याचे कवच घेऊन या आणि मग औषधी घेऊन जा. भंबेरी, भंबेरी भम्..."
"काय पण, डॉक्टर, फिस म्हणून अंड्याचे कवच मागतात.... " एक मुलगा विचारत असताना दुसरा मुलगा त्याला अडवून म्हणाला,
"अरे, ते डॉक्टर आहेत, वाट्टेल ते फिस मागतील. सर, नंतर कोणता पेशंट आला हो?"
"नंतर आली भीत भीत मनीम्याऊ. तिच्या सोबत होता बोक्या."
"बोक्या आजारी होता काय? काय झाले होते?" मनीताई आल्या आल्या माकड म्हणाले, " अरे, मनीताई, या. या. बसा. असे माझ्याजवळ बसून सांगा, कोण आहे आजारी? बोकोबा आजारी आहे की हा पिल्लू-टिल्लू बिमार आहे? "
"डॉक्टर, डॉक्टर या बोकोबाला तपासा नीट. याला आला खोकला आणि चुलीपुढे ओक ओक ओकला.ह्याच्यासाठी द्या औषधी." बोकोबाला तपासताना माकड म्हणाले,
"ताई, सांगा जरा बोकोबाला, कुणाच्या ही घरी जाऊन चोरून चोरून दहीदूध खायचे नाही. महत्त्वाचे म्हणजे उंदीर तर मुळीच खायचे नाहीत. उंदराच्या शोधात अडगळीच्या ठिकाणी म्हणजे जिथे पसारा असतो, धूळ असते, जाळेजळमटे असतात अशा ठिकाणी मुळीच जायचे नाही. गोळ्या देतो बडगा छाप... "
"ह्या कोणत्या गोळ्या?"
"अरे, बडगा म्हणजे सोटा, रट्टा... ऐका डॉक्टर काय म्हणाले ते डॉक्टर म्हणतात ह्या गोळ्या म्हणजे दर दोन तासांनी बोकोबाला चांगले सोटे हाणा. भंबेरी भंबेरी भम्..."
"सर, मला की, नाही ही भंबेरी खूपच आवडली बघा.."
"हो. मलाही खूप आवडली. सर, त्यानंतर माकडाच्या दवाखान्यात कोण आले हो?"
"हीच तर खरी मजा आहे. त्या वखारीचा म्हणजे त्या लाकडाच्या दुकानाचा मालक तिथे आला. आपल्या दुकानात भलतेच प्राणी शिरलेले पाहून त्याला भयंकर राग आला."
"अरे, बाप रे! मग काय झाले?"
"त्याला बघताच डॉक्टर माकड हे स्वतःच घाबरले. घाबरलेल्या माकडाला पाहून मालकाने जवळ पडलेली एक काठी उचलली. एक जोरदार रट्टा त्याने माकडाच्या पाठीवर मारला. त्या तडाख्याने माकड अजून घाबरले. मालकाने एका मागोमाग एक रट्टे चालूच ठेवले. इकडून तिकडे पळताना माकडाची शेपटी एका लाकडात अडकून बसली..."
"मग?" एका मुलाने विचारले.
"मग काय? दे दणादण! मालकाने माकडाला खूप मारले. त्यामुळे माकडाचे तोंड सुजले. त्याला बोलताही येत नव्हते आणि पळताही येत नव्हते. आता डॉक्टरच आजारी म्हटल्यावर कशाचे औषध आणि काय? मालकाची काठी आणि माकडाची पाठ...काय झाले असेल?"
"भंबेरी, भंबेरी, भम्...." मुलांनी शिक्षकाला अपेक्षित अशी साथ दिली आणि तितक्यात परवंचा म्हणण्यासाठी मैदानात जमण्याची घंटी वाजली. त्याबरोबर सारे विद्यार्थी....'भंबेरी... भंबेरी भम्'
असे म्हणत शाळेच्या मैदानाकडे निघाले.......