फुलपाखरू
फुलपाखरू


एकदा एक सुंदर सुंदर फुलांनी बहरलेले पठार होते. खूप मोठ्या परिसरावर पसरलेले आणि अत्यंत नयनरम्य. नजर जिथपर्यंत पोहचू शकते तिथपर्यंत फक्त फुलं, फुलं आणि फुलंच. त्यात विविध रंगांची, विविध आकारांची, विविध ऋतूंमध्ये फुलणारी, विविध सुवासांची फुलं होती. प्रत्येक ऋतुत ते पठार बहरलेले असायचे. त्यामुळे बारमाही पर्यटकांचा ओढा तिकडे असायचा. फुलांवर सतत फुलपाखरं बागडताना दिसायची. भुंगे गुणगुणताना दिसायचे. पर्यटक फोटो काढताना दिसायचे. पक्षी किलबिलताना दिसायचे. वारा जणू येता जाता त्या फुलांना गोंजारून जायचा. कळी उमलण्यापासून फुलं कोमेजून खाली पडेपर्यंत सगळ्या अवस्था पाहणे हे एक विलोभनीय दृश्य होते. पण एकही व्यक्ती फुलं तोडणे तर दूर फुलांना हातही लावत नसे.
पण एक दिवस अशा विलोभनीय दृश्याला नजर लागावी तसं काहीसं झालं. एक प्रचंड मोठ्ठं चक्रीवादळ आलं. संपूर्ण परिसर एका रात्रीत उध्वस्त झाला. फुलं कोमेजून खाली पडली, मरगळून गेली, उडून गेली. उधाणलेल्या वारा आणि पावसाने संपूर्ण पठाराला उजाड केलं. त्यानंतर मात्र तिथे कधी कुठला पक्षी बागडला नाही की फुलपाखरू भिरभिरलं नाही. पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास तर ते पठार कायमचच बंद झालं. काही महिने असेच गेले. पण निसर्ग एक जादूगार आहे म्हणतात ते खरंच आहे. प्रकोपलेला निसर्ग हळूहळू स्थिरावला. सूर्य खिदळू लागला. नुकत्याच येउ घातलेल्या पावसाळ्याने पठाराच्या मातीत खोल रुजलेल्या मुळांना नव जीवन दिले. धरणीच्या उदरातून पुन्हा नवीन अंकुर फुटले. त्या नवजात अकुरांना पाऊस आईसारखे घास भरवू लागला, न्हाऊ-माखू घालू लागला.
एक दिवस एक सुंदर फुलपाखरू उडत उडत त्या पठारावर आलं. इकडून तिकडे भिरभिरू लागलं. त्याची नजर काहीतरी शोधत होती. बराच वेळ गप्प राहिलेला वारा न राहवून त्याच्यापाशी आला आणि फुलपाखराला त्याने विचारलं, "इथे कशाला आलास?"
फुलपाखराने निरागस उत्तर दिले, "माझ्या दोस्तांना शोधायला आणि खेळायला." फुलपाखराचे उत्तर ऐकून ते नवपल्लवीत कोंब उत्साहित झाले. पठाराचा परिसर गहिवरला. जुना दोस्त भेटायला आल्यामुळे आशेचे नवीन किरण फुटले. पुढे काही वर्षांतच ते पठार पूर्ववत झाले.
माणसाचेही या पठारासारखेच असते. आयुष्यात मित्र असतात तोपर्यंत ते बहरलेले असते पण एकदा मित्र दुरावले की माणूस एकटा पडतो. माणसाला जीवन जगण्यासाठी जसा श्वास हवा असतो तसाच श्वास घेण्यासाठी साथही हवी असते. आपण या फुलपाखरासारखे व्हावे. सगळीकडे बागडावे पण मैत्री कधीच विसरु नये.