दिल है छोटासा
दिल है छोटासा
दुपारचे तीन वाजले असतील. रविवार असल्याने हर्षला शाळेला सुट्टी होती. त्याच्या सोसायटीमधल्या गार्डन मध्ये तो एकटाच खेळत होता. इतर मुले दुपारचं जेवण झाल्यानंतर झोपली असावीत, किवा बाहेर अजून ऊन खूप असल्यामुळे घरातच बसली असावीत. हर्षला सुट्टीचा दिवस नेहमीच मोठा वाटतो तसा आजही वाटत होता. इतर दिवस असले की, कसा अर्धा दिवस शाळेतच जातो, मग घरी आल्यावर आवर- आवर, शाळेतला होमवर्क आणि क्लासेस... उरलेल्या वेळात ‘ बोअर’ झाले तर कार्टून नेटवर्क आहेच. पण आज अख्खा दिवस ढकलणे म्हणजे मोठ्या मुश्किलीच काम होत. मोबाईल तरी किती खेळणार? कार्टून तरी किती वेळ बघणार?
सुवर्णा आणि जय, हर्षचे आई – वडील दोघेही प्रायवेट सेक्टर मध्ये नोकरी करणारे, त्यामुळे ते संपूर्ण दिवस एकत्र घरी फक्त रविवारी असतात. हर्षच्या दृष्टीने मात्र ते घरी असूनही नसल्यासारखेच. आठवड्याची राहिलेली कामं, घराची साफ-सफाई यातच ते सुट्टीच्या दिवशीही व्यस्त असतात.
गार्डन मध्ये हर्ष आपला खेळण्यातला ट्रक घेऊन खेळत होता. अवघ्या दुसरीत असणार्या हर्षचे चेहऱ्यावरील निरागस भावच लोप पावत चालले होते. हातात खेळण्याचा ट्रक होता, मन मात्र त्याच्यात अजिबात नव्हतं . कानात काही तासांपूर्वीचा आपल्या आई-वडिलांमधला वाद कर्कशपणे घुमत होता.
“घर आणि नोकरी दोन्ही कशी सांभाळते, ते माझं मला माहित,चल घर स्वच्छ करायला मदत कर. ह्या कामवालीला पण नेमकी रविवारीच सुट्टी घ्यायची असते.” सुवर्णाचा पारा चढला होता.
“करतो बाई तुला मदत पण उगाच आरडा - ओरड करून माझा मूड खराब करू नकोस “, जयनेही आपला आवाज चढवला.
हर्षने ट्रक खाली ठेऊन दिला, त्याचे दोन्ही हात कानाच्या दिशेने वळले. दोन्ही कान बंद केल्यावरही आई-वडलांचा वाद कानात घुमतच होता, हर्षच्या डोळ्यात मत्सर तरळून गेला. तो तसाच बाजूच्या झोपल्यावर जाऊन रागाने मोठमोठे झोके घेऊ लागला.
आज मम्मी-पप्पा मला थ्री-डी मूवी बघायला घेऊन जाणार होते. आता त्यांच्यात भांडण झाले, मग नेहमी प्रमाणे ते प्लान कॅन्सल करणार आणि मला आजही कॅडबरीवरच समाधान मानावं लागणार. माझ्या मूवी पेक्षा घर साफ करणं Important आहे का? आजच्या दिवस घर साफ नाही केले तर काय प्रोब्लेम आहे? एकतर फक्त रविवारीच ते घरी असतात आणि तरीही माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. मी केडबरी घेणारच नाही. नकोच मला. सेल्फीश आहेत मम्मी-पप्पा, ते माझा विचारच करत नाहीत . झोक्यावर झोके घेताना सुद्धा हर्षच्या मनात हेच सगळे विचार चालू होते.
दुपारचे साडेचार वाजत आले तशी बागेत इतर मुलं खेळायला येऊ लागली. हर्ष मग इतर मुलांसोबत खेळू लागला. थोड्या वेळान हर्ष आणि त्याच्या एका मित्रामध्ये वाद झाला, त्याचा मित्र त्याला ‘चिटर’ म्हणाला , तसा हर्षचा पारा
चढला, त्यान त्याच्या मित्राला खूप मारलं, तो मित्र हर्ष पेक्षा खूप लहान असल्यामुळे नुसता रडू लागला. इतर मित्रांनी हर्षला थांबवलं. एवढ मारूनही हर्षचा राग निवळला नव्हता. त्या रागात खूप काही होत.. त्यात स्वतचा एकटेपणा, हरवलेपण होतं, आपलं बालपण हरवत चालल्याची खंत. त्या रागात सुवर्णा आणि जय बद्दलचा द्वेषही होता,
“मला तुमच्यात खेळायचं नाही” असे बोलून हर्ष परत एकटाच आपल्या ट्रक सोबत खेळू लागला, सूर्य मावळत आला तशी मुलं घराकडे जाऊ लागली. हर्षला घरी जाण्याचं भानच नव्हतं, अंधार पडू लागल्यावर त्याच्या आईने, सुवर्णाने आपल्या टेरेस वर येऊन त्याला हाक मारून घरी बोलावले.
हर्ष घरी येताच सुवर्णाचे तोडं चालू झाले “तुझं तुला घरी यायचं कळत नाही? अंधार पडल्यावर कोणी थांबत असते का खाली? तू दिवसेंदिवस जास्त बिघडत चालला आहेस. पटकन हात धुऊन जेवायला बस आता. चार तास झाले खाली गेलायस, काही खाल्लं नाहीस.”.
“ नाही लागली मला भूक, मी नाही जेवणार. “ हर्ष चिडचिडापणा करू लागला.
“दिवसभर काय कमी ताप झाला का म्हणून हे पोरगं मला अजून त्रास देतंय.” असे म्हणत सुवर्णाने हर्षला मारायला सुरुवात केली. हर्ष मोठमोठ्याने रडू लागला.
“मार खाल्याशिवाय कुठली गोष्ट समजत नाही तुला, चल पटकन फ्रेश हो आणि जेवायला बस.” जयने ही सुवर्णाच्या सुरात सूर मिसळला.
रडतच हर्षने जेवण करून घेतले, नंतर दुसऱ्यादिवशीच्या टाईम-टेबलनुसार दप्तर भरून घेतले आणि तो पलंगावर जाऊन पडला. खिडकीतून त्याने आकाश पहिले, चंद्र लक्खपणे दिसत होता, चांदण्याही चमकत होत्या, ते विलोभनीय दृश्य पाहून हर्षच्या मनातील राग निवळला आणि त्याला शांत वाटू लागले, याच शांततेच तो समाधानाने निद्रेच्या अधीन गेला,
बाहेर हॉलमध्ये सुवर्ण चिंताग्रसतपणे जयला विचारात होती. हर्षला एशो-आराम, खाण -पिण कशातही आपण त्याला काही कमी
करत नाही, तरी तो असा रागीट आणि चिडखोर का बनत चाललाय, का अस विचित्र वागतो कधीकधी? “
सुवर्णा आणि जयला जणू कळतच नव्हतं हर्षला हवा आहे तो त्यांचा अनमोल वेळ, त्यांला कमतरता वाटते ती आपल्या आई-वडीलांमधल्या हरवलेल्या संवादाची ,घराचं हरवलेलं घरपण आणि आपल्या वाट्याला आलेलं एकटेपण त्याला सतावतय.
“ दिल है छोटासा “ हे अत्यावशक गाणंच त्याच्या बालपणातून हरवतंय. हर्षच्या कोवळ्या बुद्धीला हे सगळं आपल्या आई-वडलांना नेमक्या शब्दात कसं सांगता येईल? आपल्या आयुष्यात निर्माण झालेला हा अभाव सांगण्याइतका तो प्रगल्भ कुठे आहे? घरात पैसा आहे मात्र सकारात्मकता नाही, एकोपा नाही, समाधान नाही आणि यात काहीही चूक नसताना हर्ष भरडला जातोय, हे मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या, आधुनिक म्हणवणाऱ्या सुवर्णाला आणि जयला कळायला नको?