"येरे येरे पावसा"
"येरे येरे पावसा"
येरे येरे पावसा म्हणत म्हणत आम्ही वरच्या विहीरी जवळचा सुका खटखटीत पऱ्या ओलांडुन कधी पलीकडे गेलो हे कुणालाच कळले नव्हते. जेव्हा डांबरी रस्ता ओलांडून छोट्या पायवाटेने वर वर चढण जाऊ लागलो आणि पायात गोळे व उरात धाप लागू लागली तेव्हा कळले की, आम्ही पऱ्या ओलांडून गावठणापासून दूर असलेल्या धुरगाडीच्या टोकावर आलो आहोत. धुरगाडी म्हणजे गावाच्या मागे असलेला एक प्रचंड उंच डोंगर. ज्याच्या माथ्यावरून नेहमीच धूर निघताना दिसे. आज आभाळात खूप सारे काळे काळे ढग गोळा झाले होते. गार वारा सैरावैरा फिरू लागला होता. प्राणी पक्षी निवारा शोधण्यात दंग होते. गावातील माणसांची धावपळ सुरु होती. पावसाचे आगमन होणार याच आनंदात आम्ही सारे फार खुश झालो होतो. नंदूच्या अंगणात असलेल्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही सारे गोळा होऊन येरे येरे पावसा असे गाणे गाऊन नाचत होतो. मी,नंदू, चंदू, मया आम्ही सारे त्या दिवशी पावसाला जणू लवकर येण्यास विनवणीच करत होतो. माझे नाव रवी. मला सर्व रव्या असेच म्हणायचे. धुरळा व पालापाचोळा उडवीत वारा सो सो धावत होता. हवेत सर्वत्र गारवा पसरला होता, तेवढ्यात पावसाच्या रिमझिम सरी धरणीवर कोसळू लागल्या. अंगावर पावसाच्या सरी झेलत झेलत आम्ही धुरगाडीच्या डोंगरावर पोहचलो होतो. पावसाच्या पांढऱ्या धुक्यात गायब झालेले आमचे गाव आम्ही बारीक नजरेने डोंगावरून शोधण्याचा प्रयत्न करीत होतो. धुरगाडीच्या डोंगावरून आमच्या गावासह आजूबाजूची सारी गावे अगदी स्पष्ट दिसायची. पण आज सारे वातावरण पाऊसमय झाले असल्याने काहीच दिसेनासे झाले होते. डोंगरावर एक अख्खे गाव मावेल एवढी जागा आहे. तिथे आम्ही पकडापकडी, चिखलाचे बॉम्ब फेक, उंच उड्या , लांब उड्या असे खूप खेळ खेळलो.
धुरगाडीच्या डोंगरावर जाऊन आम्हांला फार वेळ झाला होता. त्यात सुरुवातीचा पाऊस आता मुसळधार बरसू लागला होता. आम्ही चिखलाने पूर्ण माखलो होतो आणि पावसाच्या पाण्याने चिंब भिजलो होतो. अशा वेळी आम्हांला वेळेचे भान मुळीच राहिले नव्हते. एवढ्यात नंदूने घरी जाण्याची रट लावली. त्याला मयाने सहमती दिल्यावर आम्ही परत घराकडे जाण्यास निघालो. खूप अंधार झाला होता. पावसाच्या रिमझिम सरी आता जाड टपोऱ्या होऊन झाडांवर आणि झाडांच्या पानांवर जणू काय नृत्यच करत होत्या. डोंगरावरून छोटे छोटे पाण्याचे प्रवाह आता ओहळ बनून जणू काय आमच्यापुढं पळत होते, जणू काय डोंगराचा पायथा गाठण्यासाठी धावत होते. त्यात वाऱ्यालाही जोर चढला होता. सततच्या भिजल्याने आता आम्ही थरथर कापत होतो. अंगात थंडी भरली होती.
येरे येरे पावसा हे गाणे बोलल्यावर एवढा पाऊस येईल असे आम्हाला वाटले नव्हते. डोंगावरून जणू काय एखाद्या चुकीची शिक्षा करण्यासाठी सरींच्या काठीने मारत झोडता आम्हाला पावसाने वरच्या विहिरीच्या पऱ्याजवळ आणले होते. तिथं जवळ पोहचताच चौघांच्याही तोंडातून एकच शब्द बाहेर पडला... "आईईई शपथ...! आता रे? पऱ्याकडे पाहून आम्ही जाम घाबरलो होतो , कारण जातानाचा सुका खटखटीत पऱ्या आता दुथडी भरून वाहत होतो. त्यात उतरून पऱ्या पार करायची आमची हिम्मतच होत नव्हती. जर का पऱ्यात उतरलो असतो तर चौघेही वाहत गेलो असतो. आता मात्र सर्वजण कुणी मदतीला येतो का याची वाट पाहत होतो व एकमेकांना उगाच टोचून बोलत होतो... "उगाच यार पावसाला सारखे सारखे येरे येरे करून बोलावले." आता म्हणा "जा रे जा रे पावसा!" बघा जातो का? असे आम्ही एकमेकांना बोलत होतो. पण पाऊस मात्र वाढतच होता.
पावसाच्या अंधारामुळे वेळ किती झाला हे कळत नव्हते, पण एव्हाना आमची शोधा शोध सुरु झाली असेल याच विचाराने सर्वजण अधिकच घाबरलो होतो. तेवढ्यात आमचे सदा काका मागून येताना दिसले आणि त्यांना पाहून आम्ही सुटकेचा श्वास सोडला. आम्ही जाम खुश झालो बरं का! मग त्यांना घडला प्रकार सांगून टाकला. मग धिप्पाड असणाऱ्या आमच्या सदा काकांनी पऱ्याच्या मधोमध उडी टाकली. त्यांना पाहून पऱ्याने जणू काय आपला जलद प्रवाह मंदच केला असे क्षणभर भासले. सदा काकांनी दुथडी भरलेल्या पऱ्याच्या या काठावरून त्या काठावर आम्हाला अलगद उचलून फेकून दिले. जणू काय आम्ही हवेतच उंच उडी मारली असे वाटत होते. त्या दिवशी सदा काका आले म्हणून आम्ही सुरखरूप घरी पोहचलो. मित्रांनो आज त्या ओढ्यावर पंचायतीने छान सांकव बांधलाय पण तो पऱ्या आजही सुका खटखटीत आहे कारण, पाऊस पडतच नाही. म्हणून माझ्यासह तुम्ही ही परत एकदा सुरात म्हणा रे,
येरे येरे पावसा,येरे येरे पावसा
तहानेने व्याकुळले, गाव माझे पावसा..
तुझ्यासाठी आम्ही गातो हे गाणे
वाऱ्या संगे डोलती बघ कशी पाने
आसूसली झाडे तव, स्पर्शासाठी पावसा.
छान छान मातीच्या सुगंधी घड्या
मोडून तूच बाबा गंध घेरे वेड्या
पऱ्याला जीवदान, दे आता रे पावसा...
स्वच्छ आम्ही केले विहिरी आणि तळे
बीज पेरुनीया सारे सज्ज झाले मळे
नव्या अंकुरासाठी आता, बरस रे पावसा...