The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Poonam Arankale

Abstract Others

3  

Poonam Arankale

Abstract Others

घरटं कावळ्याचं आणि त्रिशंकूत्व

घरटं कावळ्याचं आणि त्रिशंकूत्व

3 mins
269


दुपारची वेळ. हॉल मधे वाचत बसलेले.  

पंखांची जलदशी फडफड बाल्कनीजवळून जाणवली. असं सतत 3/4 मिनिटं जाणवलं तशी बाल्कनीत पोचले. तर अंदाज खरा ठरला. कावळा कावळीची लगबग चाललेली. आमच्या बाल्कनीजवळच्या झाडावरची दोन फांद्यांमधली बेचकी दर वर्षीची कावळे कंपनीची आवडती जागा. तर घरटं बांधण्यासाठीची जागा तर हेरून झालेली. आता घर बांधणीच्या सामानाची जुळवाजुळव जोरदार होताना दिसत होती. 

एक एक काडी त्याची लांबी, आकारमान, लवचिकता बघून पारखणं चालू होतं. मान तिरकी करून जोखणं चालू होतं जोडीदाराचं मत. त्यांना हव्या तशा फुट सव्वा फुट लांबीच्या काड्या शोधणं चालू होते. 


इतक्या लवकर घर बांधणी ! 

अरे...  हा तर एप्रिल चालू आहे, नव्हे एक अर्धा तर उलटूनही गेलाय. लवकर कुठलं, ते तर निसर्गाधीन त्यांचं संसारचक्र पुढे चालवताहेत. त्यांची गती काळासोबतच आहे नेमस्त. गती तर आपली अडकलीये तात्पुरतीच पण केलेली चूक जाणवण्याइतकी. 


आपणही तर या निसर्गाचाच भाग पण... 

हं Ss, हा मानवी मनबुद्धीचा स्वार्थी 'पण' काय चीज आहे हे तो निसर्गही ही जाणून आहेच.  

ओह, निर्मिती काय तूच करू शकतोस काय?!! 

अं हं. अजिबात नाहीये असं. आम्हीही आहोत निर्मितीक्षम. आम्हीही आमच्या मनबुद्धीचा वापर करू शकतोय आणि तुझ्यापेक्षाही सरस निर्मिती करू शकतो. हे अनेकदा ऐकलंय त्याने आपल्याचकडून.  

मग काय आता त्यानेही ठरवलंय, घेउयातच एक फिरकी. त्याच मनबुद्धीचा मन:पूत वापर करू दिलाय त्याने. एकदम फ्री हॅन्ड च. ठरवलं असतं तर अगदीच आरामात खो घातला असता त्याने. पण नाहीच. कटाक्षाने, जाणीवपूर्वक दूर ठेवलं त्याने स्वतःला. 

कारण त्याशिवाय त्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाही हे पक्कं जाणून आहे तो. आपल्या हट्टीपणाशी गाढ परिचित आहेच तो. प्रत्येक वेळेस सोसलेत नं त्याने त्याचे परिणाम स्वतःवर. मग ठरवूनच टाकलं त्याने बास. आता बास बॉस. 


तर जगाच्या एका कोपऱ्यात, जे काही लॅबमध्ये घडत होतं घडू दिलंच त्याने. पूर्ण अलिप्तता बाळगत. हो पण दक्षता मात्र घेतलीये बाकी कुणाला त्याचा त्रास होणार नाही.  

या कावळा जोडी सारखंच बाकीच्यांचंही कुठलंही वेळापत्रक थोडंही इकडेतिकडे नाही होऊ दिलंय त्याने.  

आणि आता तो त्यांच्यासह बघतो आहे माणसाला. त्याच्याच निर्मितीसह झगडताना. 

अगदी तटस्थ आहे तो. सृष्टीला मानवाच्या अनंत हव्यासापासून वाचवण्यासाठी त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, ढगफुटी, वादळी तांडव आणून सूचना देऊन पहिल्या.  पण छे, काही फरकच नाही. ऊलट प्रत्येक वेळेस निसर्ग कोपावर मात करून जय हो चा उन्मादी नारा अनुभवला होता त्याने. या वेळी मात्र दोष त्याच्यावर घेता जाणीव देण्याचं काम झालंय. माणसाला पूर्ण जाणीव आहे आता लॅबमध्ये त्यानेच बनवलेल्या त्याच्या निर्मितीची.  

माणसाचा सर्व प्रकारचा उर्मट अहंपणा त्याच्याच निर्मितीतून घालवतोय जणू तो. 


देवळातल्या पुराणिकांकडून ऐकून सांगितलेली त्रिशंकूची कथा लहानपणी ऐकली होती आजीकडून.

विश्वामित्र ऋषींकडे एक राजा एक मागणी घेऊन येतो. त्याला मरणानंतर स्वर्ग ही कल्पना मान्य नसते. त्याला सदेह स्वर्ग अनुभवायचा असतो. विश्वामित्र त्याची मागणी मान्य करायचे ठरवतात, कारण ती ब्रह्मर्षी वसिष्ठांनी नाकारलेली असते. ज्यांनी विश्वामित्रांना ब्रह्मर्षी समजणे नाकारलेलं असते. कदाचित याद्वारे मान्यता मिळून जाईल, चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशाच काहीशा मन:स्थितीत असावेत विश्वामित्र त्यावेळी.

मग काय आपल्या तपोबलाच्या यानातं दिलं बसवून राजाला त्यांनी. आणि वर देवलोकात खळबळ. सदेह स्वर्गप्राप्ती अशक्यच. स्वर्ग द्वारपालांनीच दिलं पुन्हा खाली लोटून.

विश्वामित्रांना कळलं राजा पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत येणार. पण अयशस्वीपण मान्य नव्हतं त्यांना. मग त्यांनी राजाला आज्ञा केली जिथे आहेस तिथेच रहा. आता खालती यायचं नाहीस. ओह्ह!! स्वर्गसुख तर नाहीसच झालं पण पृथासुखही बाजूला गेलं. मग त्याला तिथे राहता येण्यासाठी विश्वामित्रांनी त्याच्याभोवती सृष्टी रचली. जिथं जायला कुणीच धजत नाही कारण स्वर्गासारखीच भासली तरी तिथल्या अहंअहंकारी कारी सृष्टीमध्ये जे काही उगवतं ते कडूच असतं.


पुराणातली वानगी पुराणात न राहता प्रत्यक्षात सजीव झाली की काय! की हव्यासापोटी हे असं काहीसं होणार आहे हे ऋषीमनाला आधीच जाणवून लिहिली गेलेली ही उद्बोधक रंजक कथा.

  

असो. तर आता कावळ्याचं घर बांधणे न्याहाळतेय मी घराच्या बाल्कनीतून आणि समोरून निसर्गही पाहताहे कावळ्यामधून, आपापल्या टॉवरी घरातच त्रिशंकूत्व अवस्थेत, आपल्याच हव्यासी करणीने धास्तावलेल्यांना मान तिरकी करकरून निरागसतेने. 


इथे जाणवतीये आश्रमीय ऋषीमनाची प्रगल्भता. 

 झाडाकडून त्याला प्रार्थना करून, दुखावलं जाईल म्हणून आधीच क्षमा मागून, मगच औषधं गोळा करणारं ते ऋषीमन. 

 पृथा वसुंधरा आहे. अनंत रत्नांची जननी आहे. पण म्हणून तिच्याकडून ओरबाडून आपल्याकडे साठवून माझं म्हणून शिक्का मारण्यापेक्षा आपली गरज आहे तेवढंच घ्यावं. वेगळेपणाने माझं माझं करत राहण्यापेक्षा आपण तिचाच भाग आहोत हे जाणून निसर्गानुकूल असावं. सर्व सृष्टी पोषक ती आपलंही पोषण तीच करणार. फक्त स्वामित्वाच्या भावनेतून तिच्याकडे न पाहता कृतज्ञ भावनेने असावं.  

तरच या टॉवरी त्रिशंकूत्वातून पृथेवर नि:शंक संचारू शकू.  नमन त्या ऋषीमनांच्या प्रगल्भतेला.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract